माझं जग...माझं आभाळ

माझं जग...माझं आभाळ
थोडंसं वास्तव परिस्थिती पासून दूर जाऊन, कधी एक-एकट तर कधी कोणी सोबत घेऊन ...

Monday, December 20, 2010

प्रथम तुज पाहता

ट्युशनवरुन घरी परतल्यावर आम्ही त्यादिवशी रोजच्या सारखेच बाहेर असंच इकडचं-तिकडचं बोलत उभे होतो. मी, चितु उर्फ चित्रा आणि स्वाती. बोलता बोलता सहज माझे लक्ष थोडे बाजुला गेले. आणि काय सांगु राव, मला माझ्या डोळ्यावर विश्वासच बसेना. चक्क ’तो’ मला दिसला. पण इकडे कसा काय? कोणाकडे आला असेल? जाउ दे ना, आपल्याला काय करायचय? ते important नव्हतं माझ्यासाठी. तो दिसला हेच खुप होतं.
Oh my God! काय करु नी काय नको अशी अवस्था झालेली माझी तर. खरंच तो कधी असा अचानक समोर येईल असं ध्यानी-मनी पण वाटलं नव्हतं. आपसुकच छोटीशी किंचाळी वगैरे निघाली तोंडातुन. दोन्ही हात आपोआप तोंडावर धरले गेले. डोळे विस्फारुन मी त्यालाच बघत होते. आणि तो माझ्याकडे बघत होता. एकंदर
माझे एक्स्प्रेशन पाहुन त्या दोघींना कळेना मध्येच मला काय चावलं ते. पण जेव्हा त्या दोघींना ’तो’ दिसला, तेव्हा त्या दोघींना पण खुप आश्चर्य वाटले. तो बाजुने निघुन सुद्धा गेला. आणि आम्ही अगदी सुदुर-बुदुर झाल्यागत एकमेकींच्या तोंडाकडे पहात राहिलो. माझ्या मनात तर आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. असे काहीतरी शेकडो कारंजी वगैरे काय ते म्हणतात ना तसंच काहीशी मनाची अवस्थता झालेली.  इतक्यात चितु ओरडली,"अगं चला लवकर बघुया कुठे जातो ते." त्यावर मी भानावर आले. मग short-cutने  धावतच जाऊन त्याला गाठायचा प्रयत्न केला. पण छे! काही उपयोग झाला नाही. ’तो’ कुठे गायब झाला. काहीच
थांगपत्ता लागला नाही. ’bad-luck’. असो.

रात्री बराच वेळ झोपच येत नव्हती. सतत त्याचा चेहरा डोळ्यासमोर, असंख्य प्रश्न- कुठे रहात असेल तो? आज आपल्या इथे कसा काय दिसला? इथेच कुठे रहात असेल तर? परत उद्या दिसेल का? त्याने मला ओळखले असेल का? छे रोजच्या एवढ्या गिर्हाईकांमधुन मला कसा काय लक्षात ठेवेल तो? मग जास्तच अस्वस्थ
वाटायला लागले. नाहीच दिसला असता तर बरे झाले असते. जीव चुरचुरायला लागलेला. बघु उद्या जमलं तर दुकानावर चक्कर टाकु, अशी मनाची समजुत काढली.

त्याची थोडक्यात ओळख सांगायची म्हणजे ’तो’ थेट गांगुली सारखा दिसतो. बस एवढंच.
आता गांगुली कुठे आला मध्येच? तर त्याचे असे झाले, मला गांगुली भयंकर आवडायचा. तो केवळ आवडायचा म्हणुन तो कसा छान खेळतो, असं वकीलपत्र मी स्विकारलेलं. कधीतरी(?) त्याची खेळी जरा(?) वाईट (म्हणजे अगदी नाही) झाली की Press-Conferenceला मलाच तोंड द्यावे लागणार आहे अशा प्रकारचे टेंशन यायचे मला. तर असो. गांगुली आता महत्त्वाचा नाही. सांगायचा मुद्दा असा की एकदा मला आमच्या स्वातीबाईंनी त्याच्या बद्दल सांगितले की, ’आपल्या मार्केट मध्ये जे सुरुवातीचं गिफ्ट-शोप चे दुकान आहे ना ’जस्ट लव्ह’.
तिथे एक मुलगा असतो. तो थेट आपल्या(?) गांगुलीची copy आहे.’ वगैरे.
सुरुवातीला मी लक्ष नाही दिले. म्हटलं माझा गांगुली कुठे? आणि तो कोण? जाउ दे ना. पण असं तिला स्पष्ट कसं सांगयचं? म्हणुन तुर्तास, हो म्हटलं बाई असेल गांगुली सारखा. पण तिने ’एकदा तरी बघ त्याला’ म्हणुन मला रिक्वेस्ट केली. आता ’मला आवडणारा गांगुली’, तिच्या मते गांगुलीसारखा दिसणारा ’तो’ आणि ’ती’ या तिघांचा एकमेकांशी काडीचाही संबंध नव्हता. तिचा मान ठेवायला म्हणुन आम्ही एके दिवशी तिघी मिळुन गेलो त्याच्या दुकानात. आणि पहाते तो काय? साक्षात ’गांगुली’ माझ्यासमोर उभा आहे की काय असंच काही क्षण मला वाटत होते. नलाला बघुन दमयंतीची काय अवस्था झाली असेल त्याचे वर्णन मी रिपीट नाही करत. पण सेम टु सेम माझी अवस्था. मला माझ्या डोळ्यांवर विश्वास होत नव्हता. इतकी समानता कशी काय असु शकते? निव्वळ असंभवच. खरंच गांगुली तर नाही ना, असा फालतु प्रश्न पण डोकावुन गेला मनात. पण तसे वाटणे सहाजिकच होते, स्वभाविकच होते. माझ्या जागी इतर कोणी असते, तर त्याला सुद्धा असा फालतु प्रश्न पडु शकला असता.

