माझं जग...माझं आभाळ

माझं जग...माझं आभाळ
थोडंसं वास्तव परिस्थिती पासून दूर जाऊन, कधी एक-एकट तर कधी कोणी सोबत घेऊन ...

Wednesday, May 11, 2016

A mother's day gift

आदुचा नाश्ता झाला. रविवार होता. मी काहीतरी वर्तमानपत्र चाळत बसलेले.
तसं आदल्या दिवसापर्यंत लक्षात होतं माझ्या.
एका जाहिराती खाली शुभेच्छा दिसली. लगेचच आदुला दाखवावं म्हणून त्याच्या समोर ती जाहिरात धरली.
आदुला G.K. मध्ये काही दिनविशेष होते पाठांतरासाठी.

असंच एकदा त्याला झोपवत असताना त्याची काहीतरी चिवचिव चालू होती.
'अरे, आज लवकर येता आलं असतं तुला .'
'कसं रे?'
'मम्मा, आज woman's day होता ...विसरलीस?'
'हो का? मला काय माहीत ...तु wish कुठे केलंस मला ?'
'सॉऽअॉली मम्माऽआ...हे घे .... आता करतो .'
पण पूर्ण दिवस संपल्यावर कळलं म्हणून उगीचच त्याला चुकल्यासारखं वाटलं असावं.
एवढासा जीव...पण किती त्या काळज्या...

आदुला reading  बर्यापैकी जमतं.
'अरे, ते नाही रे ...त्याच्या खाली काय लिहीलंय ते वाच.'

त्याचे डोळे चमकलेच. माझ्या गळ्याभोवती चिमुकले हात धरुन , माझ्या कानात त्याचे गोड गोड शब्द विरघळत होते.
'Happy mother's day mumma.'

मला काही gift वगैरे हवंय का ते पण विचारले त्याने. खरंच इतकं गोड होतं सारं.
थोडा वेळ गेला असेल , त्याला पाणी हवं होतं. तोच म्हणाला , मी घेतो .
मग आतून पाण्याची बाटली नी ग्लास आणून माझ्या समोर ठेवले. मी त्याला पाणी अोतून दिले.
'आधी तु पी मम्मा.' ...आश्चर्य वाटलं.
'का रे, पिल्ला?'
'अरे, आज mother's day ना.' त्याचे पिल्लुसे डोळे विस्फारलेले.
'अच्छा...' मी पण तेवढेच डोळे विस्फारून.

मग दुपारी आम्ही ludo पण खेळणार होतो . दुसऱ्या दिवशी रविवार आला की हे सगळं आदल्या रात्रीच ठरतं. साधारण दुपारची जेवणं वगैरे होईपर्यंत तो वाट पाहतो. मग त्या नंतर 'मम्मा-मम्मा' non-stop जयघोष.
'मम्मा, तुला कोणता कलर?'
'कोणतीही चालेल बच्चा.'
'सांग नऽऽ' ...बस्स फतवा...
'Yellow वाली माझी, Ok?'
'हम्म, माझी ग्लीन. first तु मम्मा.'
सोंगट्या वाटप पार.
'मम्मा, आज तुला घाबरायची फिकर नाही. तु माझ्या पुढे असणार ना, तरी पण मी तुला नाय उडवणार. आणि मम्मा, तु माझ्या मागे असणार ना...मग हाय ना...तु मला उडवशील ना, मी काय नाय बोलणार...ok मम्मा' , अस्खलित अभय मिळालं मला.
'का? का? मम्माचे एवढे लाड कशाला चिऊ?'
'मम्मा, आज mother's day.... विसरलीस?'
'आई गं!.....' खुप क्युट...

दुपारभरात किमान चार वेळा तरी कन्फर्म केलं असेल, 'मम्मा, मी तुला सतवलं नाही ना आज?'
मला खुप हसायलाही येत होतं आणि कौतुकही वाटत होतं.
संध्याकाळी बॅडमिंटनच्या वेळेला तर हाईट. व्यवस्थित रॅकेट मला आणि केस तुटलेलं स्वतःकडे...(actully त्याची जाळी तुटलेली असल्यामुळे आदु असा उल्लेख करतो )
'मला चालेल राजा ते.'
'नको ना मम्मा, mother's day...तु विसरते बाबा'
मग मात्र मला नाही रहावलं. पिल्लुचे खुप पा घेतले ...खुप पा...खुप...खुप...

Sunday, September 16, 2012

he loves me, he loves me not...

त्या दिवशी valentine day होता. खरंच आदल्या रात्री विचाराने झोप नव्हती लागलेली. खात्री होती तो नक्की विचारणार. ’पण तो फक्त as a friend म्हणुन माझ्याकडे बघत असेल तर?’, त्याला कोणी 'दुसरी' आवडत असेल तर?  शी बाबा डोकं सुन्न झालेलं. नको नको ते विचार भंडावुन सोडत होते.
तसं त्याला मी आवडते, हे ग्रुपमध्ये जग-जाहीर होतं. बस प्रपोज नावाची formality राहीलेली.

त्या दिवशीचं  वातावरणच असं होतं की लेक्चरला बसायचा कोणाचाच मुड नव्हता. पण पुढचे चारही lectures होते work -shop चे, म्हणजे शिंदे सर. बंक तर करु शकतच नव्हतो शिवाय job  submission होतं.  माझ्या मनात चाललेली घालमेल पुर्णतः वेगळी होती. work - shop  मध्ये शिरेपर्यंत मागे वळुन वळुन पाहिले. तो नाही दिसला.

’actually याचं नेहमीचच आहे. जेव्हा पाहिजे तेव्हा येणारच नाही. आज सुट्टी नको घेऊ देत म्हणजे झालं. देवा प्लीज येऊ देत तो.’

फक्त submission होतं म्हणून लवकर सुटका झाली.

नेहमीप्रमाणे क्लास संपल्यावर canteen ला हजेरी असायची. वाटलं आजचा दिवस फुकट. मुड आता अजिबातच नव्हता. पण नाही गेलो तर दिसण्यात येतं.  म्हणुन चुपचापपणे सर्वांसोबत फिरत होते.
आभूचं काहीतरी बिनसलेलं म्हणून नेहमीप्रमाणे आज माझी फिरकी घेत नव्हता. पीपी,विवेक, Sandy , उदय, बालू  आज almost बाकीचे सर्वजण हजर होते.
श्याम गायब होता. त्याच्या नावाप्रमाणे तो हा दिवस गाजवत होता.
चहा एव्हाना बर्फ झाला. मी स्वतःशीच वैतागून 'chkk' केले. आभूला त्या आवाजाने irritate व्हायला होते. already त्याचा मूड नव्हताच. त्यात अजून वैतागत होता. दिपू सारखी मला बघून वेड्यासारखी काय झालं म्हणून सर्वाना समजण्यासारख्या खाणा-खुणा करत होती.
विवेकचा मोबाईल वाजला.
"अरे किधर है?"
’नक्की त्याचाच phone ’ माझे आपले स्वतःशीच तर्क-वितर्क.

साहेब band - stand ला आहेत, एवढे कळले.
कळी खुलणे वगैरे काय म्हणतात तसे माझे झाले. मनातल्या हालचाली चेहर्‍यावर दिसू नयेत म्हणून तुटक प्रयत्न चाललेले माझे.
"हे आपल्या hero  चा फोन होता. तो band-stand ला आहे. आपल्याला तिथे बोलवलय. so lets move."
तिथे पोहचेपर्यंतची वीस-पंचविस मिनीटे माझ्यासाठी संपता संपेनाशी वाटायला लागलेली.
Band-stand जस- जसे जवळ येत चाललेले,  heart-beats 90 -95 ...100 वगैरेच्या जवळपास आले असतील. दोन ठोक्यान मधले अंतर अगदी कमी होऊन, हृदयाचे breaks fail- bill तर नाही ना होणार, असा पाणचट विचार पण येऊन गेला.
finally अड्ड्यावर येऊन ठेपलो.
14th feb चा सूर्यास्त, फेसाळलेला तो काठ कोणीतरी गुलाल उधळल्यासारखा.
सूर्यबिंब कोणत्याही क्षणी नाहीसं होणार होतं.
हवेत गारवा क्षणागणिक वाढत होता.
आज अर्थात crowd नेहमीपेक्षा जास्त होता.
एक मोठासा rock बघून सर्वांनी ठिय्या मांडला. आता कोणत्याही क्षणाला तो येईल...mind preparation चाललेलं.
मी शक्य तितकं त्यांच्यात mix व्हायचा प्रयत्न करत होते. पण 'त्या'च्या  नसण्याने मला फरक नाही पडत, असं मी कितीही मोकळं वागून पटवून देऊ शकत नव्हते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरची smile जणू मला सांगत होती, 'अगं पुरे गं बाई, माहित आहे आम्हाला.'  मी formality म्हणून त्यांच्यात बसलेले, हे कोणी जर मला बोलले असते तरी मी ऐकून घेतले असते.
सूर्य केव्हाच तिथून पसार झालेला.
उरलेल्या गुलाबी निळ्या प्रकाशात नेहमी सारखा एकाकी असा तो, सगळ्यांपासून दूर लाटांचे तुषार झेलत अखेर दिसला बाबा.
मनातल्या मनात ३-४ flying kiss
'किती miss करायचं रे तुला...'
मनात आलेलं उठून जावं सरळ त्याच्याकडे आणि सांगून टाकावं सारं जे मनात आहे ते. जे होईल ते होईल. जास्तीत जास्त काय तो हो बोलेल किंवा नाही बोलेल. परत काळजात धस्स झालं. 'नाही' बोलला तर ....शुभ बोल मना...शुभ बोल...
तोच समोर येऊन बसला. नजरेनेच विचारलं मला 'कसा आहेस बच्चा?'
मी नजरेनेच म्हटले,'दमले रे तुझी वाट बघून'
त्याच्या एका भुवयीने उंचावून का असे विचारले...
मी मानेने म्हटले, 'काही नाही.....'

कसं समजावू त्याला आता.
खरच मग मलाच वाटायला लागतं, याच्या मनात तसं काहीही नसेल. मीच वेडी झालीय.
पण...एक मन सांगायचं 'अगदीच असं काही नसणार.....' त्याला मी आवडते...असं का वाटावं?
मला माहित आहे, ग्रुपमध्ये असताना तो माझी प्रत्येक प्रतिक्रिया note करत असतो.
त्याला सगळं सगळं कळत असतं... मी खुश आहे की माझा मूड उडालेला आहे.
मी शांत असल्यावर 'त्या'लाच जाणवतं. मस्करी चालू असताना मी हसतेय की मला राग येतोय, हे बघून तो परीस्थिती सावरतो.

माझ्या छोट्या छोट्या गोष्टी पण तो note करत असतो. 
त्याला माझ्या बऱ्याच सवयी माहिती आहेत. जसं की मी ओढणीच्या टोकाला गाठ मारून ठेवते... कधी कधी त्यात सुट्टे पैसे पण बांधते मी...माझ्या तळहातावर 'S' लिहिलेला असतो...बसमधून उतरल्यावर तिकीट मी फेकून देत नाही ते फोल्ड करून wrist -watch च्या पट्ट्याला अडकवते...  माझ्या बऱ्याच वाक्यांमध्ये 'hello' आणि 'ok' हे दोन शब्द असतातच. यासारख्या बऱ्याच गोष्टी त्याला माहिती आहेत.
कॅन्टीन मध्ये पण तो माझ्या समोरच्या खुर्चीवर बसतो. मी अगदी गरम किवा अगदी गार झालेला चहा नाही पीत हे त्यालाच का लक्षात रहाते?
अगदी एखादी केसाची बट मला त्रास देत असेल तर खुणेने मला तो तिला बाजूला करायला सांगतो.
टुटु कसा आहे? हे सुद्धा न चुकता तो विचारतो.
माझे सोमवार आणि शनिवार त्यालाच लक्षात राहतात. त्याला मी ज्या बसने येते त्याचे नंबर पण कारण नसताना ठाऊक आहेत(?)
जेव्हा जेव्हा माझी नजर त्याच्याकडे जाते, तेव्हा तेव्हा तो मलाच पहाताना दिसतो. तो माझ्याशी बोलत नसला तरी तो माझंच ऐकत असतो.

तो तसा आमच्या दोघींशी कमीच बोलतो. दिपुशी तर जास्त रफ बोलतो. म्हणजे तिला अगदी त्रस्त होऊन उत्तर देतो. माझ्याशी बोलताना त्याचा टोन थोडा soft वगैरे वाटतो. ते इतरांना जाणवू नये म्हणून कधी कधी खोटं खोटं माझ्याशी पण 'दिपुवाला'च टोन ठेवतो. पण मला राग-बिग आला नाही ना म्हणून confirm पण करतो.
तो क्लास च्या team चा captain आहे. मला गांगुली आवडतो हे पण त्याला माहित आहे. तो नसला की आभू 'captain की याद आ रही है क्या?? ' असं purposely विचारतो.

त्यादिवशी तर साखरपुढ्याचे पेढे मी समोर केलेले, पण ते दादाच्या साखरपुढ्याचे आहेत हे ऐके पर्यंत त्याने त्याला हात नाही लावला. त्याचा अर्थ काय होता?
शिऱ्या म्हणजे आमचा senior. त्याच्या ताईच्या लग्नाला पुण्याला म्हणून गेलेलो आम्ही सर्व. घरी उशीर होईल म्हणून सांगायला फोन करायचा होता मला. न सांगता त्यानेच त्याचा cell पुढे केला. मग माझं बोलून-बिलुन झालं. आणि cell त्याला return केला. थोड्या वेळाने दिपूच्या लक्षात आले माझ्या गालाला हळद लागलेली. तिने रुमालाने पुसत पुसत 'कशी लागली?' म्हणून विचारलेलं. तो तिथेच होता सर्व पहात. म्हणाला 'माझी हळद लागली' म्हणून. माझ्या पेक्षा तीच जास्त चकित झालेली. 'अरे म्हणजे ती आता cell वरून बोलली ना.  तो या खिशात होता आणि त्यात अक्षताही होत्या.' त्याने मग तिला असं सांगून सारवासारव केली. तिचे समाधान झालेले पण मला त्याने अजून एक हिंट मिळालेली.

एक ना दोन...किती तरी दाखले हेच सांगतात, तो पण माझ्याबद्दल विचार करतो.
पण यार, मला हे कळत नाही आहे 'तो विचारत का नाही अजून???'

