माझं जग...माझं आभाळ

माझं जग...माझं आभाळ
थोडंसं वास्तव परिस्थिती पासून दूर जाऊन, कधी एक-एकट तर कधी कोणी सोबत घेऊन ...

Monday, December 13, 2010

माझा सोबती टुटु

टुटु
टुटुमध्ये आम्ही सर्वच जण कसे गुंतत गेलो कळालेच नाही. टुटुमुळे मी मात्र या मांजर-परिवाराच्या खुप जवळ गेली. मांजरांबद्दल वाटणारी भीती, नुसती भीतीच नाही पण माहिती नाही का मला मांजराला हात लावायला पण घाण वाटायची. एकंदर मांजरांबद्दल जे काही मनीचे (माझ्या मनाचे) भाव (वाईट) होते ते जसजसा टुटु मोठा होत गेला तसतसे कमी होत गेले. खरं सांगायचे तर तो मोठापण कधी झाला ते पण आम्हाला कळालेच नाही असा ’Typical’ dialogue नाही म्हणायचा मला. पण अचानक एके दिवशी कळाले. टुटु वर्ष-दोन वर्षाचा असेल त्यावेळेला आम्ही गावाला गेलेलो. घरातले सर्वच जण (झाडुण) गेलेलो. गावी जायचं ठरल्यावर बाबांना भरपुर म्हणजे भरपुरच टेंशन आलेले त्याचे. त्यांना खरं तर दोन गोष्टींचे टेंशन आलेले. टुटुबद्दल तर होतेच. आणि दुसरे म्हणजे त्यांची फ़ुलझाडं, त्यांना पाणी कोण घालणार? घुशी मुळं पोखरुण तर नाही ना टाकणार? वसाहतीमधली टारगट पोरं-टोरं काही खोड्यातर नाही ना करणार....वगैरे वगैरे....
तसे पहायला गेलो तर दुसरे टेंशन पहिले होते, कारण फ़ुलझाडं टुटु यायच्या आधीपासुनची होती. तर असो.
टुटुचे  टेन्शन जरा जास्त महत्त्वाचे होते. कारणे बरीच होती. त्याला बाहेर रहायची सवय अजिबातच नव्हती. शिवाय त्याचे खाणे-पिणे (चवीचेच) सर्व घरातच. त्यात तो फ़ारच नाजुक. ’बोक्या’ जातीला काळीमा फ़ासणार्‍या अशा या टुटुच्या जीवाचे ’वैरी’ बरेच होते. जसे की कुत्रे, इतर बोके (जळणारे), काही धष्टपुष्ट घुशी वगैरे वगैरे. यासर्व गोष्टींमुळे माझ्यापण जीवाला घोर लागुन राहिलेला. आणि मुख्य म्हणजे प्रश्न २-४ दिवसांचा असता तर वेगळी गोष्ट होती. आम्ही १५ दिवसांसाठी जाणार होतो. पर्यायही नव्हता आमच्याकडे काही. सोबत घेऊन जायला टुटु कुत्र्यासारखा समजुतदारही नव्हता. मुळात मांजर या प्राण्याला फ़क्त त्यांच्या गरजेपुरतीच अक्कल दिली गेली असली पाहिजे. आजतायगत मी शिकाऊ मांजर पाहिलेले किंवा ऐकलेले नाही. शिकाऊ वरुन आठवलं. बाबांना टुटुला ट्रेनिंग-स्कूल मध्ये टाकायचे होते. माहिमला आहे असे ट्रेनिंग-स्कूल, त्यांनी माहिती काढलेली. मग माझ्या डोळ्यासमोर चित्र यायचे की टुटु पाठीला school-bag लावुन आणि गळ्यात water-bottle घालून बाबांबरोबर शाळेत चाललाय, तो वर्गात बसलाय आणि बाई काय सांगताहेत ते न ऐकता त्याचे आपले म्याव-म्याव ओरडणे चालू आहे वगैरे.

