माझं जग...माझं आभाळ

माझं जग...माझं आभाळ
थोडंसं वास्तव परिस्थिती पासून दूर जाऊन, कधी एक-एकट तर कधी कोणी सोबत घेऊन ...

Sunday, February 6, 2011

श्श्श...!!!


सर्वांनी लागणारे सामान जसे की अंथरुणं, चादरी, उशा घाई-घाईने जसे आठवेल तसे भराभर पण ’हु की चु’ न करता नेले.
मी अलगद पांघरुन सरकवले त्याच्यावर. झिरोचा बल्ब ऑन केला. बल्ब ऑन करतानाचा बटणाचा ’खट’ करुन आवाज होऊ नये म्हणुन सर्व भार पोटात झेलला. रुममधला मुख्य दिवा ऑफ केला. बटणाच्या आवाजाच्या बाबतीत बल्ब ऑन करतानाची सर्व प्रक्रिया रिपीट. इतक्या हळुवारपणे सर्व घडत होते तरी धाकधुक होतीच.
न राहवुन जवळ जाऊन एकदा ती इवलीशी ’डेंजर’ मुर्ती वाकुन पाहिली. अंधुक प्रकाशात पण blanket खाली लपलेला माझा काजळ-तिटीवाला चांदोबा उठुन दिसत होता. इवल्याशा चेहर्‍यावर ती तीट भली मोठी दिसत होती. गच्च मिटलेले इंटु-पिंटुकले डोळे. काजळ-तिटी इतकेच उठुन दिसणारे पापणीचे लांब केस.  खरंच किती गोड दिसतो असा. भुरु-भुरु केसांना हिंमत करुन थोडे तेल लावले. श्वास थांबवुन त्याच्या गालांना, थंड-थंड नाकाला गालानेच स्पर्श केला. वरच्या ओठाच्या तावडीतुन खालच्या ओठाची सुटका करण्यासाठी हनुवटी हलकीच दाबली. गाल अजुनही हुप्पच. कोणासारखा दिसतो बरं? त्यांचा सारखा? की माझी कॉपी? इतका वेळ पहाणं बरं नाही. आईची नजर जास्त लागते म्हणतात.
झाले, अचानक इतका वेळ कोंडले गेलेले दोन्ही हात त्यांच्या वरच्या blanket चे वर्चस्व झुगारत एकाच वेळी बाहेर पडले. मग त्या चळवळीत पायांनी सहभाग घेतला. चुळबुळ करत चिमुकल्या हातांनी चिमुकल्या नाकावर हल्ला चढवला. ’नाही-नाही’ करत नाक इथुन-तिथे पळत होते. दंगल उसळण्याआधी आटोक्यात आणनं सर्वांच्या हिताच्या द्रुष्टीने गरजेचे होते. त्याला कुशीवर वळवुन ’ये गं गायी गोठ्यातं’च्या चालीवर थोपटायला सुरुवात केली. हुश्श... पुन्हा एकदा राज्यात शांततेचं साम्राज्य पसरले.

याआधीच म्हणजे अगदी काही मिनिटांपुर्वीच हे चिमुकलं तुफान थंड झालं होतं.

"जिंग्ग टु टु टु......"
अरे बापरे, याला मध्येच कसं आठवलं ’जिंगल टून’?
तुम्हाला ’जिंगल टून’ माहिती असेलच. लेकुरवाळ्यांना तरी ग्रुहीत धरायला हरकत नाही. जिंगल टून म्हणजे मराठी बाल-गीतांचे अनिमेटेड कलेक्शन. असो.