मी माझ्या तंद्रीतच होते वाटते. कधी नव्हे ते माझ्या ग्रुपला शहाणपण सुचलं.
मी पाहिले की त्या rock वर फक्त तो होता आणि मी होते.
साक्षात तो माझ्या समोर बसून आज अगदी माझ्या नजरेला नजर देत होता. मला अवघडल्या सारखे वाटायला लागलेले. कारण मी कल्पना पण केली नव्हती की आज असं काहीतरी घडेल. आता खऱ्या अर्थाने मी गार पडलेले.
काय बोलू सुचेल तर शपथ. बराच वेळ असाच गेला.
मला काही ऐकू येईनासे भासायला लागलेले. जसं काही आमच्या आजू-बाजूला कुण्णी कुण्णी नाही. फक्त समुद्राच्या लाटांचा फेसाळलेला आवाज जाणवत होता.
''आज का शांत आहेस?'', शेवटी त्याने सुरुवात केली.
''असंच, काही खास नाही.'', मी म्हणाले.

तो थोडंसं सरकून माझ्या बाजूला येऊन बसला.
''मग काय केलंस आज?'' , त्याने विचारले.
''काही नाही'' ओठातच अडकल्यागत वाटत होते. घसा कोरडा खरच होतो अशावेळी. छोटी छोटी वाक्ये सुचायला पण efforts लागत होते.
"आज आला का नाहीस?", मी असं विचारल्यावर फक्त हसला.
इतका वेळ माझ्या कपाळावरून रेंगाळणारी ती एक बट त्याने त्याच्या हाताने बाजूला केली. आपसूकच माझ्या पापण्यांची उघडझाप झाली.
असे वाटत होते की आभाळ गच्च दाटून आलेय. केव्हाही बरसायला सुरुवात होईल.
त्याने माझा उजवा हात स्वतःच्या हातात घेत विचारलं, ''मला तुला काही सांगायचं''
माझ्या कपाळावरच्या आठ्यांना त्याने हलकीशी टिचकी मारली.
''तु काही विचारलंस मला आता?'', मी क्षणभर भांबावून गेलेले.
''come on ....बच्चा. तुला सुद्धा माहित आहे, मला जे सांगायचेय ते. Hey, by the way... तुझा हात किती गार आहे. ''
दीर्घ श्वास घेऊन तो शांतपणे म्हणाला, ''Now I have started liking you .''
येस्स्स..........., तो बोलला हे ?? मला विश्वास बसत नव्हता माझ्या कानांवर.
आता मला काही काही ऐकू येत नव्हते, लाटांचा आवाज पण.
मी कुठल्यातरी वेगळ्या जगात पोहोचलेले. अशी मनः स्थिती व्हायला पण नशीब लागते. आपण ज्याला like करतो, तो पण आपल्याला like करतोय, असं जेव्हा कळतं ते जे feeling असतं ना ..its really amazing यार ....
I have started liking you now हे वाक्यच फक्त कानात घुमत होते. मनात प्रार्थना करत होते की 'देवा, प्लीज हे स्वप्न नसू दे...प्लीज प्लीज प्लीज ....'
''बच्चा, काय झालं? मी तुला आवडतो का असे नाही विचारणार मी. मला जे माहित आहे ते समोर आहे. तुझ्या डोळ्यात नेहमीच वाचतो मी.''
मी अवाक होऊन बघत राहिलेले त्याला. तो क्षण तसाच धरून ठेवावासा वाटत होतं.
अचानक त्याला काहीतरी आठवलं वाटतं. खिसे चाचपत तो समोर उभा राहिला. त्याने एक हात पुढे केला. मला वाटलं आता निघायचं आहे. म्हणून मी पण उठले.
खिशातून त्याने एक चॉकलेट आणि गुलाब काढले. माझ्यासमोर एक गुडघा टेकत अगदी फिल्मी style मध्ये उभा राहिला.
मला थोडं अजून अवघडल्यासारखे वाटायला लागलेलं. मी आजू-बाजूला कोणी पहात तर नाही ना, म्हणून नजर टाकली. सारं जग स्वतःच्या धुंदीत होतं. आणि तितकासा उजेडही नव्हता. मला पण मग हिरोईन वगैरे असल्यासारखं फील व्हायला लागलेलं. ते सर्व स्वीकारताना माझा हात थरथरायला लागलेला.

"happy valentine day, माझा बच्चा"

''हे ऐकायला किती किती वाट पाहायला लावलीस रे ....तु खुप खुप वाईट आहेस... ...आज तु बोलला नसतास ना...मी तुला कधी कधी हो म्हटले नसते बघ...''
आवाज जड झाला आणि शब्द सुचेनासे झालेले.
माझ्या गालावरचा अश्रू त्याने अलगद बोटाने टिपला.
''खरच वेडू आहेस. डोळे पूस. घरी जायचं की नाही?''
त्याने वेडू म्हटलं की एकदम मी इल्लुशी पिल्लुशी होते.
आज पहिल्यांदा तो माझ्या घरापर्यंत आला. दादा कुठे आजू-बाजूला नाही ना, म्हणून मनात धाक-धुक वाटत होती.
आम्ही सोबतच चालत होतो. पण एकमेकांशी काही संबंध नाही याप्रमाणे.
आमची बिल्डींग यायच्या आधी एका कोपर्यावर त्याने टर्न घेतला.

टुटु बिल्डींगच्या दारातच होता. माझ्या पायात घुटमळत तोही घरात आला.
sandal काढता काढता दारातूनच एक परिस्थितीचा अंदाज घेतला. नॉर्मल वाटलं सर्व.
दादाला TV बघताना पाहिल्यावर जीवात जीव आला.

आई जेवायची थांबलेली. भेंडीची भाजी मी रोजच्या सारखी नाही खाल्ली ते तिला जाणवलं. म्हणून तिने घास-बीस पण उतरवून टाकला माझ्यावरून. तेव्हा मला समजलंच नव्हतं आई ने काय केलं ते. कदाचित आईला झोप पण लागली नसेल त्या रात्री.

झोप तर  मला पण  लागणं शक्य नव्हतं त्या रात्री तरी.
सारखं उठून बाहुलीशी तरी शेअर करावंसं वाटत होतं. मग चॉकलेटचं wrapper दोन तीन वेळा bag मधून काढून काढून पाहीलं. शेवटचं पाहून ते पैशांच्या पर्स मध्ये ठेवलं. भीती वाटली बाहुलीच्या हाताला लागलं तर सरळ ती कचर्यात फेकून बिकून द्यायची. rose तर  त्याला परत दिलेलं मीच. म्हटलं उगीच रिस्क नको, बाहुलीच्या हाताला लागलं तर?

आनंद ओसंडून वाहणं काय असतं ते कळत होतं त्यादिवशी. काय फील होतं कळत नव्हतं. लहानपणी दिवाळीच्या आदल्या रात्री अशी एक हूर-हूर असायची. एकदा पाकिस्तान विरुद्धच्या  match मध्ये शेवटच्या दोन balls मध्ये तीन रन्स करून आपण जिंकलेलो. अगदी तसंच काहीतरी फील करत होते. आभूच्या भाषेत मनात लाडू फुटत होते.
रात्रभर डोळे मिटूच शकले नाहीत. आपल्यामधून असं काहीतरी light वगैरे बाहेर पडतेय वाटत होतं.  आठवलं दुसर्या दिवशी रविवार. पहिल्यांदा रविवार नकोसा वाटलेला.
दिपुला फोन केला तर नेमकी ती बाहेर गेलेली. म्हणजे सोमवार शिवाय गत्यंतर नव्हते. आयुष्यात पहिल्यांदा सर्वात मोठा दिवस फील केलेला. but it was gr8 day of my life....really...!!!

Sunday, January 8, 2012

Non-sense

बस्स... It's enough yaar
आता आयुष्य पुरे कर बाबा
डोळे कायमचे बंदच करून टाक ना
फिरून जन्म नकोय मला, बस ठरले...

जन्म म्हटलं की फुकटची नाती आली
जात-पात, परीस्थिती...
देह, त्यात रंग-रूप, बुद्धी आणि महत्वाचं असं बरंच काही
आधीच ठरवून ठेवलेले
choice वगैरेची काही सोयच नाही
असली कसली Scheme आहे ही तुझी?
सारं गळ्यात मारल्या सारखं नाही वाटत तुला?

काय कमाल आहे हं तुझी पण
नाना तर्हेचे खेळ खेळतोस
कथा, पटकथा, छायांकन, निर्माता, दिग्दर्शक पासून ते अभिनय, सजावट, रंगमंच
सबकूच तुझंच आहे की
तुझ्याच कटपुतळ्या, त्यांना नाचवणारा तूच
आणि बघणारा एकमेव तु, तु आणि तूच
मला एक सांग अर्थ आहे का याला?
कधीतरी कंटाळशील तेव्हा काय होईल?

कर्म करत रहा, फळाची अपेक्षा करू नका
यातले कर्म, ते करण्यासाठीची हवी असलेली बुद्धी-दुर्बुद्धी
फळ काय द्यायचे rather ते द्यायचे की नाही
न्याय - अन्याय 
हे सर्व कोण ठरवतो रे?
निव्वळ फालतुगिरी वाटते मला तर

जन्मापासून, जन्मभर नाही म्हणता येणार
कसले कसले बंध
नाती- गोती, सखे- सोबती, वैरी
यातले काही जन्मोजन्मी हवेसे... काही डोक्यात जाणारे
बरं मिलन आणि विरह वर तुझ्याच department under
काळ नावाचा तुझा monitor आहेच सदैव watch ठेवून
त्यानेच शेवट ठरवलेला.....
Format करून काय मिळतं रे तुला???

तुझं Logic, तुझं Magic
तुझे व्याप तूच दिलेल्या बुद्धीला bouncer
बस कर बाबा... तुझी चक्रं, चक्कर यायला लागली
जमलंच तर संपवून टाकना एकदाचं
तुला न जमायला काय आहे त्यात...
गंमत वाटतेय का सारी?
मला माहित आहे, हसतोयस तु गालात
पण हसताना गोड-बिड दिसत असशील का ते भेटल्यावर कळेल...
भेटू मग लवकरच
Dying to meet you...

only yours .....don't want to say faithfully ;)

Sunday, February 6, 2011

श्श्श...!!!


सर्वांनी लागणारे सामान जसे की अंथरुणं, चादरी, उशा घाई-घाईने जसे आठवेल तसे भराभर पण ’हु की चु’ न करता नेले.
मी अलगद पांघरुन सरकवले त्याच्यावर. झिरोचा बल्ब ऑन केला. बल्ब ऑन करतानाचा बटणाचा ’खट’ करुन आवाज होऊ नये म्हणुन सर्व भार पोटात झेलला. रुममधला मुख्य दिवा ऑफ केला. बटणाच्या आवाजाच्या बाबतीत बल्ब ऑन करतानाची सर्व प्रक्रिया रिपीट. इतक्या हळुवारपणे सर्व घडत होते तरी धाकधुक होतीच.
न राहवुन जवळ जाऊन एकदा ती इवलीशी ’डेंजर’ मुर्ती वाकुन पाहिली. अंधुक प्रकाशात पण blanket खाली लपलेला माझा काजळ-तिटीवाला चांदोबा उठुन दिसत होता. इवल्याशा चेहर्‍यावर ती तीट भली मोठी दिसत होती. गच्च मिटलेले इंटु-पिंटुकले डोळे. काजळ-तिटी इतकेच उठुन दिसणारे पापणीचे लांब केस.  खरंच किती गोड दिसतो असा. भुरु-भुरु केसांना हिंमत करुन थोडे तेल लावले. श्वास थांबवुन त्याच्या गालांना, थंड-थंड नाकाला गालानेच स्पर्श केला. वरच्या ओठाच्या तावडीतुन खालच्या ओठाची सुटका करण्यासाठी हनुवटी हलकीच दाबली. गाल अजुनही हुप्पच. कोणासारखा दिसतो बरं? त्यांचा सारखा? की माझी कॉपी? इतका वेळ पहाणं बरं नाही. आईची नजर जास्त लागते म्हणतात.
झाले, अचानक इतका वेळ कोंडले गेलेले दोन्ही हात त्यांच्या वरच्या blanket चे वर्चस्व झुगारत एकाच वेळी बाहेर पडले. मग त्या चळवळीत पायांनी सहभाग घेतला. चुळबुळ करत चिमुकल्या हातांनी चिमुकल्या नाकावर हल्ला चढवला. ’नाही-नाही’ करत नाक इथुन-तिथे पळत होते. दंगल उसळण्याआधी आटोक्यात आणनं सर्वांच्या हिताच्या द्रुष्टीने गरजेचे होते. त्याला कुशीवर वळवुन ’ये गं गायी गोठ्यातं’च्या चालीवर थोपटायला सुरुवात केली. हुश्श... पुन्हा एकदा राज्यात शांततेचं साम्राज्य पसरले.

याआधीच म्हणजे अगदी काही मिनिटांपुर्वीच हे चिमुकलं तुफान थंड झालं होतं.

"जिंग्ग टु टु टु......"
अरे बापरे, याला मध्येच कसं आठवलं ’जिंगल टून’?
तुम्हाला ’जिंगल टून’ माहिती असेलच. लेकुरवाळ्यांना तरी ग्रुहीत धरायला हरकत नाही. जिंगल टून म्हणजे मराठी बाल-गीतांचे अनिमेटेड कलेक्शन. असो.