या प्राण्याबद्दल आणखी एक खटकणारी गोष्ट म्हणजे, देवादिकांमध्ये त्याला नसलेले स्थान. कुठल्याही देवाचे वाहन म्हणुन त्याला निदान साधं ’Call letter’ आलेलं किंवा अमुक-अमुक देवाने मग मार्जार अवतारात त्याचा वध केला याचा कुठेच उल्लेख ऐकिवात नाही. एवढेच कशाला अमुक-अमुक देव मांजर रुपाने ते सर्व पहात होते, असे वाक्य औषधाला पण सापडणार नाही. मांजर-हत्येनंतर काहीतरी काशीला जावे लागते म्हणतात, हा अपवाद सोडला तर ह्या प्राण्याचा पुराणात विशेष उल्लेख नाही.
अजुनही काही प्राणी आहेत जे देवादिकांच्या यादीत यायला वैटींग-लिस्ट मध्ये आहेत. झालंच तर ससा, झेब्रा, जिराफ़, कांगारु इ. (चुक-भुल माफ़ असावी)
प. पू. रामसे (मला हेच नाव माहिती आहे) यांसारख्यांच्या कृपेने, काळी मांजर / बोका ही/हा भुता-खेतांची / चा प्रचार-प्रमुख असायला कोणाचीच हरकत नसावी. खुपच अवांतर होते आहे असे वाटतेय. असो.

तर आम्ही काही टुटुला घेऊन जाणार नव्हतो. त्याच्यासाठी खिडकीचे एक तावदाण उघडे ठेवायचे का? असा विचार चाललेलाच पण त्यात बर्‍याच अडचणी होत्या.  समजा जर वरीलपैकी वैर्‍यांच्या यादीतला एखादा प्राणी किंवा कळप त्याच्या मागे लागले आणि तो सवयीप्रमाणे स्व-संरक्षणासाठी खिडकीमधुन घरात लपायला आला. आणि बाकीची गुंड-मंडळी पण त्याच्या मागोमाग घरात घुसले तर घराची नासधुस करतील तो वेगळा भाग पण त्याच्याच जीवाला जास्त धोका होता. दरवेळेला त्याची मदतीसाठी हाक आली आमच्यापैकी कोणी धाव घेत असु. पण अशावेळेला काय करेल मग बिच्चारा? मग शेवटी ठरले की त्याला बाहेरच राहु द्यायचे. निदान अशा प्रसंगाला धावायला त्याला रान मोकळे मिळेल.

गावी तशी त्याची काळजी लागुन राहिलेलीच होती. पण एका गोष्टीमुळे जरा इकडचं लक्ष कमी झालं. गावच्या घरात एका मांजरीची नुकतीच जन्मलेली पिल्लं आलेली होती. एक थोडे राखाडी रंगाचे होते आणि एक पांढरट सोनेरी होते. दोघेही छान होते इल्लु-पिल्लुशे. दोघांच्या लीला पाहुन, हि लोकं टुटुचसारखं करताहेत असेच वाटत होते. टुटुची उणीव त्यांनी भरुन काढली.

जेव्हा आम्ही गावावरुन परत आलो. तेव्हा घराजवळ आल्या आल्या टुटु इकडे-तिकडे फ़िरत असताना दिसला. इतके दिवस बाहेर राहुन त्याला वाईट संगत तर नाही ना लागली. भीती वाटुन गेली.
बराच वेळ घरात तो आला नाही. छ्या! बोका हाताबाहेर गेला वाटते, मनात पाल चुकचुकली. पण थोड्याच वेळात तो आला. आम्हाला अचानक भुत दिसल्या सारखं आम्ही त्याला बघतच राहिलो. हे काय म्हटलं? एवढा प्रचंड? हा नक्की टुटुच आहे ना? बापरे एवढा मोठा का दिसतोय? आणि केवळ पंधरा दिवसात एवढी झपाटयाने वाढ? एवढा पांढरा फ़टफ़टीत? याला काही झालं-बिलं नाही ना? अरे हा काही बोलत पण नाही, नुसतेच तोंड हलवतोय. आइंग! असे कसे? आमच्या कानाचा काही प्रोब्लेम तर नक्कीच नव्हता. हो, अगदी खात्री होती. मग असे का? बोल की रे......
त्याला हात लावायला पण भीती वाटत होती. तो सवयीप्रमाणे पायाला घासायला जवळ वगैरे यायला लागला. पण भीतीने मी मागे जात होते. तो मग विचारात पडल्यासारखे बघत उभा राहिलेला.

