माझं जग...माझं आभाळ

माझं जग...माझं आभाळ
थोडंसं वास्तव परिस्थिती पासून दूर जाऊन, कधी एक-एकट तर कधी कोणी सोबत घेऊन ...

Sunday, February 6, 2011

श्श्श...!!!


सर्वांनी लागणारे सामान जसे की अंथरुणं, चादरी, उशा घाई-घाईने जसे आठवेल तसे भराभर पण ’हु की चु’ न करता नेले.
मी अलगद पांघरुन सरकवले त्याच्यावर. झिरोचा बल्ब ऑन केला. बल्ब ऑन करतानाचा बटणाचा ’खट’ करुन आवाज होऊ नये म्हणुन सर्व भार पोटात झेलला. रुममधला मुख्य दिवा ऑफ केला. बटणाच्या आवाजाच्या बाबतीत बल्ब ऑन करतानाची सर्व प्रक्रिया रिपीट. इतक्या हळुवारपणे सर्व घडत होते तरी धाकधुक होतीच.
न राहवुन जवळ जाऊन एकदा ती इवलीशी ’डेंजर’ मुर्ती वाकुन पाहिली. अंधुक प्रकाशात पण blanket खाली लपलेला माझा काजळ-तिटीवाला चांदोबा उठुन दिसत होता. इवल्याशा चेहर्‍यावर ती तीट भली मोठी दिसत होती. गच्च मिटलेले इंटु-पिंटुकले डोळे. काजळ-तिटी इतकेच उठुन दिसणारे पापणीचे लांब केस.  खरंच किती गोड दिसतो असा. भुरु-भुरु केसांना हिंमत करुन थोडे तेल लावले. श्वास थांबवुन त्याच्या गालांना, थंड-थंड नाकाला गालानेच स्पर्श केला. वरच्या ओठाच्या तावडीतुन खालच्या ओठाची सुटका करण्यासाठी हनुवटी हलकीच दाबली. गाल अजुनही हुप्पच. कोणासारखा दिसतो बरं? त्यांचा सारखा? की माझी कॉपी? इतका वेळ पहाणं बरं नाही. आईची नजर जास्त लागते म्हणतात.
झाले, अचानक इतका वेळ कोंडले गेलेले दोन्ही हात त्यांच्या वरच्या blanket चे वर्चस्व झुगारत एकाच वेळी बाहेर पडले. मग त्या चळवळीत पायांनी सहभाग घेतला. चुळबुळ करत चिमुकल्या हातांनी चिमुकल्या नाकावर हल्ला चढवला. ’नाही-नाही’ करत नाक इथुन-तिथे पळत होते. दंगल उसळण्याआधी आटोक्यात आणनं सर्वांच्या हिताच्या द्रुष्टीने गरजेचे होते. त्याला कुशीवर वळवुन ’ये गं गायी गोठ्यातं’च्या चालीवर थोपटायला सुरुवात केली. हुश्श... पुन्हा एकदा राज्यात शांततेचं साम्राज्य पसरले.

याआधीच म्हणजे अगदी काही मिनिटांपुर्वीच हे चिमुकलं तुफान थंड झालं होतं.

"जिंग्ग टु टु टु......"
अरे बापरे, याला मध्येच कसं आठवलं ’जिंगल टून’?
तुम्हाला ’जिंगल टून’ माहिती असेलच. लेकुरवाळ्यांना तरी ग्रुहीत धरायला हरकत नाही. जिंगल टून म्हणजे मराठी बाल-गीतांचे अनिमेटेड कलेक्शन. असो.