झालं असं की एकतर Laptop ह्याचे काका काही कामासाठी म्हणुन घरी घेऊन गेलेले. त्याला विसरंवायला म्हणुन मोबाईल पुढे केला.
"हे घे बाबु....मिबाईलमध्ये गाणं लाव तुझं"
साधासुधा नाही, चांगला ८-१० हजाराचा मिबाईल सोर्री मोबाईल. (हल्ली चुकुन कधी ऑफिसातपण  पण त्याच्या भाषेतला एखाद-दुसरा शब्द बाहेर पडतो.) मोबाईलच्या किमतीचं कौतुक आपल्याला. त्याला मोबाईलच्या किमतीशी काही देणं-घेणं नाहीच. मोबाईल फेकताना त्याच्या किमतीचा काही उपयोग नसतो ना. त्याने शांतपणे हसत-हसत मोबाईलचा स्विकार करुन क्षणाचाही विलंब न-लावता जाईल त्या दिशेत मोबाईल भिरकवुन दिला. हे मध्ये आले नसते तर भिंतीवर आपटुन त्या बापड्या मोबाईलचं काय होणार होतं, हे लिहायला नको. पण इथे बिच्चारा झाला ’बाबा’. असो, मोबाईल सलामत राहिला नसता तर या बिच्चार्‍या बाबाने मला बिच्चारं करुन टाकलं असतं त्याच्या हातात मोबाईल दिला म्हणुन.
"जिंग्ग टु टु टु आव ना....."
"अले, कम्पुटल उंदील घेऊन गेला ना, मग कसं लावणार ’जिंगल टून’?"
जी वस्तु त्याला द्यायची नाही म्हणुन लपवली जाते किंवा खरंच उपलब्ध नसते ती वस्तु उंदीलमामा घेऊन जातो.
"ओलल....ओलल...ना उंदिल्ला."
"ए.....उंदील अको कलु अशं...ओरडली. बश?"
"ए....तु पन ओलल...", बाबावर हुकुम सोडण्यात आलेला.
"ए आई, पप"
"अ अ अं..ह्य ह्य ह्याआआआआआ"
"मला नको, उंदराला ओरडा हो."
"ए, उंदील जा इथुन."
कानाकोपर्‍यात थोडसं वाकुन उंदीरमामाला आव्हान केलं गेलं.
"कको कलु ना...अट्ट....लब्बाल....माल्नाल. तिके ज़ा तिके ज़ा ना.", उंदीरमामाला उगारलेला एवलाशा हात  कानापर्यंतची उंची गाठत नाचत होता.
मग वन बाय वन आजोबा-आजी दोघांना वटहुकुमाचे पालन करायचे आदेश देण्यात आले.
"चल...", असे म्हणुन माझा हात पकडुन मला ओढायचा प्रयत्न सुरु झाला. प्रयत्नांची दिशा दाराकडे बोट दाखवत होती.
"अरे सोन्या, बाहेर कोणी नाही आहे. सगे जो-जो करतायत. बाप्पा तुला गंदु-बॉय बोलनाल. छी, अद्वैत इज गंदु-बॉय."
"टेअस....टेअस जाऊ ना"
"ए टेरेसवर बुवा बसलाय. तुला पकलनाल. बाप्पे....अको अको."
"छोल...छोल.....अचु दे....छोल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल.........", म्हणत साहेबांनी दारात लोळायला सुरुवात केली.
अशा वेळेला त्याला उचलुन घेणं म्हणजे (विक्रमी पॉज).....जाऊ दे, काय लिहु सुचत नाही आहे (अशा प्रसंगी माझी स्थितीपण अशीच होते).
कशी-बशी बाल्कनीतुन 'स्टार्स' बघण्यावर मांडवली होते.
मग मच्छरांच्या थव्यासोबत इकडुन तिकडे चकरा मारत चांदण्या काऊंट करायला सुरुवात केली जाते.
"टु... थी... फोल... बोल ना...तु बोल"
"फाईव्ह, सिक्स, सेव्हन, एइट?"
"नाई, ट्टेन"
"अले वा....अद्वैत इज?"
"गुब्बा"
"हा गुड बॉय....आता आदी जो-जो कलनाल. हो ना?"
माझ्या एका खांद्याचा स्टिअरींग सारखा उपयोग करत बाल्कनीतुन बाहेर पडणार्‍या आईच्या लबाड पायांना पुन्हा बाल्कनीत वळवलं जातं.
"बोल ना ...टिंकाल-टिंकाल..?"
"लिटील स्टार्स"
"हाय मर वंदल.. वाटु...?"
"आर...अप अबोव्ह द?"
"आय"
"अप अबोव्ह द वर्ल्ड सो हाय...लाईक अ डायमंड?"
"इंग्ग क्काय"
"अले वाह...मत्त मत्त....."
"मोनु चावा." (मोनु = किडा, मच्छर इ.)
"बघ चावला ना...मोनु तुला. चल आत जाऊ या."
"तिके तिके.....आह्याह्याह्याआ"
बिल्डींग मधले आणि बाहेरचे जागे होण्याआधी कसे-बसे त्याला घेऊन घरात घुसण्याचा माझा बापडा प्रयत्न आणि आदीराजे फुल्ल बाजीप्रभुंच्या रोलमध्ये घुसुन खिंड लढायच्या मुडमध्ये.
"ती बघ आजीने तुझी खेळणी घेतली. चल आपण काढुन घेऊया." असे म्हटल्यावर खेळण्यांच्या बास्केटकडे कुच केली जाते.
मग खेळण्यांचे बास्केट पुर्ण ओतुन रिकामी केलं जातं. मग आदीराजे त्यात बसुन रथ हाकायचा हुकुम सोडतात. या रुममधुन त्या रुममध्ये, त्या रुममधुन या रुममध्ये नगराची पहाणी केली जाते. जेव्हा घोडे दमतात किंवा महाराजांना ते तसे वाटायला लागतात, तेव्हा त्यांना हाकलुन देऊन महाराज स्वतः रथातुन उतरुन रथ ढकलयला लागतात. मग वाटेत येईल त्या वस्तुचा चुराडा करत भरधाव स्पीड मध्ये रथ फिरत राहतो. घोडे महाराजांना झेलायला रथामागुन धावत असतात.
(घोडे नुसते वरातीमागुन नाही तर कधी रथामागुन पण धावतात)
घोड्यांचा अंदाज चुकतो आणि मग ’आआआईईईईईईईईईईए..ह्याह्याह्याह्या गुणिले १००’

फायनली आईला शरण जाऊन दोन्ही हात वर करुन, "उच्चुन घे नाआआआआआआआआ..."
"ये रे माझा बाळ तो....उगी उगी. कुनी माल्लं? आपण मार देऊ हा."

बाळराजे खांद्यावर डोके ठेवताच झोपी जातात. आणि पुर्ण घर पुन्हा जागच्या जागी जाऊन बसतं. 

आता थोडावेळ तरी सगळे सुखाने एका जागेवर बसु शकणार असतात. सगळ्यांच्याच चेहर्‍यावर एक ’हुश्श्स....’वाला रिलाक्स भाव झळकत असतो.

नुसते बसुन वेळ वाया न-घालवता अंथरुणं करण्यासाठी बळ एकवटलं जातं. राजे कोणत्याही क्षणाला ’मोनिन’ डिक्लेअर्ड करु शकत असल्याने मिळेल तेवढे झोपेचे सुख पदरात पाडुन घेण्यासाठी मनातल्या मनात निद्रादेवीची आराधना सुरु होते.

Friday, February 4, 2011

Caring For You....Always!




"काय खायचं? बोल लवकर."
"पाणी-पुरी खाऊया का? ए, पण आज बसने जायचं हा घरी."
"हो गं बाई, आधी खाऊया चल. इथे एवढी चांगली नाही मिळत ना. चल थोडं पुढे जायचं का?"
असं म्हणत घर कधी यायचं ते मला कळायचंच नाही. पण बाहुलीला कळायचं. ती रागवायची माझ्यावर.
"ए, तू नेहमी असंच करतेस बाबा. तुझ्याबरोबर दादरला यायलाच नको कधी. केवढं चालवलंस. पाय बघ किती दुखताहेत ते. तू देणार आहेस का चेपुन?"
"अगं पण तुलाच पाणी-पुरी खायची होती ना. स्टेशनला कुठे मिळते चांगली पाणी-पुरी? आणि अर्धा रस्ता तर आपण आलेलोच शोधत शोधत. मग तिथुन पुढे तेवढीच तिकीट. काय बसने जायचं. आता उरलेल्या चार रुपयाचं घेईन ना तुझ्यासाठी अजून काहीतरी"
"नको मला तुझं काही आता."
सोल्लीडच चिडायची मग बाहुली. पण तिला माझ्यावर नीट रागवायला नाही जमायचं.
तिला हसायला यायचं लगेच. खरंच खूप सहन करायची ती मला. आणि अजूनही करते.
दादर ते आमचे घर, चालत यायला फ़क्त एक तास लागतो.

माझी बाहुली... माझी सावली... माझी मैत्रिण... माझी पिल्लू... माझी जान... माझा बच्चा... किती लिहु आणि किती नको तिच्याबद्दल. ती म्हणजे माझी डायरी. सगळं सगळं तिच्याशी शेअर केले आहे आजपर्यंत.
ती म्हणजे मी आणि मी म्हणजे ती.

आम्ही दोघी सख्या बहिणी आहोत हे आम्हाला बघुन कोणाला वाटणार नाही आणि स्वभावावरुन तर नाहीच नाही. आमचे स्वभाव एकमेकांना अगदी पुरक म्हणायला हरकत नाही.


ती शांत (फक्त घराबाहेर), लाजाळू एकंदर अशी रिसर्व्हड-रिसर्व्हड. तिच्या भावना सहजा-सहजी नाही कळत rather ती कोणाला कळु देत नाही. (इथे मी तिला ’दगड’ संबोधते....माझा गुणी दगड  )
घर आणि घरातल्या माणसांसकट वस्तुंना शिस्त लावायची तिला भारी हौस. नटण्या-मुरडण्याची आवड प्रत्येक मुलीला असते. पण तिने याबाबत प्रायोरिटी नेहमी मलाच द्यायची. जेव्हा अशी सिच्युएशन येते की एकच वस्तु पण ती दोघींना आवडलीय, डायरेक्ट त्याग-बिग करायची तिची तयारी. नुसती तयारी नाही
तर त्या वस्तुचे मालकी हक्क मला सोपवुन madam मोकळ्या. ह्या स्वभावामुळेच जास्त काळजी वाटते पोरीची.
यावरुन माझ्या स्वभावाची कल्पना आली असेलच. ह्या स्वभावाला विरुद्ध असलेले शब्द एकत्र आणले म्हणजे माझा स्वभाव बनेल.

आम्ही चार भावंडे. भाऊ दोघे मोठे. आणि बाहुली शेंडेफळ. आमच्या दोघींमध्ये साधारण तीन वर्षांचा फरक आहे. पण आमच्यात लहान कोण नी मोठी कोण ते मला सुद्धा समजत नाही. घरात मी जरा लाडोबाच आहे. त्याचा तिला कधीच हेवा वाटत नाही. काम सांगताना आई ते तिलाच सांगेल. आणि मला मात्र ’जीव बघ काय तो’ म्हणत नेहमीच पदराखाली घालेल. यावर पण "लहान ती आहे की मी? काम कोणाला सांगितले पाहिजे? लाड कोणाचे झाले पाहिजेत? मला माहिती आहे मी तुझी मुलगीच नाही." बस इतकेच. ते लटके लटके भांडताना पण माझ्याबद्दल तिच्या नजरेत असलेले एक प्रकारचे कौतुक. मुख्य म्हण्जे हि madam च माझे सर्वात जास्त लाड करत असते.

भावंडांमध्ये आमच्या दोघींमध्ये कमालीची ओढ आहे. (दोन्ही दादा-लोकांची जाहीर माफी मागुन)
मला देखील अमेझिंग वाटते. पण खरे आहे. मग तो खाऊ शेअर करायचा असु दे की ’शिक्रेट’, तिला मी आणि मला ती लागतेच.

तिच्या जन्मानंतर, माझे लाड कमी होणार असे सहाजिकच मला पण वाटायचे. एवढे स्पष्ट नाही आठवत. पण Black & White मध्ये अंधुक, तुटक असे काही व्हिडिओस येतात डोळ्यासमोर. तिच्या बारशाला आईने तिला मांडीवर घेतलेले बघुन मी गाल फुगवुन बसले होते. अजून एक किस्सा आठवुन तर आता हसायला येते. ती
साधारण पाच-सहा महिन्यांची होती. बाबांनी दोघींना कपडे आणलेले. तिला आणलेले कपडे मला मला भरपुर आवडलेले. होत नसतानाही ’तिला किती मस्त मस्त आणले. आणि मला काय हे असे’ अशा रागाने ते कपडे घालायचा प्रयत्न केलेला.
त्यात ते कपडे बिच्चारे फाटले ती वेगळी गोष्ट पण त्यात अडकुन बसल्यामुळे माझे छाने हसे झालेलं. तोंडावर कोणी हसु शकले नाही तो वेगळा भाग झाला. भोंगा ऐकायची हिंमत कोणात असते?
त्यानंतर पुढे समज येईपर्यंत आमच्या दोघींना जे कपडे आणले जात ते फक्त साईज मध्ये वेगवेगळे असत.

इर्षेचा भाग तो तेवढ्यापुरतीच होता. जस-जसे मला समजायला लागले होते, तस-तशी तिची अधिकाधिक काळजी घ्यायला शिकले मी. तिला सोडुन शाळेत पण जाणे जीवावर यायचे मला. तशाही शाळेत जायचा उत्साह तिच्यापेक्षा कमीच होता. ती त्या बाबतीत पण अगदी पर्टिक्युलर. वह्या-पुस्तके, सगळ्या वस्तू जिथल्या तिथे. दोघींसाठी सुरुवातीला एकच कपाट दिले गेलेले. हळु-हळु माझ्या नीट-नेटकेपणा मुळे माझ्या वस्तूंची तिने पद्धतशीरपणे हकालपट्टी केलेली.
पण मला दिले गेलेले वेगळे कपाट पण नीट ठेवायची तिचीच जवाबदारी असायची. टाईम-टेबल हे वहीचे
शेवटचे पान भरायला दिली गेलेली वस्तू नसुन, दुसर्‍या दिवशी शाळेत जायची इच्छा असल्यास त्याच्या आदल्या रात्री दप्तरातल्या वह्या-पुस्तक नामक दंगे-खोर (सापडतच नाही वेळेला - हे फ़क्त माझ्याबाबतीत) लोकांची हजेरी घेण्यासाठी असते. हे तिच्याकडुनच मला कळले. वळले नाही ती वेगळी गोष्ट.
ती पाचवीत असताना तिला माझ्या शाळेत घातलेले. मग तिच्याबद्दलची माझी काळजी अजुन वाढली. मधल्या सुट्टीत तर भेटायचीच पण जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा तेव्हा तिच्या वर्गाकडे एक नजर मारुन यायची हे ठरलेलं असायचं. उगीचच वाटायचे कोणी तिच्याशी मारामारी वगैरे नसेल ना केली? हि कोणाला मारणे शक्यच नव्हते, पण हिनेच कोणाचा मार वगैरे नसेल ना खाल्ला? तशी माझी गरीब गाय कोणाच्या अध्यात-मध्यात नसल्याने  याचीही शक्यता कमीच होती. पण जग निष्ठुर असते, असे मला तिच्या बद्दल विचार करताना उगीचच वाटत रहाते. तिच्या रक्षणासाठी मी नेहमी तत्पर रहायचा माझ्या परीने निदान प्रयत्न करत होती. माझ्या या
अशा वागण्याचा असा काही परिणाम होऊ शकतो मला स्वप्नात देखील वाटले नव्हते. एके दिवशी काय झाले, मला जी नेहमी तिच्याबद्दल धाकधूक वाटायची त्याप्रमाणेच घडले. कशावरुनतरी कोणीतरी तिला कानाखाली दिली. मला कळाले तेव्हा माझा खरंच खुप संताप झालेला. पण  प्रत्यक्षात ज्या मुलीने ती गुस्ताखी केलेली, तिची हालत पाहुन मला हसु आवरले गेले नाही. तिला कळालेले की ज्या मुलीला आपण मारले तिची बहिण सोल्लीड डेंजर-बिंजर आहे, आपली धडगत नाही वगैरे. मी तिला परत असे करु नकोस म्हणुन समजवायला गेले तर तिने भोकाडच पसरले. लागलीच तिथुन काढता पाय घ्यावा लागला. असो.