झालं असं की एकतर Laptop ह्याचे काका काही कामासाठी म्हणुन घरी घेऊन गेलेले. त्याला विसरंवायला म्हणुन मोबाईल पुढे केला.
"हे घे बाबु....मिबाईलमध्ये गाणं लाव तुझं"
साधासुधा नाही, चांगला ८-१० हजाराचा मिबाईल सोर्री मोबाईल. (हल्ली चुकुन कधी ऑफिसातपण  पण त्याच्या भाषेतला एखाद-दुसरा शब्द बाहेर पडतो.) मोबाईलच्या किमतीचं कौतुक आपल्याला. त्याला मोबाईलच्या किमतीशी काही देणं-घेणं नाहीच. मोबाईल फेकताना त्याच्या किमतीचा काही उपयोग नसतो ना. त्याने शांतपणे हसत-हसत मोबाईलचा स्विकार करुन क्षणाचाही विलंब न-लावता जाईल त्या दिशेत मोबाईल भिरकवुन दिला. हे मध्ये आले नसते तर भिंतीवर आपटुन त्या बापड्या मोबाईलचं काय होणार होतं, हे लिहायला नको. पण इथे बिच्चारा झाला ’बाबा’. असो, मोबाईल सलामत राहिला नसता तर या बिच्चार्‍या बाबाने मला बिच्चारं करुन टाकलं असतं त्याच्या हातात मोबाईल दिला म्हणुन.
"जिंग्ग टु टु टु आव ना....."
"अले, कम्पुटल उंदील घेऊन गेला ना, मग कसं लावणार ’जिंगल टून’?"
जी वस्तु त्याला द्यायची नाही म्हणुन लपवली जाते किंवा खरंच उपलब्ध नसते ती वस्तु उंदीलमामा घेऊन जातो.
"ओलल....ओलल...ना उंदिल्ला."
"ए.....उंदील अको कलु अशं...ओरडली. बश?"
"ए....तु पन ओलल...", बाबावर हुकुम सोडण्यात आलेला.
"ए आई, पप"
"अ अ अं..ह्य ह्य ह्याआआआआआ"
"मला नको, उंदराला ओरडा हो."
"ए, उंदील जा इथुन."
कानाकोपर्‍यात थोडसं वाकुन उंदीरमामाला आव्हान केलं गेलं.
"कको कलु ना...अट्ट....लब्बाल....माल्नाल. तिके ज़ा तिके ज़ा ना.", उंदीरमामाला उगारलेला एवलाशा हात  कानापर्यंतची उंची गाठत नाचत होता.
मग वन बाय वन आजोबा-आजी दोघांना वटहुकुमाचे पालन करायचे आदेश देण्यात आले.
"चल...", असे म्हणुन माझा हात पकडुन मला ओढायचा प्रयत्न सुरु झाला. प्रयत्नांची दिशा दाराकडे बोट दाखवत होती.
"अरे सोन्या, बाहेर कोणी नाही आहे. सगे जो-जो करतायत. बाप्पा तुला गंदु-बॉय बोलनाल. छी, अद्वैत इज गंदु-बॉय."
"टेअस....टेअस जाऊ ना"
"ए टेरेसवर बुवा बसलाय. तुला पकलनाल. बाप्पे....अको अको."
"छोल...छोल.....अचु दे....छोल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल.........", म्हणत साहेबांनी दारात लोळायला सुरुवात केली.
अशा वेळेला त्याला उचलुन घेणं म्हणजे (विक्रमी पॉज).....जाऊ दे, काय लिहु सुचत नाही आहे (अशा प्रसंगी माझी स्थितीपण अशीच होते).
कशी-बशी बाल्कनीतुन 'स्टार्स' बघण्यावर मांडवली होते.
मग मच्छरांच्या थव्यासोबत इकडुन तिकडे चकरा मारत चांदण्या काऊंट करायला सुरुवात केली जाते.
"टु... थी... फोल... बोल ना...तु बोल"
"फाईव्ह, सिक्स, सेव्हन, एइट?"
"नाई, ट्टेन"
"अले वा....अद्वैत इज?"
"गुब्बा"
"हा गुड बॉय....आता आदी जो-जो कलनाल. हो ना?"
माझ्या एका खांद्याचा स्टिअरींग सारखा उपयोग करत बाल्कनीतुन बाहेर पडणार्‍या आईच्या लबाड पायांना पुन्हा बाल्कनीत वळवलं जातं.
"बोल ना ...टिंकाल-टिंकाल..?"
"लिटील स्टार्स"
"हाय मर वंदल.. वाटु...?"
"आर...अप अबोव्ह द?"
"आय"
"अप अबोव्ह द वर्ल्ड सो हाय...लाईक अ डायमंड?"
"इंग्ग क्काय"
"अले वाह...मत्त मत्त....."
"मोनु चावा." (मोनु = किडा, मच्छर इ.)
"बघ चावला ना...मोनु तुला. चल आत जाऊ या."
"तिके तिके.....आह्याह्याह्याआ"
बिल्डींग मधले आणि बाहेरचे जागे होण्याआधी कसे-बसे त्याला घेऊन घरात घुसण्याचा माझा बापडा प्रयत्न आणि आदीराजे फुल्ल बाजीप्रभुंच्या रोलमध्ये घुसुन खिंड लढायच्या मुडमध्ये.
"ती बघ आजीने तुझी खेळणी घेतली. चल आपण काढुन घेऊया." असे म्हटल्यावर खेळण्यांच्या बास्केटकडे कुच केली जाते.
मग खेळण्यांचे बास्केट पुर्ण ओतुन रिकामी केलं जातं. मग आदीराजे त्यात बसुन रथ हाकायचा हुकुम सोडतात. या रुममधुन त्या रुममध्ये, त्या रुममधुन या रुममध्ये नगराची पहाणी केली जाते. जेव्हा घोडे दमतात किंवा महाराजांना ते तसे वाटायला लागतात, तेव्हा त्यांना हाकलुन देऊन महाराज स्वतः रथातुन उतरुन रथ ढकलयला लागतात. मग वाटेत येईल त्या वस्तुचा चुराडा करत भरधाव स्पीड मध्ये रथ फिरत राहतो. घोडे महाराजांना झेलायला रथामागुन धावत असतात.
(घोडे नुसते वरातीमागुन नाही तर कधी रथामागुन पण धावतात)
घोड्यांचा अंदाज चुकतो आणि मग ’आआआईईईईईईईईईईए..ह्याह्याह्याह्या गुणिले १००’