त्यानंतर आम्हाला जाणवले, अरे खरचं आपला टुटु मोठा झालाय. रोज नजरेसमोर असल्या कारणाने ते आम्हाला कळत नव्हते. ८-१५ दिवस त्या पिल्लांना बघत होतो. त्या पिल्लांना बघताना बालपणीचा टुटु डोळ्यासमोर येत होता. टुटुचे त्यावेळेचे रुप काही दिवसांसाठी विसरुन गेलेलो. आणि त्या तुलनेत टुटु अचानक प्रचंड वाटायला लागलेला. पांढरा दिसण्याचे कारण पण ती पिल्लं होती. गावच्या मातीचा रंग चढलेला होता त्यांच्यावर. आणि आवाजाचे असे झाले की टुटुचा आवाज खरंच फ़ुटत नव्हता. इतके दिवस कोणी बोलायला नव्हते ना त्याच्याशी. गप्प राहुन राहुन त्याचा आवाज अगदी बंदच झालेला. टुटु बिच्चारा आमच्या नसण्याने त्याला खरंच काय काय सहन करावे लागले होते असेल.

माझ्या अनुभवाप्रमाणे, मांजरी बोक्यापेक्षा जास्त माणसाळलेल्या आणि कमी अग्रेसिव्ह असतात. आणि टुटु मांजरींपेक्षा अधिक समजुतदार आणि शांत स्वभावाचा होता. तो जस-जसा मोठा होत गेला, तस-तसा तो दिवसेंदिवस अधिकाधिक केविलवाणा, मृदु  वाटत होता. इतकेच कशाला, त्यावेळेला मला वाटते माझी भाची साधारण वर्षभराची होती असेल. ती येता-जाता त्याच्या खोड्या काढत असायची. कधी त्याचे कान धरुन चाव-माव करायची. कधी शेपटी ओढायची तर कधी केस उपटायची. पण बोका असुन पण त्याने ते सर्व सहन करायचा. अगदीच त्याला जेव्हा सहन नाही व्हायचे तेव्हा तो आपला मऊ पंजा अलगद तिला मारायचा. असं वाटायचे, तो म्हणतोय ’अट्ट लब्बाल’. जणु काही त्याला तेवढी जाण होती की ती लहान आहे. खरंच असा बोका ’न भूतो, न भविष्यति’

एक अनुभव इथे खास share करावासा वाटतो. माझे डिप्लोमाचे शेवटचे वर्ष होते. Final Exams चालु झालेल्या. घरात फ़क्त दादा-वहिनी आणि मीच. तेव्हा माझी भाची नव्हती म्हणजे माझी भाची जन्मायची होती. बाकीचे सर्व गावी गेले होते. त्याच दरम्यान वहिनीच्या माहेराहुन सर्व जण त्यांच्या गृह-प्रवेशासाठी गावाला जाणार होते. वहिनीच्या घरातले सर्वच जण जाणार असल्याने तिला पण सहाजिकच जायची ओढ वाटु लागलेली. त्यातुन ती आमच्या परिवारात सामील होऊन वर्ष पण झाले नव्हते. गावी जायला तिचा जीव झुरत होता. एक्झाम्समुळे मी गावी जाण्याचा काही प्रश्नच नव्हता. पण मला एकटीला सोडुन जाणे पण पटत नव्हते. शेवटी मग एक पर्याय सुचला. ’दिपू’ माझी वर्गमैत्रीण, तिला सोबत रहायला बोलवायचे. तशी ती पण कधीतरी आमच्याकडे रहायला यायची. झाले प्रश्नच सुटला. मग दादा-वहिनी निर्धास्तपणे गावाला जाऊ शकले.
एक-दोन दिवस ठिक गेले. दिपू होतीच सोबत. आमचा शेवटचा पेपर राहिलेला. तोपर्यंत मध्ये सात दिवसाची सुट्टी होती.
झाले. गावाला जायला दिपू नेहमी संधी शोधत असायची. तिचे आई-बाबा गावाला रहायचे ना. दोन-चार दिवस लागुन सुट्टी आली की ती लगेच गावाला जायची. सात दिवस सुट्टी आणि ती गावाला जाणार नाही, असे शक्यच नव्हते. तिने त्याबद्दल मला विचारले सुद्धा. मला एकटीने रहायची कल्पनापण सहन झाली नाही. याआधी कधी एकटी रहायचा कधी संबंधच आला नव्हता. पण तिला 'नाही' सांगणे पण मला ठिक वाटले नाही. तसे म्हटलं तर दोन-तीन दिवसाचाच प्रश्न होता. त्यानंतर गावावरुन दादा-वहिनी वगैरे येणारच होते. शिवाय तसे बघायला गेलं तर अगदीच एकटी नव्हते मी. माझा हिरो होता ना सोबत - टुटु