अजुनही नंतर ३-४ वेळा तरी फक्त ग्रिटींग कार्ड घ्यायच्या बहाण्याने गेलो असु. पण मग तिथल्या लोकांच्या नजरेत यायला लागलेलं. त्यानंतर मात्र मनाला आवर घालावा लागला. नाहीतरी पुढचं वर्ष बोर्डाचं होतं. ते जास्त महत्त्वाचं होतं. ’गांगुली’ chapter closed.

त्यादिवशी अनपेक्षितपणे त्याच्या समोर येण्यानं closed chapter अधिक क्लोज-अप झाला. जेवढा दूर जायचा प्रयत्न करत होती, तितकीच अधिक गुंतत चालल्या सारखं वाटायला लागलेलं . त्याला पुन्हा पुन्हा पहावेसे वाटत होते. तो पुन्हा दिसावासा वाटत होता. बरे, पहाण्यापर्यंत ठिक आहे. पुढे काय? एक विचित्र ओढाताण चाललेली मनातल्या मनात.
एक मन विचारत होतं ’प्रेमात-बिमात पडली नाहीस ना?’
एक मन टपली मारत होतं, ’अरे अपुन इस टाईपकी नही हैं। हे प्रेम-बिम आपल्याला नाही जमणार. ते रोमंटिक-बिमन्टिक व्हायला आपल्याला कुठं जमतं? टेलीव्हिजनला खवय्ये-प्रोग्रम आवडीने बघतात काहीक जण. तसाच प्रकार. ते पदार्थ करुन पहायचेच असे कुठे लिहलंय का? मग त्याला फक्त बघायला आपलं काय
जातं?’
(विशेष नोंद : दोन्ही मने अद्रुश्यपणेच संवाद साधत होती. मनाच्या रुपात स्वतःचे डबल रोल - ट्रिपल रोल नाही दिसलेत अजुन पर्यंत.)

टपलीवाल्या मनाचं ऐकायचं ठरलं. परत दिसला तर ठिक, स्वतःहुन नाही जायचं बघायला. त्याच्या दुसर्‍या दिवशी तो पुन्हा दिसतो का, म्हणुन फक्त चांस घेऊ असं म्हणत दोघींना मी थांबवलं. दर्शन नाही मिळाले. आम्ही तिघी ट्युशनवरुन परतल्यावर मुद्दामहुन घराबाहेर कारण नसताना घुटमळायला लागलो . ३ दिवस गेले, ४ गेले, ५-६, ७... छ्या! तो परत दिसला नाही. ’छोड यार!’ करत आम्ही होप्स काढुन टाकल्या. त्या दोघींना फरक पडायचा प्रश्नच नव्हता. आणि मी पण पहिल्यावाल्या मनाला ’हुर्र्र्र्र्र्र्र्र्र’ करुन उडवत होते. उगीच
बाहेर ताटकळत टाईमपास करणे बंद झाले.

त्यानंतर असंच एकदा आम्हाला ट्युशनवरुन सुटायला उशीर झालेला. स्थळ : पुन्हा तेच.
"ए तो बघ, तो बघ लवकर." चितु अचानक ओरडलीच. आणि पुन्हा एकदा आनंदाच्या उकळ्या and शेकडो कारंजी वगैरे.
"मुर्ख, हळु बोलता नाही येत का?" एक टपलीत दिली मी तिच्या. ’त्यात काय एवढ?’ च्या आविर्भावात दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. पण खरंच मला आनंद लपवायला नव्हतं जमत.