झालं असं की एकतर Laptop ह्याचे काका काही कामासाठी म्हणुन घरी घेऊन गेलेले. त्याला विसरंवायला म्हणुन मोबाईल पुढे केला.
"हे घे बाबु....मिबाईलमध्ये गाणं लाव तुझं"
साधासुधा नाही, चांगला ८-१० हजाराचा मिबाईल सोर्री मोबाईल. (हल्ली चुकुन कधी ऑफिसातपण  पण त्याच्या भाषेतला एखाद-दुसरा शब्द बाहेर पडतो.) मोबाईलच्या किमतीचं कौतुक आपल्याला. त्याला मोबाईलच्या किमतीशी काही देणं-घेणं नाहीच. मोबाईल फेकताना त्याच्या किमतीचा काही उपयोग नसतो ना. त्याने शांतपणे हसत-हसत मोबाईलचा स्विकार करुन क्षणाचाही विलंब न-लावता जाईल त्या दिशेत मोबाईल भिरकवुन दिला. हे मध्ये आले नसते तर भिंतीवर आपटुन त्या बापड्या मोबाईलचं काय होणार होतं, हे लिहायला नको. पण इथे बिच्चारा झाला ’बाबा’. असो, मोबाईल सलामत राहिला नसता तर या बिच्चार्‍या बाबाने मला बिच्चारं करुन टाकलं असतं त्याच्या हातात मोबाईल दिला म्हणुन.
"जिंग्ग टु टु टु आव ना....."
"अले, कम्पुटल उंदील घेऊन गेला ना, मग कसं लावणार ’जिंगल टून’?"
जी वस्तु त्याला द्यायची नाही म्हणुन लपवली जाते किंवा खरंच उपलब्ध नसते ती वस्तु उंदीलमामा घेऊन जातो.
"ओलल....ओलल...ना उंदिल्ला."
"ए.....उंदील अको कलु अशं...ओरडली. बश?"
"ए....तु पन ओलल...", बाबावर हुकुम सोडण्यात आलेला.
"ए आई, पप"
"अ अ अं..ह्य ह्य ह्याआआआआआ"
"मला नको, उंदराला ओरडा हो."
"ए, उंदील जा इथुन."
कानाकोपर्‍यात थोडसं वाकुन उंदीरमामाला आव्हान केलं गेलं.
"कको कलु ना...अट्ट....लब्बाल....माल्नाल. तिके ज़ा तिके ज़ा ना.", उंदीरमामाला उगारलेला एवलाशा हात  कानापर्यंतची उंची गाठत नाचत होता.
मग वन बाय वन आजोबा-आजी दोघांना वटहुकुमाचे पालन करायचे आदेश देण्यात आले.
"चल...", असे म्हणुन माझा हात पकडुन मला ओढायचा प्रयत्न सुरु झाला. प्रयत्नांची दिशा दाराकडे बोट दाखवत होती.
"अरे सोन्या, बाहेर कोणी नाही आहे. सगे जो-जो करतायत. बाप्पा तुला गंदु-बॉय बोलनाल. छी, अद्वैत इज गंदु-बॉय."
"टेअस....टेअस जाऊ ना"
"ए टेरेसवर बुवा बसलाय. तुला पकलनाल. बाप्पे....अको अको."
"छोल...छोल.....अचु दे....छोल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल.........", म्हणत साहेबांनी दारात लोळायला सुरुवात केली.
अशा वेळेला त्याला उचलुन घेणं म्हणजे (विक्रमी पॉज).....जाऊ दे, काय लिहु सुचत नाही आहे (अशा प्रसंगी माझी स्थितीपण अशीच होते).
कशी-बशी बाल्कनीतुन 'स्टार्स' बघण्यावर मांडवली होते.
मग मच्छरांच्या थव्यासोबत इकडुन तिकडे चकरा मारत चांदण्या काऊंट करायला सुरुवात केली जाते.
"टु... थी... फोल... बोल ना...तु बोल"
"फाईव्ह, सिक्स, सेव्हन, एइट?"
"नाई, ट्टेन"
"अले वा....अद्वैत इज?"
"गुब्बा"
"हा गुड बॉय....आता आदी जो-जो कलनाल. हो ना?"
माझ्या एका खांद्याचा स्टिअरींग सारखा उपयोग करत बाल्कनीतुन बाहेर पडणार्‍या आईच्या लबाड पायांना पुन्हा बाल्कनीत वळवलं जातं.
"बोल ना ...टिंकाल-टिंकाल..?"
"लिटील स्टार्स"
"हाय मर वंदल.. वाटु...?"
"आर...अप अबोव्ह द?"
"आय"
"अप अबोव्ह द वर्ल्ड सो हाय...लाईक अ डायमंड?"
"इंग्ग क्काय"
"अले वाह...मत्त मत्त....."
"मोनु चावा." (मोनु = किडा, मच्छर इ.)
"बघ चावला ना...मोनु तुला. चल आत जाऊ या."
"तिके तिके.....आह्याह्याह्याआ"
बिल्डींग मधले आणि बाहेरचे जागे होण्याआधी कसे-बसे त्याला घेऊन घरात घुसण्याचा माझा बापडा प्रयत्न आणि आदीराजे फुल्ल बाजीप्रभुंच्या रोलमध्ये घुसुन खिंड लढायच्या मुडमध्ये.
"ती बघ आजीने तुझी खेळणी घेतली. चल आपण काढुन घेऊया." असे म्हटल्यावर खेळण्यांच्या बास्केटकडे कुच केली जाते.
मग खेळण्यांचे बास्केट पुर्ण ओतुन रिकामी केलं जातं. मग आदीराजे त्यात बसुन रथ हाकायचा हुकुम सोडतात. या रुममधुन त्या रुममध्ये, त्या रुममधुन या रुममध्ये नगराची पहाणी केली जाते. जेव्हा घोडे दमतात किंवा महाराजांना ते तसे वाटायला लागतात, तेव्हा त्यांना हाकलुन देऊन महाराज स्वतः रथातुन उतरुन रथ ढकलयला लागतात. मग वाटेत येईल त्या वस्तुचा चुराडा करत भरधाव स्पीड मध्ये रथ फिरत राहतो. घोडे महाराजांना झेलायला रथामागुन धावत असतात.
(घोडे नुसते वरातीमागुन नाही तर कधी रथामागुन पण धावतात)
घोड्यांचा अंदाज चुकतो आणि मग ’आआआईईईईईईईईईईए..ह्याह्याह्याह्या गुणिले १००’

