माझं जग...माझं आभाळ

माझं जग...माझं आभाळ
थोडंसं वास्तव परिस्थिती पासून दूर जाऊन, कधी एक-एकट तर कधी कोणी सोबत घेऊन ...

Friday, November 19, 2010

टुटु


सुरुवात कशी करू, समजत नाही. आज अचानक एक लेख वाचनात आला आणि त्याची उणीव तीव्रतेने जाणवू लागली. तसे पाहता, त्याची आणि माझी जेव्हा ताटातूट झाली; मला खूप त्रास झाला, वाटले मी याला कधीच विसरू शकणार नाही. पण आपण आपल्या व्यापात एवढे गुंतून जातो कि कधी काळी आपला 'जीव कि प्राण' जरी असला तरी त्याचासुद्धा विसर पडू शकतो.

बाबांनी त्याला घरात घेतलेलं. त्यांना मुळात प्राण्यांबद्दल एवढी ओढ वगैरे नाही. एवढंच काय तर इतरांना प्राण्यांविषयी (त्यात मनुष्यप्राणी सुद्धा मोडतो) असलेल्या प्रेमाबद्दल पण त्यांना ते थोडे 'अति' करतात असे वाटते. तसे ते प्रेमळ आहेत पण ते व्यक्त करण्याबाबत त्यांचे विचार काहीसे जुन्या पद्धतीचे आहेत.

मी त्यावेळेला डिप्लोमाच्या पहिल्या वर्षाला होते मला वाटतं, नीटसं नाही आठवत. आम्ही गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत जायच्या तयारीत होतो. आमच्या वरळी 'ल' - विभागाचा राजा. दुपारी दीड- दोनच्या सुमाराला साधारणपणे आमचा गणपती बाहेर पडायचा.

दाराबाहेरून कसलातरी 'चीव-चीव' अगदी केविलवाणा असा आवाज आला. आवाज 'चीव-चीव' जरी असला तरी चिमणीचा नक्कीच नव्हता.
दार उघडून पाहिले तर उंबर्याला अगदी चिकटून उभे राहिलेले एक soft toy च जणू . शेपटी काटकोनात उभी आणि कदाचित कुठल्या स्कूटर किवा गाडीच्या खालून आला असेल कि काय म्हणून नाकाला काही काळे लागलेले. नंतर कळाले त्याचे नाकच तसे होते. पाठीवर आणि पायावर काही ठिकाणी मोठे काळे  डाग होते. शेपटी पण काळी होती.  बाकी ते अगदी शुभ्र, अगदी आताच धुतल्यासारखे .

बाबांनी बघितले आणि ते म्हणाले," ह्येका काय तरी घालो गो, केव्हद्ह्यान इफळाकता. भुकेला असत."
माझ्या बाहुलीला म्हणजे बहिणीला आणि मला हा सर्व प्रकार गमतीदार वाटला. आम्ही दोघींनी आईकडून एका बशीत दुध आणले. बिच्चारे खरच भुकेलेले होते, लगेच बशी चाटून-पुसून साफ पण झाली. मग ते कोपर्यातल्या शेजार्यांच्या दाराबाहेर एकच बूट ठेवलेला होता, त्यात जाऊन बसले. आणि लगेच झोपले पण.
दोन दिवस असाच उपक्रम चालला होता. कधी आम्ही त्याला गरमा-गरम चपातीचे तुकडे घालत होतो तर कधी दुध. ती बशी आईने त्याच्याच साठी ठेवून दिली. ती वेगळी गोष्ट होती की, त्या मांजराने तोंड लावलेलं भांडं आई परत घरात वापरायला घेणार नव्हती.