तिच्या लाजर्‍या-बुजर्‍या स्वभावामुळे, तिचा मैत्र-परिवार काहीसा इल्लु-पिल्लुसा. तिची जवळची मैत्रिण कोण होती? या प्रश्नाचे उत्तर नाही सांगता येत.
मित्र किंवा मैत्रिण म्हटलं की एक साधारण चित्र डोळ्यासमोर उभं राहतं ना.
जसे की एकमेकांच्या घरी येणे-जाणे, रुसवे-फुगवे-मस्कामारी, कधी आरडा-ओरड तर कधी खुसुर-फुसुर, सबमिशनच्या वेळेचे ’एकमेका सहाय्य करु’ अभियान, परीक्षेची तयारी, सुट्टीचे प्लानिंग आणि सगळ्यात मह्त्त्वाचे म्हणजे ’फेव्हीकोल का मजबुत जोड है....छुटेगा नही....’
आम्हाला तिच्या बाबतीत हे चित्र कधी दिसलेच नाही. स्वभावाप्रमाणे तिने नाही सांगितले तरी याबाबतची तिची चुरचुर मात्र कळुन यायची. असो.

मलादेखील मनापासुन वाटायचे तिची एक तरी ’खास’ मैत्रीण असावी असे. पण नाईलाज को क्या ईलाज. मग मीच तिची मैत्रीण बनत गेले. माझ्या फ्रेंड-सर्कल मध्ये तिचेपण अकाऊंट ओपन केले. पण सुरुवातीला तिथेही मोजकेच बोलायचं. बरं कोणाशी बोलायचं झाल्यास माझ्या थ्रु संवाद. कोणी तिला काही प्रश्न केले
की आधी माझ्याकडे बघुन डोळ्यांनीच विचारायचं ’काय बोलु’ असे. वाटायचं कसं होणार या बाळाचं?
मला तिला बोलकं किंवा atleast बोलतं करायचं होतं. तिने काही सहन करणे मला सहन नाही होत.
हळु-हळु ती ’आमच्यात’ रुळायला लागली. थोडा जास्त वेळ गेला खरा.

एक मात्र आहे आम्ही दोघी बाहेर पडलो की धम्माल असते. रस्ताभर नुसतच आपलं हसणं-खिदळणं चालतं. एक गोष्ट खुप अमेझिंग घडते, आम्ही दोघी स्ट्रीट-लम्पच्या बाजुने जात असलो की चालु असलेला दिवा बंद होतो. आणि बंद दिवा चालु होतो. म्हणजे ह्यापैकी काहीतरी एक तेव्हा घडायलाच हवे. मग माझं पिल्लु खो-खो करुन हसतं. रस्त्यातुन चालताना माझ्या ओळखीची बरीच (हे तिला वाटते) मंडळी भेटत असतात. तिला याचे नवल तर वाटतेच. मग त्याबद्दल पण ती ’तु निवडणुकीला का उभी रहात नाही?’ असं काहीतरी ऐकवणार. माझ्यावर कमेंट करणे, माझी टर उडवणे, मला एकंदर वेड्यात-बिड्यात काढणे तिला आवडते आणि मलाही. ती माझी कंपनी खुप एन्जोय करते. प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीत तिला माझाच सल्ला लागतो. रेस्टो मध्ये गेल्यावर काय खायचं तिथपासुन ते कपडे कसे घ्यायचे? कोणता कलर चांगल वाटतो? हे सर्व मला विचारुनच ती ठरवणार. हिचे ड्रेस शिवायला देताना टेलरबरोबर मीच बोलयचं.

थोडक्यात काय तर माझ्यावाचुन तिचं पानदेखील हलत नाही. वाटायचं माझ्या लग्नानंतर हा जीव काय करेल? नुसती कल्पनापण करवत नव्हती. पण प्रत्यक्षात जेव्हा ही माझी पाठराखीण मला माझ्या सासरी सोडुन घरी निघाली तेव्हा, ’स्वतःची काळजी घे. आठवण आली तर त्रास करुन घेऊ नकोस. रडलीस तर डोळे
सुजतात तुझे लवकर. तु कधीही हाक मारलीस की धावत येईन. मी कायम तुझ्यासोबतच आहे समज.’ अशी काहीतरी चार-दोन उपदेशपर वाक्ये सांगुन निर्विकारपणे चालु पडली. हि माझी कालची माझी छकुली बोलतेय की आणखी कोणी?
त्या क्षणाला डोळ्यासमोरुन एकामागुन एक चित्रे सरकत होती. त्या चित्रांना क्रम-बिम असा नव्हता. बस जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेले फोटो उचलुन पहावेत तसे सर्व. मग कोणताही फोटो हातात येईल की आपण फक्त बघायचे काम करायचे.
तिच्या पाळण्याला दिलेले झोके, तिचे बोट पकडुन स्वतःला सावरत केलेली ’चाली-चाली’, उळकंबत-उळकंबत प्लास्टिकच्या पिशवीतुन चिमुकला संसार घेऊन भातुकलीसाठी जागेचा शोध, आईचा मार खाल्यावर ’उगी हं’ म्हणणारे तिचे पाठीवर फिरणारे चिमुकले हात, कधी कधी तर खेळण्यांवरुन एकमेकींच्या झिंज्यापण ओढलेल्या, खेळताना पडल्यावर फुटलेली ढोपरं-कोपरं घरात कळु देऊ नये म्हणुन कधी रिश्वत कधी हातमिळवणी, ती गाढ झोपल्याची खात्री करुन आईचं मला कुशीत घेणं, शाळेत जाताना तिने मला ओढत नेणं, तिचा अभ्यास घेताना तिचा रडवेला चेहरा, तरीही पुन्हा दुसर्‍या दिवशी मीच अभ्यास घ्यायचा असा हट्ट, माझ्या वाढदिवसासाठी रात्री उशीरा पर्यंत जागुन तिने स्वतः तयार केलेले शुभेच्छापत्र, कोलेजमधुन सुटल्यावर घरी वाटेला डोळे लावुन बसलेल्या तिच्यासाठी जीव मुठीत घेऊन पळत येणं, संध्याकाळचं सी-फेस,
’त्या’च्याबद्दल न-कंटाळता तासन्तास सहन केलेली माझी बक-बक, रात्री हेड-फोन शेअर करुन उशीर-उशीर पर्यंत ऐकलेला रेडिओ, मला आवडते म्हणुन माझ्यासाठी चायनीज वर केलेली आर अन्ड डी, वीकेंडचं शोपींग, मुव्हीज फक्त प्लानिंग (एक-दोन वेळाच सोबत गेलेलो), अबोला, फुगलेले गाल, मनधरणी,......
आता असले क्षण खुप दुर्मिळ. न जाणो कधी वाट्याला येतील.

खरंच अचानक कधी माझे लग्न ठरले, हा हा म्हणता साखरपुडा, लग्नाची खरेदी, रुखवतासाठीची जागरणं, मेहंदी, हळद....आणि मग लग्नाचा दिवस.
मंडपात पण दुसर्‍याच कुणाच्या लग्नात आल्यासारख्या चाललेल्या गप्पा. भटजी रिपीट करुन करुन कंटाळत
होते(कदाचित नंतर कंटाळुन एखाद-दुसरी स्टेप स्किप-बिपपण केली असेल. असो, आपल्याला काय कळतंय त्यातलं?). बाहुली मध्येच मला ’श्श्श...’ करुन गप्प बसवायची. परत येरे माझ्या मागल्या.
लग्नाच्या एक-एका विधीबरोबर आमच्यातलं अंतर वाढते आहे, जाणवलंच नाही आम्हाला.
सगळ्यात शेवटी कठीण क्षण येतो तो ’लेक चालली सासरला’. कोणाकडे पहावतही नव्हते.
आई-बाबा, दादा-वहिनी, भाची, मावशी, मामा-मामी, आत्ये, चुलत-फुलत भावंडे... असे बरेच जण.
......तेव्हा मी सगळ्यांना भेटुन रडली, बाहुली सोडुन. ती म्हणाली अगं मी आज तुझ्याबरोबरच आहे. तिचे ’आज’ त्या हळव्या क्षणाला पुरेसे झालेपण.

ह्या 'Flash-back' मधून बाहेर येत तीची पाठमोरी आकृती पहातच राहिले. दिसेनाशी होण्याआधी एका वळणावरुन तिने मागे बघुन हात केला. इतके दिवस माझ्याशिवाय हिचे कसे होणार हा प्रश्न होता. अचानक तो बेईमान प्रश्न माझ्यावरच फिरला. खरंच वाटत होते तिला माझी जास्त गरज आहे, ती माझ्याशिवाय राहु शकत नाही वगैरे. एक हात वर करुन दुरवर दिसणार्‍या तिला ’नीट जा’ अशी मनातच साद घातली.

निघताना मी काहीच सांगितले नाही तिला. पुढचा संवाद मनातल्या मनातच, ’स्वतःची काळजी घे. आठवण आली तर त्रास करुन घेऊ नकोस. रडलीस तर डोळे सुजतात तुझे लवकर. तु कधीही हाक मारलीस की धावत येईन. मी कायम तुझ्यासोबतच आहे समज.’... शब्द, भावना सर्व तिचेच, तिच्याच सारखे. असणारच
तिच्यासारखे, आम्ही बहिणी आहोत सख्या.


 

Sunday, December 26, 2010

DeaR


अजूनही तुझा आवाज कानात घुमतोय बघ...
'बाकी सर्व खुशाल...तुझ्यासारखं...'
DeaR आलं यातच सारं, नाही का?
असो...
मला एक सांग कशी दिसत असशील गं आता...
खात्री आहे....तशीच असशील... 'माझी वाली'
.....निरागस, कावरी-बावरी....
कृत्रिम रंगाचा स्पर्श.... त्याची तुला कधी गरजच भासली नव्हती .....
आणि आताही ......हो खात्री आहे शंभर टक्के...
समोरच्याच्या आत्म्याला भिडणारी तुझी नजर ...अजूनही काळजात जपून ठेवलीय....
बराच काळ लोटून गेलाय असं वाटतं....नाही का गं....
कित्येकदा तुझ्या दारातून परतलोय....सातासमुद्रापार असलेल्या...
रोज दिवसभरात माहित नाही किती चकरा होतात....
मी मोजत नाही गं....पूर्वीसारखे हिशेब जमत नाहीत हल्ली....
तू फक्त एकदा दिसलीस कि होईल सर्व वसूल.......फक्त एकदाच
तुला आज पण असंच वाटतं का गं झालं ते सर्व माझ्यामुळे?
त्या दिवशी तुझ्या बोलण्यातून जाणवत होतं ते मला...
वाटलंच.....कधी भेटलेलीस? एवढा विचार नको करूस....
आता भेटते आहेस तशी गं...
तू भेटतच असतेस मला माझ्या विचारांमधून, स्वप्नांमधून....तर असो 
रागात पण गोड दिसतेस, आजपण...  
अगं हो हो DeaR .....किती त्रागा करून घेशील....
चुकलंच माझं...मोजायला हवं होतं.... तुझ्या-माझ्यातलं अंतर, ते अंतर कापण्यासाठीचा वेळ, मारलेल्या चकरा...
तुझ्या आठवणी, रात्रींचे दिवस, हरवलेले क्षण, गुदमरलेले श्वास, कोंडलेले शब्द, नरक-यातना.....अजूनही बरंच काही...
जमलंच नाही बघ अगणित कसं मोजायचं ते....
हिशेबांना जरा डोके लावले असते तर .....
पण छ्या .....प्रेमात डोकं कमीच लावलं......असं तुझं म्हणणं....
वेडाबाई ....मनात तुझ्या कधी डोकावलो नाही मी......?
फक्त मान उंचावून तुला बघत राहिलो....
अगदी खरं सांगतोय.....आज पण तिथूनच बोलतोय.....तुझ्या मनासारखी प्रशस्त जागा कुठेच नाही....
सात समुद्रापार माझा आवाज पोहोचतोयना .....
आणि ते सात असू देत कि सात हजार, फरक पडेल का???
आणि जखमांचे काय घेऊन बसलीस DeaR?
जखमा होतात त्या शरीराला, तुटलेल्या भागाचे काय ..... निर्जीवच
केला ना माझा जीव दुसऱ्याच्या स्वाधीन?
आपल्यामध्ये समुद्र आणले नाही गं DeaR मी .....ते यायचेच होते......
विरहाचे म्हणशील तर.... शरीरापुरते .......समुद्र दोन शरीरांमध्ये आलेत.....
आजही मी पाहतोय गं तुला....शेवटचे कोणते ठरेल माहीत नाही......
जाणून घ्यायचेही नाही....
- फक्त तुझाच 
शेवटच्या श्वासापर्यंत...त्यानंतरही...

Monday, December 20, 2010

प्रथम तुज पाहता

ट्युशनवरुन घरी परतल्यावर आम्ही त्यादिवशी रोजच्या सारखेच बाहेर असंच इकडचं-तिकडचं बोलत उभे होतो. मी, चितु उर्फ चित्रा आणि स्वाती. बोलता बोलता सहज माझे लक्ष थोडे बाजुला गेले. आणि काय सांगु राव, मला माझ्या डोळ्यावर विश्वासच बसेना. चक्क ’तो’ मला दिसला. पण इकडे कसा काय? कोणाकडे आला असेल? जाउ दे ना, आपल्याला काय करायचय? ते important नव्हतं माझ्यासाठी. तो दिसला हेच खुप होतं.
Oh my God! काय करु नी काय नको अशी अवस्था झालेली माझी तर. खरंच तो कधी असा अचानक समोर येईल असं ध्यानी-मनी पण वाटलं नव्हतं. आपसुकच छोटीशी किंचाळी वगैरे निघाली तोंडातुन. दोन्ही हात आपोआप तोंडावर धरले गेले. डोळे विस्फारुन मी त्यालाच बघत होते. आणि तो माझ्याकडे बघत होता. एकंदर
माझे एक्स्प्रेशन पाहुन त्या दोघींना कळेना मध्येच मला काय चावलं ते. पण जेव्हा त्या दोघींना ’तो’ दिसला, तेव्हा त्या दोघींना पण खुप आश्चर्य वाटले. तो बाजुने निघुन सुद्धा गेला. आणि आम्ही अगदी सुदुर-बुदुर झाल्यागत एकमेकींच्या तोंडाकडे पहात राहिलो. माझ्या मनात तर आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. असे काहीतरी शेकडो कारंजी वगैरे काय ते म्हणतात ना तसंच काहीशी मनाची अवस्थता झालेली.  इतक्यात चितु ओरडली,"अगं चला लवकर बघुया कुठे जातो ते." त्यावर मी भानावर आले. मग short-cutने  धावतच जाऊन त्याला गाठायचा प्रयत्न केला. पण छे! काही उपयोग झाला नाही. ’तो’ कुठे गायब झाला. काहीच
थांगपत्ता लागला नाही. ’bad-luck’. असो.