फायनली आईला शरण जाऊन दोन्ही हात वर करुन, "उच्चुन घे नाआआआआआआआआ..."
"ये रे माझा बाळ तो....उगी उगी. कुनी माल्लं? आपण मार देऊ हा."

बाळराजे खांद्यावर डोके ठेवताच झोपी जातात. आणि पुर्ण घर पुन्हा जागच्या जागी जाऊन बसतं. 

आता थोडावेळ तरी सगळे सुखाने एका जागेवर बसु शकणार असतात. सगळ्यांच्याच चेहर्‍यावर एक ’हुश्श्स....’वाला रिलाक्स भाव झळकत असतो.

नुसते बसुन वेळ वाया न-घालवता अंथरुणं करण्यासाठी बळ एकवटलं जातं. राजे कोणत्याही क्षणाला ’मोनिन’ डिक्लेअर्ड करु शकत असल्याने मिळेल तेवढे झोपेचे सुख पदरात पाडुन घेण्यासाठी मनातल्या मनात निद्रादेवीची आराधना सुरु होते.

Friday, February 4, 2011

Caring For You....Always!




"काय खायचं? बोल लवकर."
"पाणी-पुरी खाऊया का? ए, पण आज बसने जायचं हा घरी."
"हो गं बाई, आधी खाऊया चल. इथे एवढी चांगली नाही मिळत ना. चल थोडं पुढे जायचं का?"
असं म्हणत घर कधी यायचं ते मला कळायचंच नाही. पण बाहुलीला कळायचं. ती रागवायची माझ्यावर.
"ए, तू नेहमी असंच करतेस बाबा. तुझ्याबरोबर दादरला यायलाच नको कधी. केवढं चालवलंस. पाय बघ किती दुखताहेत ते. तू देणार आहेस का चेपुन?"
"अगं पण तुलाच पाणी-पुरी खायची होती ना. स्टेशनला कुठे मिळते चांगली पाणी-पुरी? आणि अर्धा रस्ता तर आपण आलेलोच शोधत शोधत. मग तिथुन पुढे तेवढीच तिकीट. काय बसने जायचं. आता उरलेल्या चार रुपयाचं घेईन ना तुझ्यासाठी अजून काहीतरी"
"नको मला तुझं काही आता."
सोल्लीडच चिडायची मग बाहुली. पण तिला माझ्यावर नीट रागवायला नाही जमायचं.
तिला हसायला यायचं लगेच. खरंच खूप सहन करायची ती मला. आणि अजूनही करते.
दादर ते आमचे घर, चालत यायला फ़क्त एक तास लागतो.

माझी बाहुली... माझी सावली... माझी मैत्रिण... माझी पिल्लू... माझी जान... माझा बच्चा... किती लिहु आणि किती नको तिच्याबद्दल. ती म्हणजे माझी डायरी. सगळं सगळं तिच्याशी शेअर केले आहे आजपर्यंत.
ती म्हणजे मी आणि मी म्हणजे ती.