फायनली आईला शरण जाऊन दोन्ही हात वर करुन, "उच्चुन घे नाआआआआआआआआ..."
"ये रे माझा बाळ तो....उगी उगी. कुनी माल्लं? आपण मार देऊ हा."

बाळराजे खांद्यावर डोके ठेवताच झोपी जातात. आणि पुर्ण घर पुन्हा जागच्या जागी जाऊन बसतं. 

आता थोडावेळ तरी सगळे सुखाने एका जागेवर बसु शकणार असतात. सगळ्यांच्याच चेहर्‍यावर एक ’हुश्श्स....’वाला रिलाक्स भाव झळकत असतो.

नुसते बसुन वेळ वाया न-घालवता अंथरुणं करण्यासाठी बळ एकवटलं जातं. राजे कोणत्याही क्षणाला ’मोनिन’ डिक्लेअर्ड करु शकत असल्याने मिळेल तेवढे झोपेचे सुख पदरात पाडुन घेण्यासाठी मनातल्या मनात निद्रादेवीची आराधना सुरु होते.

6 comments:

  1. अरे वा.. तुमच्याकडेही आदीराजे आहेत तर :) सहीये.. :)

    ReplyDelete
  2. हेरंब,
    ब्लॉगला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार...
    तुमच्या आदीराजेंना भेटले तेव्हा त्यांचे नाव माहित नव्हते. (इतर पोस्ट वाचल्यानंतर माहिती झालं)
    जेव्हा माहिती झालं, तेव्हा मनातल्या मनात मी देखील असंच म्हटलेलं.... अरे यांच्याकडे पण एक आदी आहे!!!
    सारांश : सर्व आदी हे एक सारखेच असतात , हो की नाही ;)

    ReplyDelete
  3. Aawadle.. mast

    Aniket
    http://manatale.wordpress.com

    ReplyDelete
  4. धन्यवाद अनिकेत.

    ReplyDelete
  5. Ek Zhakkas Lekhach Lekachya navane lihilas ga
    mastach aahe

    ReplyDelete
  6. धन्यवाद प्रकाश

    ReplyDelete