ह्या ना त्या कारणाने मी त्या दोघींना थांबवायची. बहुदा त्या दोघींना पण हे कळत होतं. मग आम्ही नियमितपणे थांबायला लागलो . बहुतेक वेळा तो दिसायचा. अर्थात त्याच्याही हे लक्षात येत होते की आम्ही त्याच्याचसाठी थांबतो असे. तो सुद्धा आम्हाला rather मला बघत बघतच जायचा. एक नविन सिलसिलाच
सुरु झालेला.

त्याची वाट बघायला खुप आवडायचे. येर-झार्‍या घालून पाय दमले की कट्ट्यावर बसुन माना दुखेपर्यंत वळुन वळुन वाटेकडे बघायचो. कधी त्याला यायला उशीर होतो आहे असे वाटले की नकळत तोंडातुन निघायचे,
"अरे चंद्र अजुन का उगवत नाही."
"थोडा धीरज ठेव बालिके. येतच असेल तुझा चंद्र. अरे क्या बात हैं, तो बघ आलाच."
तो येताना दिसला की अचानक हजारो कळ्या एकदम फ़ुलल्यासारखे वाटायचे. त्या काही क्षणांचे वेध दिवसभर असायचे.

एकदा तर चक्क तो बाजुने जाताना आम्ही गाणे-बिणेपण म्हटलेलं. कोणतं गाणं होतं बरे? हा सलमान-करिष्माचं ’धीरे-धीरे चलना’ आणि त्या गाण्याच्या मुखड्यातला शेवटचा ’पलट’ शब्द उच्चारल्यानंतर चक्क त्याने पलटुन पाहिलेले आम्हाला आणि काय गोड हसलेला म्हणून सांगू. मी एकदम खल्लासच. काय पण सीन होता, वाह वा!

त्याला बघायची इतकी सवय झालेली की तो नाही दिसला तर दिवस फुकट गेल्यासारखे वाटायचे. बस त्याची एक झलक दिसावी म्हणुन वेड लागलेलं मला. कोण-कुठला तो. त्याचं नाव सुद्धा माहिती नव्हतं मला. त्याच्यासाठी इतकं का मी पागल-बिगल व्हावं. जे चाललंय ते चुक की बरोबर? कोण ठरवणार हे? मी तर स्वतःच्या मनाला आवर घालु शकत होते. पण तो गुंतत गेला तर? हे कुठे तरी थांबवायला हवे होते. स्वतःहुन त्याला न-पहाणे मला अवघड वाटायला लागलेले.
खर्‍या गांगुलीचे पोस्टर्स एव्हाना धुळ खायला लागलेली. मला गांगुली आवडायचा हे मी साफ त्याला विसरुन गेलेली.

मग काय झाले कोणास ठाऊक, तो पुढे पुढे येईनासा झाला. न राहवुन दुकानावर चक्कर टाकुन पाहिली. तो तिथे पण नाही दिसला. कदाचित गावी वगैरे गेला असेल असे वाटले. पण असा किती दिवस जाईल? महिना? २ महिने? ४ -६? बघता बघता एक वर्ष होऊन गेले.

तो परत कधीच दिसला नाही आणि आता परत कधी दिसेल माहित नाही.
माझ्या बद्दलच्या त्याच्या भावना मला माहित नाही.
आता तो कुठे असेल? कसा असेल? काय करत असेल?
मला त्याची आताही आठवण येतेय. त्यालासुद्धा माझी आठवण येत असेल का?
सारंच अनुत्तरीत...

6 comments:

  1. मस्त मजा आली वाचताना...एकदम माझ्या फेवरीट पुस्तक 'शाळा' वाचताना आली होती तशीच.....बाकी शाळेत असताना असच द्रविडच वकीलपत्र माझ्याकडे होत.... :)

    ReplyDelete
  2. >>>मस्त मजा आली वाचताना...एकदम माझ्या फेवरीट पुस्तक 'शाळा' वाचताना आली होती तशीच.....
    ++
    अगदी असेच म्हणतो..

    मस्त ! :)

    ReplyDelete
  3. देव आणि दिपक खूप खूप आभार.

    ReplyDelete
  4. तो परत दिसल्यावर पुढची पोस्ट टाकायला विसरू नका. छान आहे.

    ReplyDelete
  5. Jaunde Ganguly aata retire Jhala, He was, oh sorry still he is my one of the favorite player, I miss you Dada..................

    ReplyDelete