आम्ही दोघी सख्या बहिणी आहोत हे आम्हाला बघुन कोणाला वाटणार नाही आणि स्वभावावरुन तर नाहीच नाही. आमचे स्वभाव एकमेकांना अगदी पुरक म्हणायला हरकत नाही.


ती शांत (फक्त घराबाहेर), लाजाळू एकंदर अशी रिसर्व्हड-रिसर्व्हड. तिच्या भावना सहजा-सहजी नाही कळत rather ती कोणाला कळु देत नाही. (इथे मी तिला ’दगड’ संबोधते....माझा गुणी दगड  )
घर आणि घरातल्या माणसांसकट वस्तुंना शिस्त लावायची तिला भारी हौस. नटण्या-मुरडण्याची आवड प्रत्येक मुलीला असते. पण तिने याबाबत प्रायोरिटी नेहमी मलाच द्यायची. जेव्हा अशी सिच्युएशन येते की एकच वस्तु पण ती दोघींना आवडलीय, डायरेक्ट त्याग-बिग करायची तिची तयारी. नुसती तयारी नाही
तर त्या वस्तुचे मालकी हक्क मला सोपवुन madam मोकळ्या. ह्या स्वभावामुळेच जास्त काळजी वाटते पोरीची.
यावरुन माझ्या स्वभावाची कल्पना आली असेलच. ह्या स्वभावाला विरुद्ध असलेले शब्द एकत्र आणले म्हणजे माझा स्वभाव बनेल.

आम्ही चार भावंडे. भाऊ दोघे मोठे. आणि बाहुली शेंडेफळ. आमच्या दोघींमध्ये साधारण तीन वर्षांचा फरक आहे. पण आमच्यात लहान कोण नी मोठी कोण ते मला सुद्धा समजत नाही. घरात मी जरा लाडोबाच आहे. त्याचा तिला कधीच हेवा वाटत नाही. काम सांगताना आई ते तिलाच सांगेल. आणि मला मात्र ’जीव बघ काय तो’ म्हणत नेहमीच पदराखाली घालेल. यावर पण "लहान ती आहे की मी? काम कोणाला सांगितले पाहिजे? लाड कोणाचे झाले पाहिजेत? मला माहिती आहे मी तुझी मुलगीच नाही." बस इतकेच. ते लटके लटके भांडताना पण माझ्याबद्दल तिच्या नजरेत असलेले एक प्रकारचे कौतुक. मुख्य म्हण्जे हि madam च माझे सर्वात जास्त लाड करत असते.

भावंडांमध्ये आमच्या दोघींमध्ये कमालीची ओढ आहे. (दोन्ही दादा-लोकांची जाहीर माफी मागुन)
मला देखील अमेझिंग वाटते. पण खरे आहे. मग तो खाऊ शेअर करायचा असु दे की ’शिक्रेट’, तिला मी आणि मला ती लागतेच.

तिच्या जन्मानंतर, माझे लाड कमी होणार असे सहाजिकच मला पण वाटायचे. एवढे स्पष्ट नाही आठवत. पण Black & White मध्ये अंधुक, तुटक असे काही व्हिडिओस येतात डोळ्यासमोर. तिच्या बारशाला आईने तिला मांडीवर घेतलेले बघुन मी गाल फुगवुन बसले होते. अजून एक किस्सा आठवुन तर आता हसायला येते. ती
साधारण पाच-सहा महिन्यांची होती. बाबांनी दोघींना कपडे आणलेले. तिला आणलेले कपडे मला मला भरपुर आवडलेले. होत नसतानाही ’तिला किती मस्त मस्त आणले. आणि मला काय हे असे’ अशा रागाने ते कपडे घालायचा प्रयत्न केलेला.
त्यात ते कपडे बिच्चारे फाटले ती वेगळी गोष्ट पण त्यात अडकुन बसल्यामुळे माझे छाने हसे झालेलं. तोंडावर कोणी हसु शकले नाही तो वेगळा भाग झाला. भोंगा ऐकायची हिंमत कोणात असते?
त्यानंतर पुढे समज येईपर्यंत आमच्या दोघींना जे कपडे आणले जात ते फक्त साईज मध्ये वेगवेगळे असत.