तिसर्‍या दिवशी, रात्री १२.०० किवा १.०० च्या सुमाराला दाराबाहेर कुत्र्यांची आरडा-ओरड ऐकायला आली. बाबांना लगेच जाणवले. ते काठी घेऊनच बाहेर गेले. ४-५ कुत्री त्या पिल्लासाठी बिल्डींगमध्ये शिरलेली. सगळ्यांना हाकलवून लावले बाबांनी. म्हणून पिल्लू बिच्चारे वाचले.  आठवड्यापूर्वीच या पिल्लाचा एक भाऊ या कुत्र्यांनी गायब केलेला. मग बाबाच त्याला घरात ठेवण्याबद्दल म्हणाले. पिल्लाचा जीव वगैरे सर्व ठीक आहे, पण पिल्लू घरात म्हणजे. मला किळस वाटली. मला प्राणी आवडत नाही अशातला भाग नाही, पण ते घराबाहेरच ठीक वाटतात.

आम्ही गावीपण कधीच्या काळी जायचो ना, तेव्हापण ह्या मांजरांमुळे मी वैतागलेली असायची. घरात नाही म्हटले तरी ४-५ मांजरे सहज दिसायची. घरात कुठे पण बघावे तिथे आपले एक तरी मांजर असायचे. बरे लांबूनच जातील तर ते पण नाही, पायाला घासायला यायची. आई काठीने त्यांना हाकलवून लावायची आणि मग मी कडी-कुलुपात जेवायला बसायची. पण निदान गावी घर मोठे असल्याकारणाने पळायला तरी वाव असतो. आणि इथे तर बापरे ! मला कल्पना पण सहन होत नव्हती.

तेव्हाच बाबांना सांगितले, ते घरात आलेलं मला चालणार नाही. बाबा मला अगदी 'बाबा-पुता' करून समजावत होते. सकाळी जाऊदे ते बाहेर पण आता घरातच असू दे. "किचन मध्ये ठेवूया, थयच झोपत बिच्चारा...बाहेर तेका कुत्री नाय करून टाकती."
बाबांनी शब्द दिला मांजराच्या वतीने कि तो रात्रभर त्या खोलीतून कुठेही हलणार नाही. बाहुलीने लगेच एक shoe -box आणला, त्यात एक कापड घडी करून ठेवले. आणि तो box एका पाटावर ठेवला. आश्चर्य म्हणजे ते पिल्लू लगेच त्यात जाऊन बसले. त्या बुटापेक्षा हे जरा प्रशस्त वाटलं असेल त्याला. तसेहि त्याचा आकार त्या बुटात पण सहज मावत होता. इल्लू-पिल्लूसं होतं अगदी. मग बाबांनी त्या box वर झाकण सरकवले माझ्या सांगण्यावरून. ते मलाच अति वाटले. म्हटले थोडं ओपन ठेवा एका बाजूने. मग मी निर्धास्त होऊन बाहेरच्या खोलीत झोपली. पण थोड्या वेळात एक कहरच झाला.

मी अर्ध्या झोपेत असेन, त्यावेळेला. मला चादर घेऊन झोपायची सवय होती, माझ्या पायावर काहीतरी जड-जड गरम-गरम काही आहे असे जाणवले. मला आठवले लगेच, हेच कार्टे असेल. डोक्यावरून चादर न काढताच मी किंचाळत होते. बाबा उठले आणि आधी त्याला परत आत ठेऊन आले. मी उठूनच बसले. त्या धाकधुकीत मला काही झोप येणे शक्य नव्हते. माझी झोपच उडाली. त्यापेक्षा पण मला बाबांबद्दल आश्चर्य वाटत होते, परकी का झालेले मी त्यांच्यासाठी? आज ते दीड-दमडीचे पण नसलेले मांजर त्यांना लेकीपेक्षा जवळचे वाटत होते. रात्रभर मला हेच विचार येत होते आणि त्याहून अधिक त्या मांजराचा राग येत होता.

नंतर नंतर दिवसा मला खूप सेफ वाटायचे, निदान कळायचे ते कुठे आहे; रात्री मात्र सतत धाकधूक असायची ते त्या box मधून बाहेर तर नाही ना आले असे.

