माझं जग...माझं आभाळ

माझं जग...माझं आभाळ
थोडंसं वास्तव परिस्थिती पासून दूर जाऊन, कधी एक-एकट तर कधी कोणी सोबत घेऊन ...

Tuesday, November 16, 2010

कातरवेळ

अशा कातरल्या वेळी, तुझी आठवण येई 
एका मागोमाग एक, ऊर भरून का जाई...

तुझ्या आठवणी किती, ऊर जड मन जड
झाली घागर पालथी, पाणी पाहे घडा-घड...

जाते वाहुनिया पाणी, परी रिकामी न होई
येते कोठुनी हे पाणी, कशी भरुनीच राही...

पाट पाण्याचा पाण्याचा, वाहे मनाच्या मळ्यात 
व्याकुळले एक झाड, उभे त्याच्या ओहोळात 

वेड्या आठवांचे झाड, कसे जगले जगले 
कधी किलबिलाट सारा, कधी एकले एकले...

जीर्ण झाड ते केवढे, परी रंग तो कोवळा 
उंच उंच गेले वर, हात टेकते आभाळा...

निळ्या सावळया आभाळी, तू च तू च भरशील
डोळ्यातून आत आत, देहभर फिरशील...

अरे पुरे तो प्रवास, नको एवढा दमूस
खरोखर भेट कधी, नको सावली धाडूस...

जाई विरून सावली, बघ आल्यावर रात 
मग पाझरेण मीही, खोलवर काळजात...

तुला होतात का कधी, माझ्या सावलीचे भास 
माझ्या सारखेच तुझे, होतात का जड श्वास...

तुला तुझे व्याप भारी, कशी मीही आठवेन
काही वावगे न त्यात, कशी मीही रागवेन...

दिवे लागणीची वेळ, घर आवराया हवे
'हे' येतील च आता , मना सावराया हवे...

तुही निघ आता, माझी कामे रेंगाळली
तू होशील नाहीसा, मीही होते  इकडली...

घेतल्या का संगे  तुझ्या ,तुझ्या  सर्व  खाणाखुणा
अशा कातरल्या वेळी, भेटू सवडीने पुन्हा...

नको वळून पाहूस, नको पाहू दीनवाणे
वळू नको मागे आता, जा निघून वेगाने...

तुला सांगताना असे, माझा जीव असा जाई
अशी कातरली वेळ, मन कातरून जाई...

2 comments:

  1. मस्त ब्लॉग.. छान सुरुवात झाली आहे.. पुढच्या लिखाणासाठी खुप खुप शुभेच्छा!!

    दिपक

    ReplyDelete
  2. धन्यवाद दिपक

    ReplyDelete