इर्षेचा भाग तो तेवढ्यापुरतीच होता. जस-जसे मला समजायला लागले होते, तस-तशी तिची अधिकाधिक काळजी घ्यायला शिकले मी. तिला सोडुन शाळेत पण जाणे जीवावर यायचे मला. तशाही शाळेत जायचा उत्साह तिच्यापेक्षा कमीच होता. ती त्या बाबतीत पण अगदी पर्टिक्युलर. वह्या-पुस्तके, सगळ्या वस्तू जिथल्या तिथे. दोघींसाठी सुरुवातीला एकच कपाट दिले गेलेले. हळु-हळु माझ्या नीट-नेटकेपणा मुळे माझ्या वस्तूंची तिने पद्धतशीरपणे हकालपट्टी केलेली.
पण मला दिले गेलेले वेगळे कपाट पण नीट ठेवायची तिचीच जवाबदारी असायची. टाईम-टेबल हे वहीचे
शेवटचे पान भरायला दिली गेलेली वस्तू नसुन, दुसर्‍या दिवशी शाळेत जायची इच्छा असल्यास त्याच्या आदल्या रात्री दप्तरातल्या वह्या-पुस्तक नामक दंगे-खोर (सापडतच नाही वेळेला - हे फ़क्त माझ्याबाबतीत) लोकांची हजेरी घेण्यासाठी असते. हे तिच्याकडुनच मला कळले. वळले नाही ती वेगळी गोष्ट.
ती पाचवीत असताना तिला माझ्या शाळेत घातलेले. मग तिच्याबद्दलची माझी काळजी अजुन वाढली. मधल्या सुट्टीत तर भेटायचीच पण जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा तेव्हा तिच्या वर्गाकडे एक नजर मारुन यायची हे ठरलेलं असायचं. उगीचच वाटायचे कोणी तिच्याशी मारामारी वगैरे नसेल ना केली? हि कोणाला मारणे शक्यच नव्हते, पण हिनेच कोणाचा मार वगैरे नसेल ना खाल्ला? तशी माझी गरीब गाय कोणाच्या अध्यात-मध्यात नसल्याने  याचीही शक्यता कमीच होती. पण जग निष्ठुर असते, असे मला तिच्या बद्दल विचार करताना उगीचच वाटत रहाते. तिच्या रक्षणासाठी मी नेहमी तत्पर रहायचा माझ्या परीने निदान प्रयत्न करत होती. माझ्या या
अशा वागण्याचा असा काही परिणाम होऊ शकतो मला स्वप्नात देखील वाटले नव्हते. एके दिवशी काय झाले, मला जी नेहमी तिच्याबद्दल धाकधूक वाटायची त्याप्रमाणेच घडले. कशावरुनतरी कोणीतरी तिला कानाखाली दिली. मला कळाले तेव्हा माझा खरंच खुप संताप झालेला. पण  प्रत्यक्षात ज्या मुलीने ती गुस्ताखी केलेली, तिची हालत पाहुन मला हसु आवरले गेले नाही. तिला कळालेले की ज्या मुलीला आपण मारले तिची बहिण सोल्लीड डेंजर-बिंजर आहे, आपली धडगत नाही वगैरे. मी तिला परत असे करु नकोस म्हणुन समजवायला गेले तर तिने भोकाडच पसरले. लागलीच तिथुन काढता पाय घ्यावा लागला. असो.

तिच्या लाजर्‍या-बुजर्‍या स्वभावामुळे, तिचा मैत्र-परिवार काहीसा इल्लु-पिल्लुसा. तिची जवळची मैत्रिण कोण होती? या प्रश्नाचे उत्तर नाही सांगता येत.
मित्र किंवा मैत्रिण म्हटलं की एक साधारण चित्र डोळ्यासमोर उभं राहतं ना.
जसे की एकमेकांच्या घरी येणे-जाणे, रुसवे-फुगवे-मस्कामारी, कधी आरडा-ओरड तर कधी खुसुर-फुसुर, सबमिशनच्या वेळेचे ’एकमेका सहाय्य करु’ अभियान, परीक्षेची तयारी, सुट्टीचे प्लानिंग आणि सगळ्यात मह्त्त्वाचे म्हणजे ’फेव्हीकोल का मजबुत जोड है....छुटेगा नही....’
आम्हाला तिच्या बाबतीत हे चित्र कधी दिसलेच नाही. स्वभावाप्रमाणे तिने नाही सांगितले तरी याबाबतची तिची चुरचुर मात्र कळुन यायची. असो.