असो, घरातले वातावरण मात्र पूर्ण बदललेलं. नवीन बाळ घरात आल्यासारखे वाटत होते. सर्वजण त्याच्याशी बोबड्या भाषेत बोलायचे. सगळ्यांनाच कुतूहल होते की तो boy  आहे की girl आहे, अगदी शेजार्‍याना पण उस्तुकता होती या बद्दल. मग मध्येच त्यांना शोध लागायचा तो बोका आहे, अगदी काळ-वेळचे भान न ठेवता त्या आम्हाला सांगायला यायच्या. दोन-तीन दिवसांनी त्याच सांगत यायच्या,''नाय हो सरवणकरांनु, भाटी असतली." शेवटी तो बोकाच आहे यावर शिक्कामोर्तब झाले, ते एक-दोन expert च्या सांगण्यावरून. Expert ने निष्कर्ष काढला, तो त्याच्या मागे बोके (जे त्यांना confirm माहिती आहेत) लागतात त्याला मारायला त्यावरून.  कितीही पुढारलेल्या विचारांचे असलो, तरी तो बोका आहे हे समजल्यावर घरात मुलगा जन्मल्यावर काय आनंद होतो; तो आम्हाला झाला.
त्याचे नामकरण मी आणि बाहुलीने केले - टुटु. सुरुवातीला फक्त आम्ही दोघीच या नावाने हाक मारायचो. मग हळू-हळू इतरांच्या तोंडीपण ऐकायला यायला लागले. कधी कधी तर त्या नावाचे 'टुट्या-फुट्या ' पण व्हायचे. आज त्याने नवीन काय केले, रोजच चर्चा चालायच्या. त्याच्या बर्‍याचश्या गोष्टी खूप cute वाटायच्या. जसे की लहान वस्तूंबरोबर फुटबॉल खेळणे, धागा किवा दोर्‍याबरोबर शिकार-शिकार खेळणे, जरा पिशवीचा किवा कागदाचा आवाज झाला की खाऊसाठी म्याव-म्याव करून घर डोक्यावर घेणे. त्याची समजूत काढताना घरातले लहान होत होते, 'अरे हो बाबा, घे बाबा'. पण त्याच्या काही काही खोड्या माझ्या डोक्यात जायच्या. जसे की एखादा कागद किवा news पापर त्याच्या तावडीत मिळाला की तो उंदीर होऊन जायचा, त्या वस्तूंचा अगदी भुगा होऊन जायचा. आपण बर्‍याचदा खुचीत बसलो की पाय हलवायची सवय असते. टुटु मग पायाबरोबर शिकार-शिकार खेळायला यायचा.  तो आजू-बाजूला असला की मी खुर्चीवर मांडी घालून बसायचे. खाताना त्याचे नखरेच जास्त असायचे. बिस्कीट, फरसाण, lays ते पण american flavour वाले, चपाती ती पण गरम असेल तरच. बरे या सर्वात एक नियम त्याचा त्यानेच ठरवलेला, शेवटचे एक - दोन घास टाकून चालू पडायचे. मग आई म्हणायची त्याला,"हय ये, तुझ्या गळ्यात बांधतंय." त्याला काही फरक पडत नसला तरी आईच्या ह्या वाक्याला मला हसायला यायचे. मला डोळ्यासमोर ते चित्र दिसायचे, की ते शांतपणे मला चूक कबूल आहे अशा आविर्भावात आईच्या समोर मान खाली खालून उभे आहे आणि आई त्या टाकलेल्या तुकड्यांची माळ गुंफतेय.
असो, पण या नियमाला अपवाद मात्र होता तो मच्छीचा. त्याच्या समोर टाकलेली मच्छी तो अगदी गळ्यापर्यंत आली तरी खात होता.

आम्ही तळमजल्याला रहात होतो. टुटुला अजून खिडकीतून ये-जा करायला जमत नव्हती, मग दार थोडा वेळ उघडे ठेवायला लागे. तो जास्त वेळ बाहेर रहात नसे, शरीर-धर्म उरकला की लगेच धावत घरात येत असे. चुकून कधी दार बंद असले की दाराबाहेर तोंड वर करून वाट बघत बसायचे बिच्चारे. बोका असला तरी उन्दरापेक्षा जास्त घाबरट होता. एकदा तर चक्क एक घूस त्याच्या मागे लागली होती आणि हा जीव मुठीत घेऊन पळत घरी आला होता. जरा म्हणून त्याच्यात dashig पणा नव्हता.