रात्री बराच वेळ झोपच येत नव्हती. सतत त्याचा चेहरा डोळ्यासमोर, असंख्य प्रश्न- कुठे रहात असेल तो? आज आपल्या इथे कसा काय दिसला? इथेच कुठे रहात असेल तर? परत उद्या दिसेल का? त्याने मला ओळखले असेल का? छे रोजच्या एवढ्या गिर्हाईकांमधुन मला कसा काय लक्षात ठेवेल तो? मग जास्तच अस्वस्थ
वाटायला लागले. नाहीच दिसला असता तर बरे झाले असते. जीव चुरचुरायला लागलेला. बघु उद्या जमलं तर दुकानावर चक्कर टाकु, अशी मनाची समजुत काढली.

त्याची थोडक्यात ओळख सांगायची म्हणजे ’तो’ थेट गांगुली सारखा दिसतो. बस एवढंच.
आता गांगुली कुठे आला मध्येच? तर त्याचे असे झाले, मला गांगुली भयंकर आवडायचा. तो केवळ आवडायचा म्हणुन तो कसा छान खेळतो, असं वकीलपत्र मी स्विकारलेलं. कधीतरी(?) त्याची खेळी जरा(?) वाईट (म्हणजे अगदी नाही) झाली की Press-Conferenceला मलाच तोंड द्यावे लागणार आहे अशा प्रकारचे टेंशन यायचे मला. तर असो. गांगुली आता महत्त्वाचा नाही. सांगायचा मुद्दा असा की एकदा मला आमच्या स्वातीबाईंनी त्याच्या बद्दल सांगितले की, ’आपल्या मार्केट मध्ये जे सुरुवातीचं गिफ्ट-शोप चे दुकान आहे ना ’जस्ट लव्ह’.
तिथे एक मुलगा असतो. तो थेट आपल्या(?) गांगुलीची copy आहे.’ वगैरे.
सुरुवातीला मी लक्ष नाही दिले. म्हटलं माझा गांगुली कुठे? आणि तो कोण? जाउ दे ना. पण असं तिला स्पष्ट कसं सांगयचं? म्हणुन तुर्तास, हो म्हटलं बाई असेल गांगुली सारखा. पण तिने ’एकदा तरी बघ त्याला’ म्हणुन मला रिक्वेस्ट केली. आता ’मला आवडणारा गांगुली’, तिच्या मते गांगुलीसारखा दिसणारा ’तो’ आणि ’ती’ या तिघांचा एकमेकांशी काडीचाही संबंध नव्हता. तिचा मान ठेवायला म्हणुन आम्ही एके दिवशी तिघी मिळुन गेलो त्याच्या दुकानात. आणि पहाते तो काय? साक्षात ’गांगुली’ माझ्यासमोर उभा आहे की काय असंच काही क्षण मला वाटत होते. नलाला बघुन दमयंतीची काय अवस्था झाली असेल त्याचे वर्णन मी रिपीट नाही करत. पण सेम टु सेम माझी अवस्था. मला माझ्या डोळ्यांवर विश्वास होत नव्हता. इतकी समानता कशी काय असु शकते? निव्वळ असंभवच. खरंच गांगुली तर नाही ना, असा फालतु प्रश्न पण डोकावुन गेला मनात. पण तसे वाटणे सहाजिकच होते, स्वभाविकच होते. माझ्या जागी इतर कोणी असते, तर त्याला सुद्धा असा फालतु प्रश्न पडु शकला असता.

अजुनही नंतर ३-४ वेळा तरी फक्त ग्रिटींग कार्ड घ्यायच्या बहाण्याने गेलो असु. पण मग तिथल्या लोकांच्या नजरेत यायला लागलेलं. त्यानंतर मात्र मनाला आवर घालावा लागला. नाहीतरी पुढचं वर्ष बोर्डाचं होतं. ते जास्त महत्त्वाचं होतं. ’गांगुली’ chapter closed.

त्यादिवशी अनपेक्षितपणे त्याच्या समोर येण्यानं closed chapter अधिक क्लोज-अप झाला. जेवढा दूर जायचा प्रयत्न करत होती, तितकीच अधिक गुंतत चालल्या सारखं वाटायला लागलेलं . त्याला पुन्हा पुन्हा पहावेसे वाटत होते. तो पुन्हा दिसावासा वाटत होता. बरे, पहाण्यापर्यंत ठिक आहे. पुढे काय? एक विचित्र ओढाताण चाललेली मनातल्या मनात.
एक मन विचारत होतं ’प्रेमात-बिमात पडली नाहीस ना?’
एक मन टपली मारत होतं, ’अरे अपुन इस टाईपकी नही हैं। हे प्रेम-बिम आपल्याला नाही जमणार. ते रोमंटिक-बिमन्टिक व्हायला आपल्याला कुठं जमतं? टेलीव्हिजनला खवय्ये-प्रोग्रम आवडीने बघतात काहीक जण. तसाच प्रकार. ते पदार्थ करुन पहायचेच असे कुठे लिहलंय का? मग त्याला फक्त बघायला आपलं काय
जातं?’
(विशेष नोंद : दोन्ही मने अद्रुश्यपणेच संवाद साधत होती. मनाच्या रुपात स्वतःचे डबल रोल - ट्रिपल रोल नाही दिसलेत अजुन पर्यंत.)

टपलीवाल्या मनाचं ऐकायचं ठरलं. परत दिसला तर ठिक, स्वतःहुन नाही जायचं बघायला. त्याच्या दुसर्‍या दिवशी तो पुन्हा दिसतो का, म्हणुन फक्त चांस घेऊ असं म्हणत दोघींना मी थांबवलं. दर्शन नाही मिळाले. आम्ही तिघी ट्युशनवरुन परतल्यावर मुद्दामहुन घराबाहेर कारण नसताना घुटमळायला लागलो . ३ दिवस गेले, ४ गेले, ५-६, ७... छ्या! तो परत दिसला नाही. ’छोड यार!’ करत आम्ही होप्स काढुन टाकल्या. त्या दोघींना फरक पडायचा प्रश्नच नव्हता. आणि मी पण पहिल्यावाल्या मनाला ’हुर्र्र्र्र्र्र्र्र्र’ करुन उडवत होते. उगीच
बाहेर ताटकळत टाईमपास करणे बंद झाले.

त्यानंतर असंच एकदा आम्हाला ट्युशनवरुन सुटायला उशीर झालेला. स्थळ : पुन्हा तेच.
"ए तो बघ, तो बघ लवकर." चितु अचानक ओरडलीच. आणि पुन्हा एकदा आनंदाच्या उकळ्या and शेकडो कारंजी वगैरे.
"मुर्ख, हळु बोलता नाही येत का?" एक टपलीत दिली मी तिच्या. ’त्यात काय एवढ?’ च्या आविर्भावात दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. पण खरंच मला आनंद लपवायला नव्हतं जमत.

ह्या ना त्या कारणाने मी त्या दोघींना थांबवायची. बहुदा त्या दोघींना पण हे कळत होतं. मग आम्ही नियमितपणे थांबायला लागलो . बहुतेक वेळा तो दिसायचा. अर्थात त्याच्याही हे लक्षात येत होते की आम्ही त्याच्याचसाठी थांबतो असे. तो सुद्धा आम्हाला rather मला बघत बघतच जायचा. एक नविन सिलसिलाच
सुरु झालेला.

त्याची वाट बघायला खुप आवडायचे. येर-झार्‍या घालून पाय दमले की कट्ट्यावर बसुन माना दुखेपर्यंत वळुन वळुन वाटेकडे बघायचो. कधी त्याला यायला उशीर होतो आहे असे वाटले की नकळत तोंडातुन निघायचे,
"अरे चंद्र अजुन का उगवत नाही."
"थोडा धीरज ठेव बालिके. येतच असेल तुझा चंद्र. अरे क्या बात हैं, तो बघ आलाच."
तो येताना दिसला की अचानक हजारो कळ्या एकदम फ़ुलल्यासारखे वाटायचे. त्या काही क्षणांचे वेध दिवसभर असायचे.

एकदा तर चक्क तो बाजुने जाताना आम्ही गाणे-बिणेपण म्हटलेलं. कोणतं गाणं होतं बरे? हा सलमान-करिष्माचं ’धीरे-धीरे चलना’ आणि त्या गाण्याच्या मुखड्यातला शेवटचा ’पलट’ शब्द उच्चारल्यानंतर चक्क त्याने पलटुन पाहिलेले आम्हाला आणि काय गोड हसलेला म्हणून सांगू. मी एकदम खल्लासच. काय पण सीन होता, वाह वा!

त्याला बघायची इतकी सवय झालेली की तो नाही दिसला तर दिवस फुकट गेल्यासारखे वाटायचे. बस त्याची एक झलक दिसावी म्हणुन वेड लागलेलं मला. कोण-कुठला तो. त्याचं नाव सुद्धा माहिती नव्हतं मला. त्याच्यासाठी इतकं का मी पागल-बिगल व्हावं. जे चाललंय ते चुक की बरोबर? कोण ठरवणार हे? मी तर स्वतःच्या मनाला आवर घालु शकत होते. पण तो गुंतत गेला तर? हे कुठे तरी थांबवायला हवे होते. स्वतःहुन त्याला न-पहाणे मला अवघड वाटायला लागलेले.
खर्‍या गांगुलीचे पोस्टर्स एव्हाना धुळ खायला लागलेली. मला गांगुली आवडायचा हे मी साफ त्याला विसरुन गेलेली.

मग काय झाले कोणास ठाऊक, तो पुढे पुढे येईनासा झाला. न राहवुन दुकानावर चक्कर टाकुन पाहिली. तो तिथे पण नाही दिसला. कदाचित गावी वगैरे गेला असेल असे वाटले. पण असा किती दिवस जाईल? महिना? २ महिने? ४ -६? बघता बघता एक वर्ष होऊन गेले.

तो परत कधीच दिसला नाही आणि आता परत कधी दिसेल माहित नाही.
माझ्या बद्दलच्या त्याच्या भावना मला माहित नाही.
आता तो कुठे असेल? कसा असेल? काय करत असेल?
मला त्याची आताही आठवण येतेय. त्यालासुद्धा माझी आठवण येत असेल का?
सारंच अनुत्तरीत...

Monday, December 13, 2010

माझा सोबती टुटु

टुटु
टुटुमध्ये आम्ही सर्वच जण कसे गुंतत गेलो कळालेच नाही. टुटुमुळे मी मात्र या मांजर-परिवाराच्या खुप जवळ गेली. मांजरांबद्दल वाटणारी भीती, नुसती भीतीच नाही पण माहिती नाही का मला मांजराला हात लावायला पण घाण वाटायची. एकंदर मांजरांबद्दल जे काही मनीचे (माझ्या मनाचे) भाव (वाईट) होते ते जसजसा टुटु मोठा होत गेला तसतसे कमी होत गेले. खरं सांगायचे तर तो मोठापण कधी झाला ते पण आम्हाला कळालेच नाही असा ’Typical’ dialogue नाही म्हणायचा मला. पण अचानक एके दिवशी कळाले. टुटु वर्ष-दोन वर्षाचा असेल त्यावेळेला आम्ही गावाला गेलेलो. घरातले सर्वच जण (झाडुण) गेलेलो. गावी जायचं ठरल्यावर बाबांना भरपुर म्हणजे भरपुरच टेंशन आलेले त्याचे. त्यांना खरं तर दोन गोष्टींचे टेंशन आलेले. टुटुबद्दल तर होतेच. आणि दुसरे म्हणजे त्यांची फ़ुलझाडं, त्यांना पाणी कोण घालणार? घुशी मुळं पोखरुण तर नाही ना टाकणार? वसाहतीमधली टारगट पोरं-टोरं काही खोड्यातर नाही ना करणार....वगैरे वगैरे....
तसे पहायला गेलो तर दुसरे टेंशन पहिले होते, कारण फ़ुलझाडं टुटु यायच्या आधीपासुनची होती. तर असो.
टुटुचे  टेन्शन जरा जास्त महत्त्वाचे होते. कारणे बरीच होती. त्याला बाहेर रहायची सवय अजिबातच नव्हती. शिवाय त्याचे खाणे-पिणे (चवीचेच) सर्व घरातच. त्यात तो फ़ारच नाजुक. ’बोक्या’ जातीला काळीमा फ़ासणार्‍या अशा या टुटुच्या जीवाचे ’वैरी’ बरेच होते. जसे की कुत्रे, इतर बोके (जळणारे), काही धष्टपुष्ट घुशी वगैरे वगैरे. यासर्व गोष्टींमुळे माझ्यापण जीवाला घोर लागुन राहिलेला. आणि मुख्य म्हणजे प्रश्न २-४ दिवसांचा असता तर वेगळी गोष्ट होती. आम्ही १५ दिवसांसाठी जाणार होतो. पर्यायही नव्हता आमच्याकडे काही. सोबत घेऊन जायला टुटु कुत्र्यासारखा समजुतदारही नव्हता. मुळात मांजर या प्राण्याला फ़क्त त्यांच्या गरजेपुरतीच अक्कल दिली गेली असली पाहिजे. आजतायगत मी शिकाऊ मांजर पाहिलेले किंवा ऐकलेले नाही. शिकाऊ वरुन आठवलं. बाबांना टुटुला ट्रेनिंग-स्कूल मध्ये टाकायचे होते. माहिमला आहे असे ट्रेनिंग-स्कूल, त्यांनी माहिती काढलेली. मग माझ्या डोळ्यासमोर चित्र यायचे की टुटु पाठीला school-bag लावुन आणि गळ्यात water-bottle घालून बाबांबरोबर शाळेत चाललाय, तो वर्गात बसलाय आणि बाई काय सांगताहेत ते न ऐकता त्याचे आपले म्याव-म्याव ओरडणे चालू आहे वगैरे.