मलादेखील मनापासुन वाटायचे तिची एक तरी ’खास’ मैत्रीण असावी असे. पण नाईलाज को क्या ईलाज. मग मीच तिची मैत्रीण बनत गेले. माझ्या फ्रेंड-सर्कल मध्ये तिचेपण अकाऊंट ओपन केले. पण सुरुवातीला तिथेही मोजकेच बोलायचं. बरं कोणाशी बोलायचं झाल्यास माझ्या थ्रु संवाद. कोणी तिला काही प्रश्न केले
की आधी माझ्याकडे बघुन डोळ्यांनीच विचारायचं ’काय बोलु’ असे. वाटायचं कसं होणार या बाळाचं?
मला तिला बोलकं किंवा atleast बोलतं करायचं होतं. तिने काही सहन करणे मला सहन नाही होत.
हळु-हळु ती ’आमच्यात’ रुळायला लागली. थोडा जास्त वेळ गेला खरा.

एक मात्र आहे आम्ही दोघी बाहेर पडलो की धम्माल असते. रस्ताभर नुसतच आपलं हसणं-खिदळणं चालतं. एक गोष्ट खुप अमेझिंग घडते, आम्ही दोघी स्ट्रीट-लम्पच्या बाजुने जात असलो की चालु असलेला दिवा बंद होतो. आणि बंद दिवा चालु होतो. म्हणजे ह्यापैकी काहीतरी एक तेव्हा घडायलाच हवे. मग माझं पिल्लु खो-खो करुन हसतं. रस्त्यातुन चालताना माझ्या ओळखीची बरीच (हे तिला वाटते) मंडळी भेटत असतात. तिला याचे नवल तर वाटतेच. मग त्याबद्दल पण ती ’तु निवडणुकीला का उभी रहात नाही?’ असं काहीतरी ऐकवणार. माझ्यावर कमेंट करणे, माझी टर उडवणे, मला एकंदर वेड्यात-बिड्यात काढणे तिला आवडते आणि मलाही. ती माझी कंपनी खुप एन्जोय करते. प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीत तिला माझाच सल्ला लागतो. रेस्टो मध्ये गेल्यावर काय खायचं तिथपासुन ते कपडे कसे घ्यायचे? कोणता कलर चांगल वाटतो? हे सर्व मला विचारुनच ती ठरवणार. हिचे ड्रेस शिवायला देताना टेलरबरोबर मीच बोलयचं.