तो बाहेर गेला की परत येऊ नये, अशी माझी मनोमन इच्छा असायची. एकदा तर मी चक्क त्याच्या समोर news paper ठेवला. टुटुला सवय होती समोर काही अंथरले की जाऊन बसायचे. तसा तो बसला सुद्धा. त्या बिच्चार्याला काय ठाऊक माझ्या मनात काय शिजतंय ते. मी त्या पेपरासकट त्याला उचलले आणि खिडकीबाहेर फेकून दिले. दाराबाहेर बर्राच वेळ ते म्याव-म्याव करत राहिले, मी दार खोललेच नाही. पण थोड्यावेळाने कोणीतरी दार खोलले असेल आणि हे राजे परत घरात वावरताना दिसायला लागले.

तशी आता मला त्याची सवय झाली होती म्हणा. पण अजून ते मला नकोच होते.

एक दिवस त्याला काहीतरी झाले. रोजच्या सारखाच टुटु खेळत होता आणि अचानक तो जोर-जोराने कर्कश्श ओरडायला लागला. त्याचे पुढचे दोन पाय वर उचलून उभा रहात होता. आधी आम्हाला वाटले, हि काहीतरी नवीन गम्मत असेल. पण अचानक तो जमिनीवर लोळण घेत होता. अगदी मध्येच जमिनीला चिकटत होता. मग शब्दही फुटत नव्हता त्याच्या तोंडातून. मग हालचालही बंद होत होती. खाल्लेले उलटून काढत होता. काय होत होते त्याला कळत नव्हते. सगळेच टेन्शन मध्ये आलेलो. अगदी मी पण. असे त्याचे हाल पहावत नव्हते. ३-४ दिवस झाले, तरी त्याची तब्येत सुधारत नव्हती. दुधाच्या थेंबाला तर स्पर्शच करत नव्हता. बाबा तर सारखे म्हणायचे, "चाक झाली त्येका", देवाला गार्हाणे पण झाले. पण काही फरक पडत नव्हता. घरात कोणी माणूस आजारी असल्यासारखे वाटत होते.
आता मात्र एकच इलाज होता. बाबांनी त्याला सरळ कापडी पिशवीत भरले आणि घेऊन गेले डॉक्टरांकडे. डॉक्टरांनी सांगितलेली औषधे, पथ्य-पाणी आई -बाबा स्वतः एखाद्या लहान बाळाचे करतात तसे करत होते. औषधाच्या गोळ्यांची पावडर करून ती पिठात घालून गोळी बनवायचे मग अक्षरशः त्याला पायावर पालथे घेऊन एकाने त्याचे हात पाय पकडायचे, आणि दुसर्‍याने तोंडात एक बोट घालून औषध आणि पाणी भरवायचे. ते चित्र बघून अगदी रडायला यायचे.  देवाला सांगायची, टुटु आम्हाला हवा आहे. त्याला लवकर बरे कर. आई - बाबांच्या प्रयत्नांना यश दे. असे ३-४ दिवस उलटून गेले, पण टुटु मध्ये सुधारणा नव्हती. आता आता तर तो खोक्या बाहेर पण पडत नव्हता. रात्री किचनचे दार बंद करायची गरज पडत नव्हती. त्याचे ते खेळ, म्याव-म्याव करून घर डोक्यावर घेणे, सगळ्यांचे बोबड्या भाषेत बोलणे - सगळं-सगळं बंद. आता आम्ही आशा सोडून दिली.

आणि अचानक रात्री, मी अर्ध्या झोपेत होते. माझी झोप पुन्हा उडाली. मला माझ्या पायावर काहीतरी जड-जड, गरम-गरम जाणवले. आणि तो क्षण माझ्यासाठी खूप आनंदाचा होता. टुटु त्या ३-४ दिवसांनंतर प्रथमच खोक्याबाहेर पडलेला. मी बाबांना उठवून सांगितले. तो शांत झोपला होता माझ्या पायावर. माझी भीती अद्याप चेपली गेली नव्हती. पण त्याला तिथून हलवू दिले नाही. अजून हिम्मत असती तर त्याला उचलून कुरवाळले असते. पण खरच आई-बाबांच्या कष्टाचे चीज झालेले. आणि त्याचे नाव सार्थक झालेले, टुटुला दुसरा जन्म मिळालेला.