या प्राण्याबद्दल आणखी एक खटकणारी गोष्ट म्हणजे, देवादिकांमध्ये त्याला नसलेले स्थान. कुठल्याही देवाचे वाहन म्हणुन त्याला निदान साधं ’Call letter’ आलेलं किंवा अमुक-अमुक देवाने मग मार्जार अवतारात त्याचा वध केला याचा कुठेच उल्लेख ऐकिवात नाही. एवढेच कशाला अमुक-अमुक देव मांजर रुपाने ते सर्व पहात होते, असे वाक्य औषधाला पण सापडणार नाही. मांजर-हत्येनंतर काहीतरी काशीला जावे लागते म्हणतात, हा अपवाद सोडला तर ह्या प्राण्याचा पुराणात विशेष उल्लेख नाही.
अजुनही काही प्राणी आहेत जे देवादिकांच्या यादीत यायला वैटींग-लिस्ट मध्ये आहेत. झालंच तर ससा, झेब्रा, जिराफ़, कांगारु इ. (चुक-भुल माफ़ असावी)
प. पू. रामसे (मला हेच नाव माहिती आहे) यांसारख्यांच्या कृपेने, काळी मांजर / बोका ही/हा भुता-खेतांची / चा प्रचार-प्रमुख असायला कोणाचीच हरकत नसावी. खुपच अवांतर होते आहे असे वाटतेय. असो.

तर आम्ही काही टुटुला घेऊन जाणार नव्हतो. त्याच्यासाठी खिडकीचे एक तावदाण उघडे ठेवायचे का? असा विचार चाललेलाच पण त्यात बर्‍याच अडचणी होत्या.  समजा जर वरीलपैकी वैर्‍यांच्या यादीतला एखादा प्राणी किंवा कळप त्याच्या मागे लागले आणि तो सवयीप्रमाणे स्व-संरक्षणासाठी खिडकीमधुन घरात लपायला आला. आणि बाकीची गुंड-मंडळी पण त्याच्या मागोमाग घरात घुसले तर घराची नासधुस करतील तो वेगळा भाग पण त्याच्याच जीवाला जास्त धोका होता. दरवेळेला त्याची मदतीसाठी हाक आली आमच्यापैकी कोणी धाव घेत असु. पण अशावेळेला काय करेल मग बिच्चारा? मग शेवटी ठरले की त्याला बाहेरच राहु द्यायचे. निदान अशा प्रसंगाला धावायला त्याला रान मोकळे मिळेल.

गावी तशी त्याची काळजी लागुन राहिलेलीच होती. पण एका गोष्टीमुळे जरा इकडचं लक्ष कमी झालं. गावच्या घरात एका मांजरीची नुकतीच जन्मलेली पिल्लं आलेली होती. एक थोडे राखाडी रंगाचे होते आणि एक पांढरट सोनेरी होते. दोघेही छान होते इल्लु-पिल्लुशे. दोघांच्या लीला पाहुन, हि लोकं टुटुचसारखं करताहेत असेच वाटत होते. टुटुची उणीव त्यांनी भरुन काढली.

जेव्हा आम्ही गावावरुन परत आलो. तेव्हा घराजवळ आल्या आल्या टुटु इकडे-तिकडे फ़िरत असताना दिसला. इतके दिवस बाहेर राहुन त्याला वाईट संगत तर नाही ना लागली. भीती वाटुन गेली.
बराच वेळ घरात तो आला नाही. छ्या! बोका हाताबाहेर गेला वाटते, मनात पाल चुकचुकली. पण थोड्याच वेळात तो आला. आम्हाला अचानक भुत दिसल्या सारखं आम्ही त्याला बघतच राहिलो. हे काय म्हटलं? एवढा प्रचंड? हा नक्की टुटुच आहे ना? बापरे एवढा मोठा का दिसतोय? आणि केवळ पंधरा दिवसात एवढी झपाटयाने वाढ? एवढा पांढरा फ़टफ़टीत? याला काही झालं-बिलं नाही ना? अरे हा काही बोलत पण नाही, नुसतेच तोंड हलवतोय. आइंग! असे कसे? आमच्या कानाचा काही प्रोब्लेम तर नक्कीच नव्हता. हो, अगदी खात्री होती. मग असे का? बोल की रे......
त्याला हात लावायला पण भीती वाटत होती. तो सवयीप्रमाणे पायाला घासायला जवळ वगैरे यायला लागला. पण भीतीने मी मागे जात होते. तो मग विचारात पडल्यासारखे बघत उभा राहिलेला.

त्यानंतर आम्हाला जाणवले, अरे खरचं आपला टुटु मोठा झालाय. रोज नजरेसमोर असल्या कारणाने ते आम्हाला कळत नव्हते. ८-१५ दिवस त्या पिल्लांना बघत होतो. त्या पिल्लांना बघताना बालपणीचा टुटु डोळ्यासमोर येत होता. टुटुचे त्यावेळेचे रुप काही दिवसांसाठी विसरुन गेलेलो. आणि त्या तुलनेत टुटु अचानक प्रचंड वाटायला लागलेला. पांढरा दिसण्याचे कारण पण ती पिल्लं होती. गावच्या मातीचा रंग चढलेला होता त्यांच्यावर. आणि आवाजाचे असे झाले की टुटुचा आवाज खरंच फ़ुटत नव्हता. इतके दिवस कोणी बोलायला नव्हते ना त्याच्याशी. गप्प राहुन राहुन त्याचा आवाज अगदी बंदच झालेला. टुटु बिच्चारा आमच्या नसण्याने त्याला खरंच काय काय सहन करावे लागले होते असेल.

माझ्या अनुभवाप्रमाणे, मांजरी बोक्यापेक्षा जास्त माणसाळलेल्या आणि कमी अग्रेसिव्ह असतात. आणि टुटु मांजरींपेक्षा अधिक समजुतदार आणि शांत स्वभावाचा होता. तो जस-जसा मोठा होत गेला, तस-तसा तो दिवसेंदिवस अधिकाधिक केविलवाणा, मृदु  वाटत होता. इतकेच कशाला, त्यावेळेला मला वाटते माझी भाची साधारण वर्षभराची होती असेल. ती येता-जाता त्याच्या खोड्या काढत असायची. कधी त्याचे कान धरुन चाव-माव करायची. कधी शेपटी ओढायची तर कधी केस उपटायची. पण बोका असुन पण त्याने ते सर्व सहन करायचा. अगदीच त्याला जेव्हा सहन नाही व्हायचे तेव्हा तो आपला मऊ पंजा अलगद तिला मारायचा. असं वाटायचे, तो म्हणतोय ’अट्ट लब्बाल’. जणु काही त्याला तेवढी जाण होती की ती लहान आहे. खरंच असा बोका ’न भूतो, न भविष्यति’

एक अनुभव इथे खास share करावासा वाटतो. माझे डिप्लोमाचे शेवटचे वर्ष होते. Final Exams चालु झालेल्या. घरात फ़क्त दादा-वहिनी आणि मीच. तेव्हा माझी भाची नव्हती म्हणजे माझी भाची जन्मायची होती. बाकीचे सर्व गावी गेले होते. त्याच दरम्यान वहिनीच्या माहेराहुन सर्व जण त्यांच्या गृह-प्रवेशासाठी गावाला जाणार होते. वहिनीच्या घरातले सर्वच जण जाणार असल्याने तिला पण सहाजिकच जायची ओढ वाटु लागलेली. त्यातुन ती आमच्या परिवारात सामील होऊन वर्ष पण झाले नव्हते. गावी जायला तिचा जीव झुरत होता. एक्झाम्समुळे मी गावी जाण्याचा काही प्रश्नच नव्हता. पण मला एकटीला सोडुन जाणे पण पटत नव्हते. शेवटी मग एक पर्याय सुचला. ’दिपू’ माझी वर्गमैत्रीण, तिला सोबत रहायला बोलवायचे. तशी ती पण कधीतरी आमच्याकडे रहायला यायची. झाले प्रश्नच सुटला. मग दादा-वहिनी निर्धास्तपणे गावाला जाऊ शकले.
एक-दोन दिवस ठिक गेले. दिपू होतीच सोबत. आमचा शेवटचा पेपर राहिलेला. तोपर्यंत मध्ये सात दिवसाची सुट्टी होती.
झाले. गावाला जायला दिपू नेहमी संधी शोधत असायची. तिचे आई-बाबा गावाला रहायचे ना. दोन-चार दिवस लागुन सुट्टी आली की ती लगेच गावाला जायची. सात दिवस सुट्टी आणि ती गावाला जाणार नाही, असे शक्यच नव्हते. तिने त्याबद्दल मला विचारले सुद्धा. मला एकटीने रहायची कल्पनापण सहन झाली नाही. याआधी कधी एकटी रहायचा कधी संबंधच आला नव्हता. पण तिला 'नाही' सांगणे पण मला ठिक वाटले नाही. तसे म्हटलं तर दोन-तीन दिवसाचाच प्रश्न होता. त्यानंतर गावावरुन दादा-वहिनी वगैरे येणारच होते. शिवाय तसे बघायला गेलं तर अगदीच एकटी नव्हते मी. माझा हिरो होता ना सोबत - टुटु

पहिल्यांदा मी ’Home - Alone’ चा अनुभव घेणार होते. खरं सांगायचे तर मला पण मजा वाटत होती, असे काहीतरी Thrill वगैरे वाटत होते. घरात फ़क्त आपलंच राज्य. पाहिजे तेव्हा, पाहिजे ते करायचे. काहीही खा-प्या. कोणी अडवणार नाही. त्यात वरुन सगळ्यांची सहानुभुतीपण. सहीच सगळं. असो.
बाकी काही प्रोब्लेम नव्हता. पण रात्री फ़ार भीती वाटायची. बारा वाजेपर्यंत झोपच नाही यायची. आणि त्यानंतर तर भुत-लोकांचा Office-Time सुरु होतो ना.

’Home - Alone : रात्र पहिली’

 बारा वाजुन गेले तरी साहेबाचा पत्ता नव्हता. नाईलाजाने खिडकीचे एक तावदाण जरा ओपन करुन ठेवले. ’चक-चक’ असा आवाज केला की तो कुठे असेल तेथुन धावत यायचा. मग खिडकीतुनच त्याला आवाज दिला. पण तो काही आला नाही. मग मनात विचार आला असेच डोळे मिटुन पडुन राहुया. तो आला की मग झोपायच्या आधी खिडकीचे तावदाण आठवणीने ओढुन घेऊ. मग अचानक जाग आली. अरे बापरे! घड्याळात पहाते तर एक वाजुन गेलेला. उठुन आधी खिडकीकडे पाहिले. तर खिडकी वार्‍याने वाटते बंद झालेली. खिडकीच्या पुसट काचेपलीकडे टुटुची आक्रुती दिसत होती. बिचारा खिडकी ओपन व्हायची वाटच पहात होता. कधीपासुन तेथे होता देव जाणे. लगेचच उठुन आधी त्याला आत घेतले. टुटु कधीही घरात आला की आधी जाऊन पाणी प्यायचा. त्याच्यासाठी एक भांडे भरुन ठेवलेलेच असायचे. तसा तो पाणी पिऊन माझ्या अंथरुणात माझ्या सोबतच येऊन झोपला. जाग आली तेव्हा चार-साडे चार होऊन गेलेले. ती वेळ बघुन जीवात जीव आला माझ्या. आई सांगते, चार नंतर राम-प्रहर सुरु होतो. भीती मावळली. माझी सर्व कामे सहा - साडे सहाच्या आतच आवरत होती. ८ ते ९ पाण्याची वेळ. बाकीची कामे पण विशेष नसायची. एकटीच असल्याने जेवणात 'full adjustment' - ब्रेड, बटाट्याची भाजी आणि चहा. अभ्यास करुया म्हटलं तर उरलेला पेपर सोप्पा होता. म्हणुन अभ्यासाला हात घालायला कंटाळा येत होता. माझ्या काळजीपोटी गावावरुन दोन-तीनवेळा फ़ोन यायचा . घर आणि दिवस खायला येत होते. पण तरीही टुटु सोबत असल्याने एवढे विशेष वाटत नव्हते. त्याच्या सोबत मी बडबड करायची. त्याला ओरडायची. तो बिच्चारा माझे सर्व ऐकत दिवसभर माझ्या मागे फ़िरत रहायचा.

’Home - Alone : रात्र दुसरी’

या रात्री पण बराच वेळ टुटुची वाट बघितली. एक वाजून गेला. आदल्या रात्री प्रमाणे खिडकीचे एक तावदाण ओपन ठेऊन मी डोळे मिटुन पडुन राहिले. पण कधी गाढ झोप लागली कळालेच नाही. साधारण दोन-अडीच वाजले असतील. कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज यायला लागला. मांजराच्या ओरडण्याचा आवाज पण येत होता. मी खडबडुन जागी झाले. सर्वात आधी टुटु घरात आला की नाही, ते पाहिले. कुत्रे बिल्डिंगमध्ये घुसल्यासारखे वाटत होते. भीती वाटली, ते कुत्रे टुटुच्याच मागे लागले असणार. मी एक दांडा (पोलिसांचा असतो ना तोच) हातात घेतला आणि कसलाही विचार न करता, सरळ बाहेर आले. त्या कुत्र्यांना हाकलवुन लावले. पण त्या कुत्र्यांना हाकलवता-हाकलवता  टुटुपण पळाला तेथुन. समोरच्या बिल्डिंगच्या मागे गेला. ’Oh, no! damate...’ म्हणत त्याच्या मागोमाग मी जायच्या विचारातच होते की मी भानावर आले. मध्यरात्र....त्यात मी एकटीच बाहेर....आजुबाजुला कोणी नाही. तडक घरात गेले. पण टुटुला परत बघितल्याशिवाय मला चैन पडणे शक्य नव्हते. पुन्हा खिडकीत येऊन टुटुला आवाज दिला. २-३ मिनिटे झाली तरी हा भाई कुठे दिसेना. मग धाकधुक वाढायला लागली. देवाचा धावा करत होते, त्याला सुखरुप आण असा. आणि समोरच्या बिल्डिंमागून एक पांढरा गोळा कान मागे करुन जोरात धावत येताना दिसला. तोच होता. धावतच खिडकीत चढला. धापा टाकत मागे बघत होता. माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले. तो सुखरुप घरी आलेला. तो त्या रात्री कुशीत येऊन झोपला. सकाळी जाग आली, तेव्हा लक्षात आले की रात्री दाराला कडी लावायची विसरुन गेलेले. पण रात्रीच्या थरारापुढे हे विशेष नव्हते. हा प्रसंग आज पण आठवला, तरी कमाल वाटते.