पहिल्यांदा मी ’Home - Alone’ चा अनुभव घेणार होते. खरं सांगायचे तर मला पण मजा वाटत होती, असे काहीतरी Thrill वगैरे वाटत होते. घरात फ़क्त आपलंच राज्य. पाहिजे तेव्हा, पाहिजे ते करायचे. काहीही खा-प्या. कोणी अडवणार नाही. त्यात वरुन सगळ्यांची सहानुभुतीपण. सहीच सगळं. असो.
बाकी काही प्रोब्लेम नव्हता. पण रात्री फ़ार भीती वाटायची. बारा वाजेपर्यंत झोपच नाही यायची. आणि त्यानंतर तर भुत-लोकांचा Office-Time सुरु होतो ना.

’Home - Alone : रात्र पहिली’

 बारा वाजुन गेले तरी साहेबाचा पत्ता नव्हता. नाईलाजाने खिडकीचे एक तावदाण जरा ओपन करुन ठेवले. ’चक-चक’ असा आवाज केला की तो कुठे असेल तेथुन धावत यायचा. मग खिडकीतुनच त्याला आवाज दिला. पण तो काही आला नाही. मग मनात विचार आला असेच डोळे मिटुन पडुन राहुया. तो आला की मग झोपायच्या आधी खिडकीचे तावदाण आठवणीने ओढुन घेऊ. मग अचानक जाग आली. अरे बापरे! घड्याळात पहाते तर एक वाजुन गेलेला. उठुन आधी खिडकीकडे पाहिले. तर खिडकी वार्‍याने वाटते बंद झालेली. खिडकीच्या पुसट काचेपलीकडे टुटुची आक्रुती दिसत होती. बिचारा खिडकी ओपन व्हायची वाटच पहात होता. कधीपासुन तेथे होता देव जाणे. लगेचच उठुन आधी त्याला आत घेतले. टुटु कधीही घरात आला की आधी जाऊन पाणी प्यायचा. त्याच्यासाठी एक भांडे भरुन ठेवलेलेच असायचे. तसा तो पाणी पिऊन माझ्या अंथरुणात माझ्या सोबतच येऊन झोपला. जाग आली तेव्हा चार-साडे चार होऊन गेलेले. ती वेळ बघुन जीवात जीव आला माझ्या. आई सांगते, चार नंतर राम-प्रहर सुरु होतो. भीती मावळली. माझी सर्व कामे सहा - साडे सहाच्या आतच आवरत होती. ८ ते ९ पाण्याची वेळ. बाकीची कामे पण विशेष नसायची. एकटीच असल्याने जेवणात 'full adjustment' - ब्रेड, बटाट्याची भाजी आणि चहा. अभ्यास करुया म्हटलं तर उरलेला पेपर सोप्पा होता. म्हणुन अभ्यासाला हात घालायला कंटाळा येत होता. माझ्या काळजीपोटी गावावरुन दोन-तीनवेळा फ़ोन यायचा . घर आणि दिवस खायला येत होते. पण तरीही टुटु सोबत असल्याने एवढे विशेष वाटत नव्हते. त्याच्या सोबत मी बडबड करायची. त्याला ओरडायची. तो बिच्चारा माझे सर्व ऐकत दिवसभर माझ्या मागे फ़िरत रहायचा.

’Home - Alone : रात्र दुसरी’