8 comments:

  1. छान लिहल आहे टुट बद्दल...
    त्याच तुमच्या घरात येण,तुमचा त्याच्याबद्दलचा राग,त्याचा अनडॅशिंगपणा,त्याचा आजार, त्याच्याशी जुळलेल ऋणानुबंध,त्याचा पुनर्जन्म..सगळच छान मांडल आहे...

    ReplyDelete
  2. खूप खूप सही लिहिलेय...
    मस्तच....!!! :-)

    ReplyDelete
  3. बाय तु छान लिहलस आम्हाला कोणाला ये जमलचं नसतं पण खरं सांगु वाचतान हसायलाही येतं आणि आपल्या टुट्टूची आठवण येऊन चटकण डोळ्यात पाणी सुध्ता येतं कात मस्त ते दिवस होते ना असं वाटतं कि आज पण ते आपल्यामध्ये वावरतयं

    ReplyDelete
  4. Kharokar amhala pan tyachi athvan yete worli la aalo ki, karan toch ek timepass hota amacha..........

    ReplyDelete
  5. सर्कशीत सगळे प्राणी असतात पण मांजर नसते कारण तीला शिकवणे सगळ्यात अवघड असते असे म्हणतात. तुमचा लेख वाचून जुन्या आठवणी ताज्या झाल्यात. १० वर्षापूर्वी मी १ मंजर पाळली होती. तिच्या पिलांचाही सांभाळ मीच करायचो. पण १/२ महिन्यातच कुत्रे त्यांना मारून टाकायचे. असे जवळ जवळ ५/६ वर्ष मी त्या मांजरीला सांभाळले. त्यातला १ बोका खूप हुशार होता. त्यावेळी गांवात सगळ्यांकडे टीव्ही नव्हत्या म्हणून आम्ही गल्लीतल्या एका घरी टीव्ही बघायला जायचो. रात्री १०-११ वाजता मी १०० लोकांमध्ये बसलेलो असलो तरी बरोबर मला ओळखून तो मांडीवर बसायचा. मी बाहेर जाताना त्याला चप्पल घालताना दिसलो कि तो माझ्या अगोदर बाहेर पाळायचा. हे त्याला समजू नये म्हणून मी चप्पल हातात घेऊन जायचो. दररोज रात्री तो माझ्याच अंथरुणात झोपायचा आणि रात्रभर त्याची गुर्रर गुर्रर चालायची. मी दुपारी कोलेज वरून घरी आल्यानंतर तो चुलीवर बसून माझी वाट भाघायचा.
    पिण्यासाठी त्यांना दूधच हवे असे काही नाही आपण जे खातो तेच ते खायचे. (पोळी, भाकरी, खिचडी, लाडू....) गांवाकडे घरात खूप उंदीर असायचे. तेव्हा हे घरातले उंदीर कधीच मारत नव्हते. पण बाहेरचे उंदीर खाण्यासाठी मात्र माझ्या घरात आणायचे, तेव्हा खूप चीड आणि राग यायचा. त्यांना कितीही मारले तरी ती उलटून कधीच चावले नाहीत. ते दिवसभर घरातच फिरायचे. त्यांचा केस चुकून जरी जेवणातून पोटात गेला तर ओपरेशन करावे लागते असे सगळे म्हणायचे म्हणून ते कुणालाच आवडत नव्हते.
    सांगण्यासारखे खूप काही आहे. पण मुक्या प्राण्यांवर प्रेम करणारे लोकच ह्या भावना समजू शकतात. ............

    ReplyDelete
  6. पुन्हा एकदा आभारी आहे राजेंद्रजी,
    तुमची भरभरून लिहिलेली कमेंट खूप खूप खूप आवडली...
    तुमचा टुटु वाचायला आवडेल...
    सध्या लिहायला जमत नाही आहे.....पण कमेंट वाचून आता लिहायलाच हवे असे वाटायला लागलंय...

    ReplyDelete