नंतरच्या दोन रात्री सामान्य गेल्या. टुटु वेळेत घरी आलेला.

मांजरांबद्दल एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. हा प्राणी कडाक्याच्या थंडीत तुमच्या अंथरुणात वगैरे जरी शिरत असला, तरी उन्हाळ्यात तो तुमच्या अंथरुणाकडे ढुंकुनही बघणार नाही. पण टुटुची कमाल वाटते कारण 'Home - Alone' च्या वेळेला कडक उन्हाळा चालू होता. ज्या मांजर प्राण्याला उन्हाळ्यात आपली उब सहन होत नाही, तो चार रात्री कुशीत झोपत होता. हि खरोखरीच कमाल नाही का? त्याच्यामुळे खरंच त्या चार रात्री मला विशेष अशी भीती वाटलीच नाही.

गावावरुन आल्यावर घरातल्यांना हा प्रसंग सांगितला. ’खय गे होती माझी बाय ती’ करत माझे शोलीट कौतुक-बिवतुक झाले. घरातल्यांसाठी जरी मी हिरोईन वगैरे झालेले. पण माझ्यासाठी मात्र ’तो’च 'Man of the Match'होता.

त्या प्रसंगाबद्दल आई आजपण टुटुला मानते.  तिच्या मते, चार दिवसांसाठी तो माझा पाठी-राखाच बनलेला होता. ती त्याच्यासाठी या अर्थाचा मालवणीतला एक कोणता तरी शब्द पण वापरायची. सध्या तो तिला पण आठवत नाही आहे. पण खरच खूप गोड शब्द आहे. आठवला की नक्की  कळवेन.  

खर्‍या अर्थाने त्याने मला दिवस-रात्र सोबत केलेली. त्याच्या सोबतच्या त्या चार रात्री आणि ते चार दिवस खरंच अफ़लातुन होते.

Tuesday, November 30, 2010

भुर-भुर

रडु नको शोना, आई कुठे नाही जाणार...
बाळाला आई आज, भुर-भुर नेणार...

उंच उंच डोंगराच्या, टोकावर जाऊ
काळ्या-पांढर्‍या ढगांना, रंग थोडे लावु
रंगीबेरंगी ढग मग, मस्त मस्त दिसणार...
बाळाला आई आज, भुर-भुर नेणार...

ढगांना घेऊन सोबत, जाऊ जरा पुढे
पाहु मग सन-बाप्पा अन मुन-मामाचे वाडे
त्या दोघांसोबत दोघे आपण, तुप-रोटी खाणार...
बाळाला आई आज, भुर-भुर नेणार...

चिऊ-काऊला घेऊन मांडू, भातुकलीचा डाव
भुभु-माऊच्या सोबत, खेळु चाव-माव
मी चोर तु पोलीस, ढिश्शुम-ढिश्शुम करणार...
बाळाला आई आज, भुर-भुर नेणार...

खुदकन हसे बाळ, जरा विसरेल जेव्हा
जाईल कामावर आई, फ़सवुन तेव्हा
कामामध्ये जीव आता, कसा-बसा लागणार...
बाळाला आई आता, कुठे नाही नेणार...

लवकर-लवकर धावत-पळत, येईन तुझ्यासाठी
रुसुन तू कोपर्‍यात, घेऊन बस काठी
बघुन मात्र मला ’उच्चून घे’ सांगणार...
उराशी बाळाला घट्ट कवटाळुन घेणार... 

जाऊ आता चौपाटीवर, तु चने-शेंगदाणे घ्यायचे
मी आपटेन हात-पाय, मला आईस्क्रीमच पाहीजे
खोटे-खोटे रागवशील तू, मी खोटे-खोटे रडणार
आईला बाळ मग गुदु-गुदु करणार...
हसता-हसता आईचे डोळे भरुन येणार...

Monday, November 22, 2010

क्या कहूं


क्या कहूं जान...
जिसे देखो तुम्हारे ही खयालों में डुबा हुआ है...
मेरा क्या है, मैं तो जी रहा हुं जुदा होकर
धडकने तो बस नाम की हैं, दिल तो कब का मरा हुआ हैं...

चलो कोई बात नही
सुना हैं, मरने के बाद ही सही
सुकुन तो मिल ही जायेगा...
घाव पुरा भरे न भरे उपर से तो सील जायेगा...

सभी कहने लगे हैं पीठपीछे
के बदल सा गया हुं...
हा मगर सच हैं तेरी दुनिया से दूर
अलग से रहने लगा हुं ...

राहे भी मोड रख्खी हैं गलीयो से तेरी ...
नजरे छुपा के चलता हुं नजरो से तेरी ...

डरता हुं कही तेरे नजरोसे टकरा न जाऊ...
मौत का डर नही, सोचता हुं कही फिरसे जिंदा न हो जाउ...

Friday, November 19, 2010

टुटु


सुरुवात कशी करू, समजत नाही. आज अचानक एक लेख वाचनात आला आणि त्याची उणीव तीव्रतेने जाणवू लागली. तसे पाहता, त्याची आणि माझी जेव्हा ताटातूट झाली; मला खूप त्रास झाला, वाटले मी याला कधीच विसरू शकणार नाही. पण आपण आपल्या व्यापात एवढे गुंतून जातो कि कधी काळी आपला 'जीव कि प्राण' जरी असला तरी त्याचासुद्धा विसर पडू शकतो.

बाबांनी त्याला घरात घेतलेलं. त्यांना मुळात प्राण्यांबद्दल एवढी ओढ वगैरे नाही. एवढंच काय तर इतरांना प्राण्यांविषयी (त्यात मनुष्यप्राणी सुद्धा मोडतो) असलेल्या प्रेमाबद्दल पण त्यांना ते थोडे 'अति' करतात असे वाटते. तसे ते प्रेमळ आहेत पण ते व्यक्त करण्याबाबत त्यांचे विचार काहीसे जुन्या पद्धतीचे आहेत.

मी त्यावेळेला डिप्लोमाच्या पहिल्या वर्षाला होते मला वाटतं, नीटसं नाही आठवत. आम्ही गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत जायच्या तयारीत होतो. आमच्या वरळी 'ल' - विभागाचा राजा. दुपारी दीड- दोनच्या सुमाराला साधारणपणे आमचा गणपती बाहेर पडायचा.

दाराबाहेरून कसलातरी 'चीव-चीव' अगदी केविलवाणा असा आवाज आला. आवाज 'चीव-चीव' जरी असला तरी चिमणीचा नक्कीच नव्हता.
दार उघडून पाहिले तर उंबर्याला अगदी चिकटून उभे राहिलेले एक soft toy च जणू . शेपटी काटकोनात उभी आणि कदाचित कुठल्या स्कूटर किवा गाडीच्या खालून आला असेल कि काय म्हणून नाकाला काही काळे लागलेले. नंतर कळाले त्याचे नाकच तसे होते. पाठीवर आणि पायावर काही ठिकाणी मोठे काळे  डाग होते. शेपटी पण काळी होती.  बाकी ते अगदी शुभ्र, अगदी आताच धुतल्यासारखे .

बाबांनी बघितले आणि ते म्हणाले," ह्येका काय तरी घालो गो, केव्हद्ह्यान इफळाकता. भुकेला असत."
माझ्या बाहुलीला म्हणजे बहिणीला आणि मला हा सर्व प्रकार गमतीदार वाटला. आम्ही दोघींनी आईकडून एका बशीत दुध आणले. बिच्चारे खरच भुकेलेले होते, लगेच बशी चाटून-पुसून साफ पण झाली. मग ते कोपर्यातल्या शेजार्यांच्या दाराबाहेर एकच बूट ठेवलेला होता, त्यात जाऊन बसले. आणि लगेच झोपले पण.
दोन दिवस असाच उपक्रम चालला होता. कधी आम्ही त्याला गरमा-गरम चपातीचे तुकडे घालत होतो तर कधी दुध. ती बशी आईने त्याच्याच साठी ठेवून दिली. ती वेगळी गोष्ट होती की, त्या मांजराने तोंड लावलेलं भांडं आई परत घरात वापरायला घेणार नव्हती.

तिसर्‍या दिवशी, रात्री १२.०० किवा १.०० च्या सुमाराला दाराबाहेर कुत्र्यांची आरडा-ओरड ऐकायला आली. बाबांना लगेच जाणवले. ते काठी घेऊनच बाहेर गेले. ४-५ कुत्री त्या पिल्लासाठी बिल्डींगमध्ये शिरलेली. सगळ्यांना हाकलवून लावले बाबांनी. म्हणून पिल्लू बिच्चारे वाचले.  आठवड्यापूर्वीच या पिल्लाचा एक भाऊ या कुत्र्यांनी गायब केलेला. मग बाबाच त्याला घरात ठेवण्याबद्दल म्हणाले. पिल्लाचा जीव वगैरे सर्व ठीक आहे, पण पिल्लू घरात म्हणजे. मला किळस वाटली. मला प्राणी आवडत नाही अशातला भाग नाही, पण ते घराबाहेरच ठीक वाटतात.

आम्ही गावीपण कधीच्या काळी जायचो ना, तेव्हापण ह्या मांजरांमुळे मी वैतागलेली असायची. घरात नाही म्हटले तरी ४-५ मांजरे सहज दिसायची. घरात कुठे पण बघावे तिथे आपले एक तरी मांजर असायचे. बरे लांबूनच जातील तर ते पण नाही, पायाला घासायला यायची. आई काठीने त्यांना हाकलवून लावायची आणि मग मी कडी-कुलुपात जेवायला बसायची. पण निदान गावी घर मोठे असल्याकारणाने पळायला तरी वाव असतो. आणि इथे तर बापरे ! मला कल्पना पण सहन होत नव्हती.

तेव्हाच बाबांना सांगितले, ते घरात आलेलं मला चालणार नाही. बाबा मला अगदी 'बाबा-पुता' करून समजावत होते. सकाळी जाऊदे ते बाहेर पण आता घरातच असू दे. "किचन मध्ये ठेवूया, थयच झोपत बिच्चारा...बाहेर तेका कुत्री नाय करून टाकती."
बाबांनी शब्द दिला मांजराच्या वतीने कि तो रात्रभर त्या खोलीतून कुठेही हलणार नाही. बाहुलीने लगेच एक shoe -box आणला, त्यात एक कापड घडी करून ठेवले. आणि तो box एका पाटावर ठेवला. आश्चर्य म्हणजे ते पिल्लू लगेच त्यात जाऊन बसले. त्या बुटापेक्षा हे जरा प्रशस्त वाटलं असेल त्याला. तसेहि त्याचा आकार त्या बुटात पण सहज मावत होता. इल्लू-पिल्लूसं होतं अगदी. मग बाबांनी त्या box वर झाकण सरकवले माझ्या सांगण्यावरून. ते मलाच अति वाटले. म्हटले थोडं ओपन ठेवा एका बाजूने. मग मी निर्धास्त होऊन बाहेरच्या खोलीत झोपली. पण थोड्या वेळात एक कहरच झाला.

मी अर्ध्या झोपेत असेन, त्यावेळेला. मला चादर घेऊन झोपायची सवय होती, माझ्या पायावर काहीतरी जड-जड गरम-गरम काही आहे असे जाणवले. मला आठवले लगेच, हेच कार्टे असेल. डोक्यावरून चादर न काढताच मी किंचाळत होते. बाबा उठले आणि आधी त्याला परत आत ठेऊन आले. मी उठूनच बसले. त्या धाकधुकीत मला काही झोप येणे शक्य नव्हते. माझी झोपच उडाली. त्यापेक्षा पण मला बाबांबद्दल आश्चर्य वाटत होते, परकी का झालेले मी त्यांच्यासाठी? आज ते दीड-दमडीचे पण नसलेले मांजर त्यांना लेकीपेक्षा जवळचे वाटत होते. रात्रभर मला हेच विचार येत होते आणि त्याहून अधिक त्या मांजराचा राग येत होता.

नंतर नंतर दिवसा मला खूप सेफ वाटायचे, निदान कळायचे ते कुठे आहे; रात्री मात्र सतत धाकधूक असायची ते त्या box मधून बाहेर तर नाही ना आले असे.

असो, घरातले वातावरण मात्र पूर्ण बदललेलं. नवीन बाळ घरात आल्यासारखे वाटत होते. सर्वजण त्याच्याशी बोबड्या भाषेत बोलायचे. सगळ्यांनाच कुतूहल होते की तो boy  आहे की girl आहे, अगदी शेजार्‍याना पण उस्तुकता होती या बद्दल. मग मध्येच त्यांना शोध लागायचा तो बोका आहे, अगदी काळ-वेळचे भान न ठेवता त्या आम्हाला सांगायला यायच्या. दोन-तीन दिवसांनी त्याच सांगत यायच्या,''नाय हो सरवणकरांनु, भाटी असतली." शेवटी तो बोकाच आहे यावर शिक्कामोर्तब झाले, ते एक-दोन expert च्या सांगण्यावरून. Expert ने निष्कर्ष काढला, तो त्याच्या मागे बोके (जे त्यांना confirm माहिती आहेत) लागतात त्याला मारायला त्यावरून.  कितीही पुढारलेल्या विचारांचे असलो, तरी तो बोका आहे हे समजल्यावर घरात मुलगा जन्मल्यावर काय आनंद होतो; तो आम्हाला झाला.
त्याचे नामकरण मी आणि बाहुलीने केले - टुटु. सुरुवातीला फक्त आम्ही दोघीच या नावाने हाक मारायचो. मग हळू-हळू इतरांच्या तोंडीपण ऐकायला यायला लागले. कधी कधी तर त्या नावाचे 'टुट्या-फुट्या ' पण व्हायचे. आज त्याने नवीन काय केले, रोजच चर्चा चालायच्या. त्याच्या बर्‍याचश्या गोष्टी खूप cute वाटायच्या. जसे की लहान वस्तूंबरोबर फुटबॉल खेळणे, धागा किवा दोर्‍याबरोबर शिकार-शिकार खेळणे, जरा पिशवीचा किवा कागदाचा आवाज झाला की खाऊसाठी म्याव-म्याव करून घर डोक्यावर घेणे. त्याची समजूत काढताना घरातले लहान होत होते, 'अरे हो बाबा, घे बाबा'. पण त्याच्या काही काही खोड्या माझ्या डोक्यात जायच्या. जसे की एखादा कागद किवा news पापर त्याच्या तावडीत मिळाला की तो उंदीर होऊन जायचा, त्या वस्तूंचा अगदी भुगा होऊन जायचा. आपण बर्‍याचदा खुचीत बसलो की पाय हलवायची सवय असते. टुटु मग पायाबरोबर शिकार-शिकार खेळायला यायचा.  तो आजू-बाजूला असला की मी खुर्चीवर मांडी घालून बसायचे. खाताना त्याचे नखरेच जास्त असायचे. बिस्कीट, फरसाण, lays ते पण american flavour वाले, चपाती ती पण गरम असेल तरच. बरे या सर्वात एक नियम त्याचा त्यानेच ठरवलेला, शेवटचे एक - दोन घास टाकून चालू पडायचे. मग आई म्हणायची त्याला,"हय ये, तुझ्या गळ्यात बांधतंय." त्याला काही फरक पडत नसला तरी आईच्या ह्या वाक्याला मला हसायला यायचे. मला डोळ्यासमोर ते चित्र दिसायचे, की ते शांतपणे मला चूक कबूल आहे अशा आविर्भावात आईच्या समोर मान खाली खालून उभे आहे आणि आई त्या टाकलेल्या तुकड्यांची माळ गुंफतेय.
असो, पण या नियमाला अपवाद मात्र होता तो मच्छीचा. त्याच्या समोर टाकलेली मच्छी तो अगदी गळ्यापर्यंत आली तरी खात होता.