या रात्री पण बराच वेळ टुटुची वाट बघितली. एक वाजून गेला. आदल्या रात्री प्रमाणे खिडकीचे एक तावदाण ओपन ठेऊन मी डोळे मिटुन पडुन राहिले. पण कधी गाढ झोप लागली कळालेच नाही. साधारण दोन-अडीच वाजले असतील. कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज यायला लागला. मांजराच्या ओरडण्याचा आवाज पण येत होता. मी खडबडुन जागी झाले. सर्वात आधी टुटु घरात आला की नाही, ते पाहिले. कुत्रे बिल्डिंगमध्ये घुसल्यासारखे वाटत होते. भीती वाटली, ते कुत्रे टुटुच्याच मागे लागले असणार. मी एक दांडा (पोलिसांचा असतो ना तोच) हातात घेतला आणि कसलाही विचार न करता, सरळ बाहेर आले. त्या कुत्र्यांना हाकलवुन लावले. पण त्या कुत्र्यांना हाकलवता-हाकलवता  टुटुपण पळाला तेथुन. समोरच्या बिल्डिंगच्या मागे गेला. ’Oh, no! damate...’ म्हणत त्याच्या मागोमाग मी जायच्या विचारातच होते की मी भानावर आले. मध्यरात्र....त्यात मी एकटीच बाहेर....आजुबाजुला कोणी नाही. तडक घरात गेले. पण टुटुला परत बघितल्याशिवाय मला चैन पडणे शक्य नव्हते. पुन्हा खिडकीत येऊन टुटुला आवाज दिला. २-३ मिनिटे झाली तरी हा भाई कुठे दिसेना. मग धाकधुक वाढायला लागली. देवाचा धावा करत होते, त्याला सुखरुप आण असा. आणि समोरच्या बिल्डिंमागून एक पांढरा गोळा कान मागे करुन जोरात धावत येताना दिसला. तोच होता. धावतच खिडकीत चढला. धापा टाकत मागे बघत होता. माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले. तो सुखरुप घरी आलेला. तो त्या रात्री कुशीत येऊन झोपला. सकाळी जाग आली, तेव्हा लक्षात आले की रात्री दाराला कडी लावायची विसरुन गेलेले. पण रात्रीच्या थरारापुढे हे विशेष नव्हते. हा प्रसंग आज पण आठवला, तरी कमाल वाटते.

नंतरच्या दोन रात्री सामान्य गेल्या. टुटु वेळेत घरी आलेला.

मांजरांबद्दल एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. हा प्राणी कडाक्याच्या थंडीत तुमच्या अंथरुणात वगैरे जरी शिरत असला, तरी उन्हाळ्यात तो तुमच्या अंथरुणाकडे ढुंकुनही बघणार नाही. पण टुटुची कमाल वाटते कारण 'Home - Alone' च्या वेळेला कडक उन्हाळा चालू होता. ज्या मांजर प्राण्याला उन्हाळ्यात आपली उब सहन होत नाही, तो चार रात्री कुशीत झोपत होता. हि खरोखरीच कमाल नाही का? त्याच्यामुळे खरंच त्या चार रात्री मला विशेष अशी भीती वाटलीच नाही.

गावावरुन आल्यावर घरातल्यांना हा प्रसंग सांगितला. ’खय गे होती माझी बाय ती’ करत माझे शोलीट कौतुक-बिवतुक झाले. घरातल्यांसाठी जरी मी हिरोईन वगैरे झालेले. पण माझ्यासाठी मात्र ’तो’च 'Man of the Match'होता.

त्या प्रसंगाबद्दल आई आजपण टुटुला मानते.  तिच्या मते, चार दिवसांसाठी तो माझा पाठी-राखाच बनलेला होता. ती त्याच्यासाठी या अर्थाचा मालवणीतला एक कोणता तरी शब्द पण वापरायची. सध्या तो तिला पण आठवत नाही आहे. पण खरच खूप गोड शब्द आहे. आठवला की नक्की  कळवेन.  

खर्‍या अर्थाने त्याने मला दिवस-रात्र सोबत केलेली. त्याच्या सोबतच्या त्या चार रात्री आणि ते चार दिवस खरंच अफ़लातुन होते.

4 comments:

  1. Ae Zhakkas hoti TUTU chi story mala sagala samor disat hote tuzhi gadbad aani dhavpal
    ’Home - Alone : रात्र

    ReplyDelete
  2. छान लिहलयं. अगदी समोर बसुन गोष्ट ऎकल्यासारखं जाणवलं. लिखाणातली निरागसता भावली. असेच लिहित रहा!

    दिपक

    ReplyDelete
  3. ब्लॉगच नावच लडीवाळ आहे. आपण सगळेच कधीतरी इल्लूसं-पिल्लूसं असतोच. त्या वेळची निरागसता कधी हरवुन गेली ते कळलच नाही. लहाणपणी आम्ही पाळलेल्या आणि आजही त्याच्या आठवणींनी ओलावणार्‍या डोळ्यांना आमच्या टॉमीची "टुटु" वाचताना पुन्हा एकदा आठवण आली. छान आवडला तुझा टुटु.

    ReplyDelete
  4. मैत्रेय , प्रकाश आणि दिपक
    तुमचे आभार.
    @ मैत्रेय
    आमच्या एका शेजाऱ्यांचा टॉमी जेव्हा गेला, त्यावेळेला त्यांच्या घरात अक्षरशः सुतकी वातावरण झालेले आठवते.
    पण ती परिस्थिती टुटुच्या वेळेला आम्ही समजू शकलेलो.

    ReplyDelete