थोडक्यात काय तर माझ्यावाचुन तिचं पानदेखील हलत नाही. वाटायचं माझ्या लग्नानंतर हा जीव काय करेल? नुसती कल्पनापण करवत नव्हती. पण प्रत्यक्षात जेव्हा ही माझी पाठराखीण मला माझ्या सासरी सोडुन घरी निघाली तेव्हा, ’स्वतःची काळजी घे. आठवण आली तर त्रास करुन घेऊ नकोस. रडलीस तर डोळे
सुजतात तुझे लवकर. तु कधीही हाक मारलीस की धावत येईन. मी कायम तुझ्यासोबतच आहे समज.’ अशी काहीतरी चार-दोन उपदेशपर वाक्ये सांगुन निर्विकारपणे चालु पडली. हि माझी कालची माझी छकुली बोलतेय की आणखी कोणी?
त्या क्षणाला डोळ्यासमोरुन एकामागुन एक चित्रे सरकत होती. त्या चित्रांना क्रम-बिम असा नव्हता. बस जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेले फोटो उचलुन पहावेत तसे सर्व. मग कोणताही फोटो हातात येईल की आपण फक्त बघायचे काम करायचे.
तिच्या पाळण्याला दिलेले झोके, तिचे बोट पकडुन स्वतःला सावरत केलेली ’चाली-चाली’, उळकंबत-उळकंबत प्लास्टिकच्या पिशवीतुन चिमुकला संसार घेऊन भातुकलीसाठी जागेचा शोध, आईचा मार खाल्यावर ’उगी हं’ म्हणणारे तिचे पाठीवर फिरणारे चिमुकले हात, कधी कधी तर खेळण्यांवरुन एकमेकींच्या झिंज्यापण ओढलेल्या, खेळताना पडल्यावर फुटलेली ढोपरं-कोपरं घरात कळु देऊ नये म्हणुन कधी रिश्वत कधी हातमिळवणी, ती गाढ झोपल्याची खात्री करुन आईचं मला कुशीत घेणं, शाळेत जाताना तिने मला ओढत नेणं, तिचा अभ्यास घेताना तिचा रडवेला चेहरा, तरीही पुन्हा दुसर्‍या दिवशी मीच अभ्यास घ्यायचा असा हट्ट, माझ्या वाढदिवसासाठी रात्री उशीरा पर्यंत जागुन तिने स्वतः तयार केलेले शुभेच्छापत्र, कोलेजमधुन सुटल्यावर घरी वाटेला डोळे लावुन बसलेल्या तिच्यासाठी जीव मुठीत घेऊन पळत येणं, संध्याकाळचं सी-फेस,
’त्या’च्याबद्दल न-कंटाळता तासन्तास सहन केलेली माझी बक-बक, रात्री हेड-फोन शेअर करुन उशीर-उशीर पर्यंत ऐकलेला रेडिओ, मला आवडते म्हणुन माझ्यासाठी चायनीज वर केलेली आर अन्ड डी, वीकेंडचं शोपींग, मुव्हीज फक्त प्लानिंग (एक-दोन वेळाच सोबत गेलेलो), अबोला, फुगलेले गाल, मनधरणी,......
आता असले क्षण खुप दुर्मिळ. न जाणो कधी वाट्याला येतील.

खरंच अचानक कधी माझे लग्न ठरले, हा हा म्हणता साखरपुडा, लग्नाची खरेदी, रुखवतासाठीची जागरणं, मेहंदी, हळद....आणि मग लग्नाचा दिवस.
मंडपात पण दुसर्‍याच कुणाच्या लग्नात आल्यासारख्या चाललेल्या गप्पा. भटजी रिपीट करुन करुन कंटाळत
होते(कदाचित नंतर कंटाळुन एखाद-दुसरी स्टेप स्किप-बिपपण केली असेल. असो, आपल्याला काय कळतंय त्यातलं?). बाहुली मध्येच मला ’श्श्श...’ करुन गप्प बसवायची. परत येरे माझ्या मागल्या.
लग्नाच्या एक-एका विधीबरोबर आमच्यातलं अंतर वाढते आहे, जाणवलंच नाही आम्हाला.
सगळ्यात शेवटी कठीण क्षण येतो तो ’लेक चालली सासरला’. कोणाकडे पहावतही नव्हते.
आई-बाबा, दादा-वहिनी, भाची, मावशी, मामा-मामी, आत्ये, चुलत-फुलत भावंडे... असे बरेच जण.
......तेव्हा मी सगळ्यांना भेटुन रडली, बाहुली सोडुन. ती म्हणाली अगं मी आज तुझ्याबरोबरच आहे. तिचे ’आज’ त्या हळव्या क्षणाला पुरेसे झालेपण.

ह्या 'Flash-back' मधून बाहेर येत तीची पाठमोरी आकृती पहातच राहिले. दिसेनाशी होण्याआधी एका वळणावरुन तिने मागे बघुन हात केला. इतके दिवस माझ्याशिवाय हिचे कसे होणार हा प्रश्न होता. अचानक तो बेईमान प्रश्न माझ्यावरच फिरला. खरंच वाटत होते तिला माझी जास्त गरज आहे, ती माझ्याशिवाय राहु शकत नाही वगैरे. एक हात वर करुन दुरवर दिसणार्‍या तिला ’नीट जा’ अशी मनातच साद घातली.

निघताना मी काहीच सांगितले नाही तिला. पुढचा संवाद मनातल्या मनातच, ’स्वतःची काळजी घे. आठवण आली तर त्रास करुन घेऊ नकोस. रडलीस तर डोळे सुजतात तुझे लवकर. तु कधीही हाक मारलीस की धावत येईन. मी कायम तुझ्यासोबतच आहे समज.’... शब्द, भावना सर्व तिचेच, तिच्याच सारखे. असणारच
तिच्यासारखे, आम्ही बहिणी आहोत सख्या.