आम्ही तळमजल्याला रहात होतो. टुटुला अजून खिडकीतून ये-जा करायला जमत नव्हती, मग दार थोडा वेळ उघडे ठेवायला लागे. तो जास्त वेळ बाहेर रहात नसे, शरीर-धर्म उरकला की लगेच धावत घरात येत असे. चुकून कधी दार बंद असले की दाराबाहेर तोंड वर करून वाट बघत बसायचे बिच्चारे. बोका असला तरी उन्दरापेक्षा जास्त घाबरट होता. एकदा तर चक्क एक घूस त्याच्या मागे लागली होती आणि हा जीव मुठीत घेऊन पळत घरी आला होता. जरा म्हणून त्याच्यात dashig पणा नव्हता.

तो बाहेर गेला की परत येऊ नये, अशी माझी मनोमन इच्छा असायची. एकदा तर मी चक्क त्याच्या समोर news paper ठेवला. टुटुला सवय होती समोर काही अंथरले की जाऊन बसायचे. तसा तो बसला सुद्धा. त्या बिच्चार्याला काय ठाऊक माझ्या मनात काय शिजतंय ते. मी त्या पेपरासकट त्याला उचलले आणि खिडकीबाहेर फेकून दिले. दाराबाहेर बर्राच वेळ ते म्याव-म्याव करत राहिले, मी दार खोललेच नाही. पण थोड्यावेळाने कोणीतरी दार खोलले असेल आणि हे राजे परत घरात वावरताना दिसायला लागले.

तशी आता मला त्याची सवय झाली होती म्हणा. पण अजून ते मला नकोच होते.

एक दिवस त्याला काहीतरी झाले. रोजच्या सारखाच टुटु खेळत होता आणि अचानक तो जोर-जोराने कर्कश्श ओरडायला लागला. त्याचे पुढचे दोन पाय वर उचलून उभा रहात होता. आधी आम्हाला वाटले, हि काहीतरी नवीन गम्मत असेल. पण अचानक तो जमिनीवर लोळण घेत होता. अगदी मध्येच जमिनीला चिकटत होता. मग शब्दही फुटत नव्हता त्याच्या तोंडातून. मग हालचालही बंद होत होती. खाल्लेले उलटून काढत होता. काय होत होते त्याला कळत नव्हते. सगळेच टेन्शन मध्ये आलेलो. अगदी मी पण. असे त्याचे हाल पहावत नव्हते. ३-४ दिवस झाले, तरी त्याची तब्येत सुधारत नव्हती. दुधाच्या थेंबाला तर स्पर्शच करत नव्हता. बाबा तर सारखे म्हणायचे, "चाक झाली त्येका", देवाला गार्हाणे पण झाले. पण काही फरक पडत नव्हता. घरात कोणी माणूस आजारी असल्यासारखे वाटत होते.
आता मात्र एकच इलाज होता. बाबांनी त्याला सरळ कापडी पिशवीत भरले आणि घेऊन गेले डॉक्टरांकडे. डॉक्टरांनी सांगितलेली औषधे, पथ्य-पाणी आई -बाबा स्वतः एखाद्या लहान बाळाचे करतात तसे करत होते. औषधाच्या गोळ्यांची पावडर करून ती पिठात घालून गोळी बनवायचे मग अक्षरशः त्याला पायावर पालथे घेऊन एकाने त्याचे हात पाय पकडायचे, आणि दुसर्‍याने तोंडात एक बोट घालून औषध आणि पाणी भरवायचे. ते चित्र बघून अगदी रडायला यायचे.  देवाला सांगायची, टुटु आम्हाला हवा आहे. त्याला लवकर बरे कर. आई - बाबांच्या प्रयत्नांना यश दे. असे ३-४ दिवस उलटून गेले, पण टुटु मध्ये सुधारणा नव्हती. आता आता तर तो खोक्या बाहेर पण पडत नव्हता. रात्री किचनचे दार बंद करायची गरज पडत नव्हती. त्याचे ते खेळ, म्याव-म्याव करून घर डोक्यावर घेणे, सगळ्यांचे बोबड्या भाषेत बोलणे - सगळं-सगळं बंद. आता आम्ही आशा सोडून दिली.

आणि अचानक रात्री, मी अर्ध्या झोपेत होते. माझी झोप पुन्हा उडाली. मला माझ्या पायावर काहीतरी जड-जड, गरम-गरम जाणवले. आणि तो क्षण माझ्यासाठी खूप आनंदाचा होता. टुटु त्या ३-४ दिवसांनंतर प्रथमच खोक्याबाहेर पडलेला. मी बाबांना उठवून सांगितले. तो शांत झोपला होता माझ्या पायावर. माझी भीती अद्याप चेपली गेली नव्हती. पण त्याला तिथून हलवू दिले नाही. अजून हिम्मत असती तर त्याला उचलून कुरवाळले असते. पण खरच आई-बाबांच्या कष्टाचे चीज झालेले. आणि त्याचे नाव सार्थक झालेले, टुटुला दुसरा जन्म मिळालेला.

Tuesday, November 16, 2010

तू काही बोललास का ???

तू काही बोललास का 
कि मलाच भास होताहेत....
बघ ना असच होतंय
तू बोलत नाहीस  तेव्हापासून

 
तुझी गोड हाक...
नाहीतर नुसतच ....ए ऐक ना...
कान नुसतेच आसुसलेत शब्दन शब्द झेलायला....
बघ ना असच होतंय
तू बोलत नाहीस तेव्हापासून

 
तू दिलेला मोगरा बघ कसा कोमेजून गेलाय
चांदण्यांचे चेहरे उतरून गेलेत....
उदास रातराणी....पाहवत नाही रे तिच्याकडे
बघ ना असच होतंय 
तू बोलत नाहीस तेव्हापासून

 
मोबाईल.....
पाहिजे त्यावेळी प्रिय जणांशी संवाद साधता येतो....
पाहिजे त्यावेळी??? 
फेकून द्यावासा वाटतो मग.....
बघ ना असच होतंय 
तू बोलत नाहीस तेव्हापासून

 
खिडकी मध्ये किती येरा-झाऱ्या झाल्या असतील.....
कितीदा उगीचच दार उघडून बघितले असेन.....
वाटतं.....तु पाहतोयस माझी बेचैनी...आणि कळतंय तुलाही....
बघ ना असच होतंय
तू बोलत नाहीस तेव्हापासून

 
काय करायचं रे मी अशा क्षणाला???
तुझी नितांत गरज आहे....तुझ्या मिठीत विसरून जायचय जगाला....
बोल ना....तुझा अबोला जीव घेतो माझा....
अं.......काही बोललास का???
नाही मला भासच होताहेत......

कातरवेळ

अशा कातरल्या वेळी, तुझी आठवण येई 
एका मागोमाग एक, ऊर भरून का जाई...

तुझ्या आठवणी किती, ऊर जड मन जड
झाली घागर पालथी, पाणी पाहे घडा-घड...

जाते वाहुनिया पाणी, परी रिकामी न होई
येते कोठुनी हे पाणी, कशी भरुनीच राही...

पाट पाण्याचा पाण्याचा, वाहे मनाच्या मळ्यात 
व्याकुळले एक झाड, उभे त्याच्या ओहोळात 

वेड्या आठवांचे झाड, कसे जगले जगले 
कधी किलबिलाट सारा, कधी एकले एकले...

जीर्ण झाड ते केवढे, परी रंग तो कोवळा 
उंच उंच गेले वर, हात टेकते आभाळा...

निळ्या सावळया आभाळी, तू च तू च भरशील
डोळ्यातून आत आत, देहभर फिरशील...

अरे पुरे तो प्रवास, नको एवढा दमूस
खरोखर भेट कधी, नको सावली धाडूस...

जाई विरून सावली, बघ आल्यावर रात 
मग पाझरेण मीही, खोलवर काळजात...

तुला होतात का कधी, माझ्या सावलीचे भास 
माझ्या सारखेच तुझे, होतात का जड श्वास...

तुला तुझे व्याप भारी, कशी मीही आठवेन
काही वावगे न त्यात, कशी मीही रागवेन...

दिवे लागणीची वेळ, घर आवराया हवे
'हे' येतील च आता , मना सावराया हवे...

तुही निघ आता, माझी कामे रेंगाळली
तू होशील नाहीसा, मीही होते  इकडली...

घेतल्या का संगे  तुझ्या ,तुझ्या  सर्व  खाणाखुणा
अशा कातरल्या वेळी, भेटू सवडीने पुन्हा...

नको वळून पाहूस, नको पाहू दीनवाणे
वळू नको मागे आता, जा निघून वेगाने...

तुला सांगताना असे, माझा जीव असा जाई
अशी कातरली वेळ, मन कातरून जाई...

माझ्या बाळाची शाळा...

चला चला उठा बाळा,
बाळ माझा उठतो ना...
लवकर लवकर आवरा आता,
आपल्याला शाळेत जायचं ना...

आई थांब गं जरा,
उठतो मी...
आंघोळ पण करतो मी...
पण आज नाही शाळेत जाणार मी...

अरे राजा, पम-पम मधून जाऊ आपण,
पाय तुझे दुखतील ना....
दप्तर -बॉटल आई घेईल,
बाळ माझा थकतो ना...

आई पम-पम मधून फिरेन मी...
बाहेरचं मम-मम खाईन मी...
पण आज नाही शाळेत जाणार मी...

अरे बापरे, पाऊसपण आला,
बाळ माझा भिजेल ना...
छानसा रेनकोट घेईल आई,
मग गोड गोड दिसेल ना...

हो गं आई, रेनकोट घालून जाईन मी...
छत्रीपण सोबत घेईन मी...
पण प्लीज आई, आज नाही ना शाळेत जाणार मी...

अले...शाळेत नाही गेलास, तर हुशार कसा होणार,
सगळे तुला हसतील ना...
आईला तुझ्या अडाणी म्हणतील,
मग तुला चालेल ना...

नाही गं आई.....असं कसं होऊ देईन मी...
खूप-खूप शिकेन मी....
शिकून मोठा होईन मी....
जगासमोर तुझे नाव, उंचच उंच ठेवेन मी...

कोणी रे शिकवले हे सारे,
किती छान बोलतो ना...
काजळ-बोट लावू दे रे,
माझीच नजर लागेल ना...

Internet : एक व्यसन...

आजपण दिवसाची सुरवात,
रोजच्यासारखीच झाली...
सहकार्यांना Good Morning बोलण्याआधी,
Login- घाई केली...

चार -पाच Unread Message पाहून,
हायसे थोडं वाटलं...
इकडच्या तिकडच्या जाहिराती होत्या,
तिथच मन खुटलं...

Chat Room मध्ये कोणी दिसतंय का,
टाकली जरा नजर...
माझ्याशिवाय कोणीच नव्हते,
मीच फक्त हजर...

आठवलं मग Orkut,
म्हटलं कट्ट्यावर मारू फेरी...
Scrap नाहीतर Testimonial ,
कोणी भेटेलच कि तिथे तरी...

Community चा मान म्हणून,
थोडं तिथं पण डोकाऊ...
नवीन Forum ना सही,
पण रिप्लाय-बिप्लाय देऊ...

Server झाला Down,
आणि Connection गुल्ल झालं...
आता काही सुचणार नाही,
डोकं भनभनायला लागलं...

एकवेळ फोन नसला चालेल,
पण Internet मात्र हवे...
मित्रांसोबत काम करायचे,
हे सूत्र नवे...

तितक्यात आलं कोणीतरी,
चौकोन प्रकट झाला...
अजून एक हिरवा टिंब पाहून,
थोडा जीवात जीव आला...

Good Morning आणि How r u,
अशीच असते सुरवात...
मी मजेत रे, बाकी बोल विशेष,
गाडी धावते मग सुरात...

जेवणाच्या वेळेपर्यंत मग,
कोणीच बोलत नसते...
डब्यात काय आहे आज?
आवर्जून विचारणा असते...

आज सकाळपासून Desktop वर,
तुझं दिसणं कमीच होतं...
खूपच काम होतं वाटतं,
Schedule Busy होतं...

दमायला झाले आज तर
Boss ने डोके फिरवले यार ...
चालायचंच ... Boss शेवटी
Tension नको घेउस फार...

कधी चौकशी, कधी समजावणे,
कधी फक्तच गप्पा चालतात...
कधी सल्ले, कधी भांडणे,
कधी अक्षरशः एक-मेकांना झेलतात...

चला निघा आता दिवस संपला,
आठवण करण्यात येते...
रोजच्या सारखीच आजची पण
अशीच सांगता होते...

एक वेडा प्रयत्न...त्रिवेणी

आठवतं तुला .....काही चांदण्या तू माझ्या नावावर केलेल्यास???
बरेच दिवस झाले .....दिसल्या नाहित आकाशात....
.
.
.
फसवलं जाण्याचे दुःख सुद्धा भयानक असते, नाही का?....

***

तुझ्या उबेची सवय ....
नेहमीच तुझे गरम श्वास माझ्या श्वासात मिसळलेले...
.
.
.
हल्ली गारवा वाढलाय ...ना रे...

 ***

निरोप घेताना.... कधी तुझा रडवेला चेहरा तर कधी तुला न पडणारा फ़रक
दोन्ही माझ्यासाठी किती त्रासदायक
.
.
.
पहिला जीवाला हात घालतो आणि दुसरा जीवच घेतो

***